८२ आदर्श शिक्षकांचा गौरव; ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
८२ आदर्श शिक्षकांचा गौरव; ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
खोपोली : शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय आणि प्रेरणादायी योगदान देणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी माधवबाग हॉस्पिटल, खोपोली यांच्या विशेष सहकार्याने आयोजित ‘जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ सोहळा दिमाखात पार पडला. या सोहळ्यात ठाणे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ८२ आदर्श शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
या पुरस्कार सोहळ्याचे उद्घाटन कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. शिक्षक हा समाजाचा खरा शिल्पकार असून, तो केवळ विद्यार्थ्यांना शिक्षण देत नाही, तर भावी पिढी घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतो. त्यामुळे शिक्षकांच्या योगदानाचा सन्मान होणे आवश्यक असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले.
कार्यक्रमास डॉ. राहुल जाधव (एम.डी. आयुर्वेद, अॅडमिनिस्ट्रेटर), डॉ. मिलिंद सरदार (सीएसआर हेड, माधवबाग), डॉ. दिपाली देशमुख (ओपीडी हेड), दत्तात्रय किरपण (मुंबई विभागीय अध्यक्ष, मुख्याध्यापक संघ), गणेश पाटील (ठाणे जिल्हा अध्यक्ष, मुख्याध्यापक संघटना), गुलाबराव पाटील (शिक्षक परिषद), वसंत जोहरे (अध्यक्ष, ठाणे जिल्हा शिवछत्रपती शिक्षक संघटना), धनाजी दळवी (अध्यक्ष, ठाणे जिल्हा ग्रामीण शिवछत्रपती शिक्षक संघटना), दिलीप म्हसे (रायगड जिल्हा अध्यक्ष, शिवछत्रपती शिक्षक संघटना), सोयब सर (उर्दू विभाग प्रमुख, ठाणे जिल्हा शिवछत्रपती शिक्षक संघटना), नेहा गवळी (प्राथमिक विभाग प्रमुख, ठाणे शिवछत्रपती शिक्षक संघटना) यांच्यासह विविध तालुका अध्यक्ष, सचिव, पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.
शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्याच्या या उपक्रमामुळे शिक्षण क्षेत्रात सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यासोबतच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन मिळाले. पुरस्कारप्राप्त सर्व शिक्षकांचे मान्यवरांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



