हॉटेल यात्री, फिजी फॉक्स आणि हॉटेल जनता यांचे परवाने निलंबित; मुंगसरेतील हॉटेलमधून ३३ हजारांची शेव जप्त नाशिकमध्ये अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; ११० किलो शेव ताब्यात, मुदतबाह्य पदार्थांसह अस्वच्छतेचे प्रकार उघड
हॉटेल यात्री, फिजी फॉक्स आणि हॉटेल जनता यांचे परवाने निलंबित; मुंगसरेतील हॉटेलमधून ३३ हजारांची शेव जप्त
नाशिकमध्ये अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; ११० किलो शेव ताब्यात, मुदतबाह्य पदार्थांसह अस्वच्छतेचे प्रकार उघड
नाशिक : शहरातील हॉटेल आणि खाद्य आस्थापनांमधील अस्वच्छता तसेच अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन उघड झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने कठोर कारवाई केली आहे. सीबीएस बसस्थानकाजवळील हॉटेल यात्री आणि हॉटेल जनता, तसेच पंचवटीतील मखमलाबाद परिसरातील फिजी फॉक्स या तीन आस्थापनांचे परवाने व नोंदणी प्रमाणपत्र निलंबित करण्यात आले आहेत. याशिवाय मुंगसरे येथील एका हॉटेलमधून ३३ हजार रुपये किमतीची ११० किलो शेव जप्त करण्यात आली आहे.
अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे, सहआयुक्त मंगेश माने आणि सहाय्यक आयुक्त (अन्न) विनोद धवड, ज्ञानेश्वर महाले व संदीप देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
सीबीएस परिसरातील हॉटेल्समध्ये अस्वच्छता
सीबीएस बसस्थानकाजवळील हॉटेल यात्रीच्या तपासणीत अस्वच्छ परिस्थिती आढळली. अन्न सुरक्षा व मानके नियम २०११ मधील अनुसूची-४ मधील तरतुदींचे उल्लंघन तसेच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता नसल्याचे निदर्शनास आले. त्याच परिसरातील हॉटेल जनता येथेही अस्वच्छता, नियमांचे उल्लंघन आणि तयार अन्नपदार्थ उघड्यावर विक्रीसाठी ठेवल्याचे आढळले.
फिजी फॉक्समध्ये कीटकांचा प्रादुर्भाव, मुदतबाह्य पदार्थ
मखमलाबाद शिवारातील लिंक रोड परिसरातील प्लॅथोपिया एंटरटेनमेंट एलएलपी (फिजी फॉक्स) या आस्थापनेच्या तपासणीत अन्न तयार करण्याच्या ठिकाणी कीटक व इतर उपद्रवी जीवांचा प्रादुर्भाव आढळला. याशिवाय अस्वच्छता, अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि मुदतबाह्य अन्नपदार्थही आढळून आले. या गंभीर त्रुटींमुळे संबंधित आस्थापनेचा परवाना निलंबित करण्यात आला.
मुंगसरेत ११० किलो शेव जप्त
दरम्यान, मुंगसरे येथील गट क्रमांक ३७१ मधील पेरुची वाडी परिसरातील हॉटेलमध्ये तपासणीदरम्यान लेबलवरील त्रुटी आणि अन्नपदार्थाचा दर्जा याबाबत संशय निर्माण झाल्याने ११० किलो शेव जप्त करण्यात आली. या शेवची किंमत ३३ हजार रुपये आहे. संबंधित व्यावसायिकाला सुधारणा नोटीस बजावण्यात आली असून त्रुटी दूर करण्यासाठी नियमानुसार १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी गोविंदा गायकवाड, अश्विनी पाटील, ऋतुजा नवले आणि प्रतीक भड यांनी केली.
अन्नपदार्थांची सुरक्षितता, स्वच्छता आणि नागरिकांचे आरोग्य यांना प्राधान्य देऊन अशा आस्थापनांची तपासणी सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अन्न व्यावसायिकांनी आवश्यक परवाना किंवा नोंदणी घेऊन अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ आणि त्याअंतर्गत नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत किंवा सुरक्षिततेबाबत संशय असल्यास नागरिकांनी complaints.mahafda.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.



