मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य:- अठरा महिने फरार पोलीस निरीक्षक बकाले आले पोलिसांना शरण
मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य:-
अठरा महिने फरार पोलीस निरीक्षक बकाले आले पोलिसांना शरण
जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन निलंबित पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले दिड वर्षानंतर जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात शरण आले आहेत. गेल्या दीड वर्षापासून ते जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला व जळगाव पोलिसांना चांगला चकवा देत होते. शेवटी त्यांनी स्वतःहून शरणागती पत्करून नांग्या टाकल्या. सहकारी पोलिस कर्मचाऱ्याशी भ्रमणध्वनीवर केलेल्या संभाषणात त्यांनी मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह शब्दांची लाखोली वाहिली होती. ती क्लिप व्हायरल झाल्यानंतर मराठा समाजातून चीड व्यक्त करणाऱ्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. बकाले यांना यांना बडतर्फ करून अटक करण्याची मागणी होत होती. समाज भावना लक्षात घेऊन त्यांचे निलंबन करण्यात आले मात्र ते गायब झाले. या प्रकरणावरून नाशिक परीक्षेत्रातील राजकारण देखील चव्हाट्यावर आले होते. अखेर मराठा समाजाला शिव्यांची लाखोली वाहणारे कायद्याचे रक्षक म्हणविणारे पोलिस अधिकारी कायद्यासमोर नांगी टाकून शरण आले आहेत. यानंतर कायद्याप्रमाणे त्यांच्यावर काय कारवाई होते? यावर मराठा समाजाची नजर आहे.



