विखे-थोरातांचा सहकार वारसा: नव्या पिढीच्या खांदयावर नेतृत्वाचा भार! इतिहासाने जागवल्या आठवणी ;वर्तमानाला भविष्याची आळवणी!!
विखे-थोरातांचा सहकार वारसा: नव्या पिढीच्या खांदयावर नेतृत्वाचा भार!
इतिहासाने जागवल्या आठवणी ;वर्तमानाला भविष्याची आळवणी!!
……………….कुमार कडलग / नाशिक – संगमनेर
काळ बदलतो, पिढ्या बदलतात; मात्र काही घराण्यांचा इतिहास आणि त्यांनी उभा केलेला वारसा, काळाच्या ओघातही कायम राहतो. सहकार क्षेत्रात विखे आणि थोरात या दोन कुटुंबांचे नाव घेतले की महाराष्ट्राच्या सहकार चळवळीचा इतिहास डोळ्यांसमोर उभा राहतो. अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. सुजय विखे पाटील आणि उपाध्यक्षपदी रणजितसिंह देशमुख यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर व्हायरल झालेले एक जुने छायाचित्र याच ऐतिहासिक वारशाची आठवण करून देत आहे.
या छायाचित्रात एकेकाळी जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, तर उपाध्यक्ष म्हणून भाऊसाहेब थोरात विराजमान असल्याचे दिसते. आजच्या निवडीत एक आगळे ऐतिहासिक साम्य समोर आले आहे. डॉ. सुजय विखे पाटील हे डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचे पणतू, तर रणजितसिंह देशमुख हे भाऊसाहेब थोरात यांचे नात जावई, म्हणजे नातेसंबंधातील पुढच्या पिढीतील प्रतिनिधी आहेत. त्यामुळे एकेकाळी ज्या दोन कुटुंबांच्या ज्येष्ठांनी सहकाराच्या नेतृत्वाची धुरा सांभाळली, त्याच वारशाचे प्रतिनिधित्व करणारी नवी पिढी आज त्याच बँकेच्या नेतृत्वाच्या निमित्ताने एकत्र आली आहे.
डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक परिवर्तनाचा पाया घातला. शेतकऱ्यांना संघटित करून सहकारी साखर कारखानदारीची संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचे ऐतिहासिक काम त्यांनी केले. सहकार हा केवळ आर्थिक व्यवहाराचा विषय नसून ग्रामीण समाजाच्या विकासाचे प्रभावी साधन ठरू शकतो, हा विचार त्यांनी कृतीतून सिद्ध केला. भाऊसाहेब थोरात यांनीही सहकार, शेती, शिक्षण आणि ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. या दोन्ही नेतृत्वाने सहकाराला केवळ संस्थात्मक स्वरूप दिले नाही, तर त्यामागे सामाजिक परिवर्तनाची भूमिका उभी केली.
आज त्याच परंपरेतील पुढील पिढी जिल्हा सहकारी बँकेच्या सर्वोच्च पदांवर विराजमान होत आहे. हा योगायोग केवळ दोन व्यक्तींच्या निवडीपुरता मर्यादित नाही, तर सहकाराच्या इतिहासातील दोन प्रभावी घराण्यांच्या परंपरेचा पुनर्स्मरण करणारा आहे. जुने छायाचित्र आणि आजची निवड यांची सांगड घातली असता काळाच्या पडद्यावर इतिहासाची पुनरावृत्ती झाल्याची भावना निर्माण होते.
मात्र वारसा मिळणे आणि वारसा चालविणे यात मोठा फरक असतो. पूर्वजांनी उभ्या केलेल्या संस्था, विचार आणि मूल्ये पुढे नेण्यासाठी केवळ नाव पुरेसे नसते; त्यासाठी कर्तृत्व, निर्णयक्षमता, पारदर्शकता आणि सर्वसामान्यांचा विश्वास संपादन करावा लागतो. आज अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेसमोरही अनेक आव्हाने आहेत. शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा, थकबाकीचा प्रश्न, आर्थिक शिस्त, ठेवीदारांचा विश्वास, बदलत्या अर्थव्यवस्थेत सहकाराचे आधुनिकीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणे या जबाबदाऱ्या नव्या नेतृत्वासमोर आहेत.
डॉ. सुजय विखे पाटील आणि रणजितसिंह देशमुख यांच्यासमोर आता केवळ पदाचा कार्यभार नाही, तर पूर्वजांनी निर्माण केलेल्या विश्वासार्हतेची उंची गाठण्याचे आव्हान आहे. बिनविरोध निवड ही राजकीय आणि सहकारातील समीकरणांची फलश्रुती असू शकते; पण या निवडीचे खरे मूल्यमापन त्यांच्या आगामी कामगिरीवरच होणार आहे.
विशेष म्हणजे, विखे आणि थोरात ही नावे अहिल्यानगरच्या सहकार क्षेत्रातील इतिहासाशी घट्ट जोडलेली आहेत. काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर राजकीय मतभेद, स्पर्धा आणि संघर्षही या कुटुंबांच्या वाट्याला आले. तरीही सहकाराच्या संस्थात्मक इतिहासात त्यांचे योगदान स्वतंत्रपणे अधोरेखित राहिले आहे. आज त्याच दोन परंपरांचे प्रतिनिधी एका संस्थेच्या नेतृत्वात एकत्र येणे ही निश्चितच लक्षवेधी बाब आहे.
कालच्या छायाचित्रात ज्येष्ठांचे नेतृत्व होते, आजच्या छायाचित्रात नव्या पिढीची जबाबदारी आहे. इतिहासाने त्यांना संधी दिली आहे; आता आपल्या कामातून इतिहास घडविण्याची जबाबदारी त्यांची आहे. कारण सहकाराचा वारसा हा केवळ खुर्चीचा नसतो, तो शेतकऱ्यांच्या विश्वासाचा, कष्टकऱ्यांच्या अपेक्षांचा आणि ग्रामीण महाराष्ट्राच्या भविष्याचा असतो.
विखे-थोरात वारशाची ही नवी पर्वणी छायाचित्रापुरती मर्यादित राहणार की सहकाराच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरणार, याचे उत्तर आता नव्या नेतृत्वाच्या कामातूनच मिळणार आहे!
दुनियादारी won’t lie



