Bussiness

तू शुद्ध असेल, तर परिणामही सकारात्मकच!  _पत्रकारितेच्या वाटचालीत विचारांची शुद्धता, भूमिकेची प्रामाणिकता आणि सामाजिक बांधिलकी महत्त्वाची!_ 


हेतू शुद्ध असेल, तर परिणामही सकारात्मकच!

 

 _पत्रकारितेच्या वाटचालीत विचारांची शुद्धता, भूमिकेची प्रामाणिकता आणि सामाजिक बांधिलकी महत्त्वाची!_ 

 

 

… कुमार कडलग, नाशिक

……..

पत्रकारिता हा केवळ बातम्या गोळा करण्याचा, त्या लिहिण्याचा आणि प्रसिद्ध करण्याचा व्यवसाय नाही. तो समाजाच्या विविध स्तरांशी संवाद साधण्याचा, माणसांना समजून घेण्याचा, त्यांच्या वृत्ती-प्रवृत्तींचे निरीक्षण करण्याचा आणि व्यवस्थेच्या अंतरंगाचा वेध घेण्याचा एक व्यापक व्यासंग आहे. या प्रवासात राजकीय क्षेत्रापासून प्रशासनापर्यंत, सामाजिक चळवळींपासून उद्योगविश्वापर्यंत आणि सामान्य माणसापासून सत्तेच्या सर्वोच्च वर्तुळापर्यंत अनेकांशी संबंध येतात. वैचारिक देवाणघेवाण होते. काही अनुभव शिकवून जातात, काही माणसे प्रभावित करतात, तर काहींच्या वर्तनातून संपूर्ण व्यवस्थेचे विद्रूप वास्तव समोर येते.

 

अशाच एका दौऱ्यातील अनुभव मनाला अस्वस्थ करून गेला. एका जुन्या पोलीस अधिकारी मित्राची त्यांच्या पोलीस ठाण्यात सहज भेट झाली. गप्पांच्या ओघात यापूर्वी ज्या जिल्ह्यात त्यांनी सेवा बजावली, तेथील अनुभव आणि सध्या कार्यरत असलेल्या जिल्ह्यातील परिस्थिती यांची सहज तुलना करण्याचा विषय निघाला. अपेक्षा होती ती प्रशासकीय कामकाजातील फरक, कायदा-सुव्यवस्थेची आव्हाने आणि स्थानिक परिस्थिती याविषयी काही अनुभव ऐकण्याची. मात्र, त्या अधिकाऱ्याने दिलेली प्रतिक्रिया अनपेक्षित आणि अस्वस्थ करणारी होती.

 

‘ही काय लोक आहेत? फालतूपणा सारा!’ अशा काहीशा त्राग्याच्या शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. त्यांच्या बोलण्याचा रोख स्थानिक राजकीय वर्तुळ आणि पत्रकारितेच्या क्षेत्रातील काही मंडळींकडे होता. शब्द मोजकेच; पण त्या शब्दांमागची अस्वस्थता बरच काही सांगून जाणारी होती.

 

एका अधिकाऱ्याची ही वैयक्तिक प्रतिक्रिया म्हणून विषय सोडून देणे सहज शक्य होते. प्रत्येकाची अनुभव घेण्याची पद्धत वेगळी असते. प्रशासनातील व्यक्तींचेही काही पूर्वग्रह असू शकतात. प्रत्येक नाराजीला अंतिम सत्य मानता येत नाही. परंतु, एखाद्या ठिकाणच्या राजकीय आणि पत्रकारितेच्या वातावरणाविषयी एखादा अनुभवी अधिकारी इतक्या उद्विग्नतेने बोलतो, तेव्हा त्या प्रतिक्रियेच्या मुळाशी नेमके काय आहे, याचा विचार करण्याची गरज निश्चितच निर्माण होते.

 

विशेषतः पत्रकारितेच्या क्षेत्रातील काही मंडळींचा उल्लेख त्यांच्या नाराजीचा भाग होता, ही बाब अधिक वेदनादायी होती. कारण, पत्रकारितेचा मूळ उद्देश प्रशासनाला अडचणीत आणणे हा नाही, तर प्रशासनाला उत्तरदायी बनवणे हा आहे. लोकप्रतिनिधींशी संघर्ष करणे हा हेतू नाही, तर लोकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देणे ही भूमिका आहे. अधिकाऱ्यांशी जवळीक निर्माण करणे किंवा त्यांच्याशी वैर पत्करणे, यापैकी कोणतीही गोष्ट पत्रकारितेचे अंतिम उद्दिष्ट असू शकत नाही. पत्रकारितेने या दोन्ही टोकांपासून स्वतःला अलिप्त ठेवणे अपेक्षित आहे.

 

मात्र, काही ठिकाणी चित्र वेगळे दिसते. पत्रकारितेच्या नावाखाली वैयक्तिक संबंधांचे अर्थकारण सुरू होते. बातमी हे लोकहिताचे साधन न राहता दबाव निर्माण करण्याचे माध्यम बनते. कुणाला जवळ करायचे, कुणाला दूर ठेवायचे, कुणाची स्तुती करायची आणि कुणाला लक्ष्य करायचे, यामागे वस्तुनिष्ठ पत्रकारितेपेक्षा वैयक्तिक समीकरणे महत्त्वाची ठरू लागतात. एखाद्या अधिकाऱ्याशी जुळले तर त्याचे उदात्तीकरण आणि मतभेद झाले तर त्याच्याविरुद्ध बातम्यांचा भडिमार, अशी प्रवृत्ती बळावली तर पत्रकारितेच्या विश्वासार्हतेला तडा जाणारच.

 

प्रश्न असा आहे की, पत्रकारितेचा वापर आपण समाजातील प्रश्न मांडण्यासाठी करतो आहोत की स्वतःचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी? लेखणीचा उपयोग व्यवस्थेतील दोष दाखवण्यासाठी होतो आहे की एखाद्याला आपल्या प्रभावाची जाणीव करून देण्यासाठी? बातमीमागे समाजहित आहे की वैयक्तिक हितसंबंध? या प्रश्नांची उत्तरे प्रत्येकाने स्वतःच्या अंतर्मनात शोधण्याची वेळ आली आहे.

 

हेतू शुद्ध असेल, तर परिणामही सकारात्मक मिळतात. पत्रकारिताही या गृहीतकाला अपवाद नाही!

एखाद्या पत्रकाराने एखाद्या अधिकाऱ्याच्या चुकीच्या निर्णयावर कठोर टीका केली, तर ती संबंधित अधिकाऱ्याला रुचेलच असे नाही. पण ती टीका तथ्याधारित असेल, तिच्यामागे सार्वजनिक हिताची भूमिका असेल आणि संबंधिताची बाजू मांडण्याची संधी दिलेली असेल, तर ती पत्रकारितेची जबाबदारी ठरते. त्याचप्रमाणे एखाद्या अधिकाऱ्याने केलेल्या चांगल्या कामाचे कौतुक करणे यातही गैर काहीच नाही. मात्र, टीका आणि कौतुक या दोन्हींचा आधार व्यक्तीशी असलेले संबंध नाही तर त्याचे काम असले पाहिजे.

Advertisement

 

पत्रकार आणि पोलीस प्रशासन यांचे संबंधही याच विश्वासाच्या पायावर उभे राहायला हवेत. पोलीस प्रशासनाला कायदा-सुव्यवस्था राखताना पत्रकारितेच्या सहकार्याची गरज असते, तर पत्रकारितेला वस्तुनिष्ठ बातम्यांसाठी प्रशासनाकडून अधिकृत माहिती आणि प्रतिसादाची आवश्यकता असते. या दोन्ही घटकांचे कार्यक्षेत्र वेगवेगळे असले तरी अंतिम उद्दिष्ट समाजाचे हित हेच असले पाहिजे. एकमेकांच्या कामात अनावश्यक हस्तक्षेप न करता, परस्पर सन्मान राखून आणि आवश्यक तेथे परखड प्रश्न विचारून ही नाती अधिक निकोप होऊ शकतात.

 

परंतु, पत्रकारितेतील काही व्यक्तींच्या वर्तनामुळे संपूर्ण पत्रकारितेकडे संशयाने पाहिले जाऊ लागले, तर ती अत्यंत दुर्दैवी बाब आहे. एखाद्या व्यक्तीच्या चुकीचे ओझे संपूर्ण व्यवसायाने का वाहावे? काहींच्या वैयक्तिक स्वार्थापोटी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शेकडो पत्रकारांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होणे अन्यायकारक आहे. म्हणूनच या क्षेत्रातील प्रत्येकाने स्वतःच्या वर्तनातून पत्रकारितेची प्रतिष्ठा जपण्याची जबाबदारी ओळखली पाहिजे.

 

दुसरीकडे, प्रशासनातील प्रत्येक नाराजीला पत्रकारितेचा दोष मानणेही योग्य ठरणार नाही. पत्रकाराने विचारलेला प्रश्न एखाद्या अधिकाऱ्याला अप्रिय वाटू शकतो. व्यवस्थेतील त्रुटी उघड करणारी बातमी अस्वस्थ करू शकते. लोकशाहीत ही अस्वस्थता पत्रकारितेच्या अस्तित्वाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे पत्रकारितेने प्रशासनाची नाराजी टाळण्यासाठी नव्हे, तर स्वतःची विश्वासार्हता टिकवण्यासाठी काम केले पाहिजे. अधिकारी खूश आहेत म्हणून पत्रकारिता चांगली आणि नाराज आहेत म्हणून पत्रकारिता वाईट, असे सरसकट समीकरणही चुकीचे आहे.

 

मात्र, एखाद्या शहराचे एकूणच वातावरण राजकीय आकस, वैयक्तिक संघर्ष, संशय आणि परस्पर अविश्वासाने दूषित होत असेल, तर त्यामागील कारणांचा शोध घेणे आवश्यक ठरते. राजकीय नेतृत्व, प्रशासन आणि पत्रकारिता हे समाजजीवनातील महत्त्वाचे घटक आहेत. या तिन्ही घटकांनी आपापल्या मर्यादा आणि जबाबदाऱ्या ओळखल्या तर सार्वजनिक जीवनात निकोप वातावरण निर्माण होऊ शकते. पण या तिन्ही क्षेत्रांतील काही व्यक्ती आपल्या पदाचा, अधिकाराचा किंवा प्रभावाचा वापर वैयक्तिक स्वार्थासाठी करू लागल्या, तर त्याचे परिणाम संपूर्ण शहराला भोगावे लागतात.

 

पत्रकारितेतील व्यावसायिक बंधुभाव म्हणजे एकमेकांच्या प्रत्येक कृतीचे समर्थन करणे नव्हे. उलट, एखादा सहकारी चुकीच्या मार्गाने जात असेल, तर त्याला जाणीव करून देणे, पत्रकारितेच्या मूल्यांची आठवण करून देणे आणि सामूहिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचणार नाही याची काळजी घेणे हा खरा व्यावसायिक बंधुभाव आहे. पत्रकार संघटना, संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार यांनीही या विषयाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

 

पत्रकारितेची प्रतिष्ठा केवळ मोठ्या व्यासपीठांवर भाषणे करून वाढत नाही. ती रोजच्या व्यवहारातून निर्माण होते. एखाद्या बातमीची सत्यता तपासताना, एखाद्या अधिकाऱ्याशी संवाद साधताना, राजकीय नेत्याला प्रश्न विचारताना किंवा एखाद्या सामान्य नागरिकाचा प्रश्न मांडताना पत्रकाराची भूमिका किती प्रामाणिक आहे, यातूनच त्या प्रतिष्ठेची उभारणी होते.

 

त्या पोलीस अधिकारी मित्राच्या काहीशा उद्विग्न प्रतिक्रियेने मनात निर्माण झालेली वेदना याच कारणाने आहे. एका व्यक्तीने व्यक्त केलेली नाराजी म्हणजे संपूर्ण पत्रकारितेचा निकाल नाही, हे मान्य; परंतु त्या प्रतिक्रियेतून आत्मपरीक्षणाची संधी मात्र नक्कीच आहे. आपल्याच व्यवसायातील काही प्रवृत्तीमुळे पत्रकारितेची प्रतिमा मलिन होत असेल, तर त्याकडे डोळेझाक करून चालणार नाही.

 

शेवटी, पत्रकारिता ही कुणाची मर्जी राखण्यासाठी नाही आणि कुणावर वैयक्तिक खुन्नस काढण्यासाठीही नाही. ती समाजाच्या हितासाठी आहे. सत्तेला प्रश्न विचारण्याचे धैर्य आणि स्वतःच्या चुका स्वीकारण्याचा प्रामाणिकपण या दोन्ही गोष्टी पत्रकारितेत असल्या पाहिजेत. दुसऱ्यांच्या हेतूंवर संशय घेण्यापूर्वी स्वतःच्या हेतूंचे परीक्षण करण्याची तयारी असली पाहिजे.

 

कारण, हेतूच दूषित असतील तर कृती कितीही प्रभावी वाटली तरी तिचे परिणाम समाजहिताचे ठरू शकत नाहीत. आणि हेतू शुद्ध असतील तर संघर्षातूनही सकारात्मक बदल घडवण्याची ताकद निर्माण होते.

 

पत्रकारितेने आरसा दाखवण्यापूर्वी स्वतःच्या चेहऱ्याकडेही एकदा पाहायला हवे. दुसऱ्यांच्या चुका शोधणारी लेखणी स्वतःच्या चुका स्वीकारण्याइतकी प्रामाणिक झाली, तरच तिच्या शब्दांना नैतिक बळ प्राप्त होईल. अन्यथा बातम्यांचा गदारोळ वाढेल; पण पत्रकारितेचा आवाज मात्र हळूहळू विश्वासार्हता गमावेल.

 

पत्रकारितेने प्रभाव निर्माण करावा, दबाव नव्हे; विश्वास संपादन करावा, दहशत नव्हे; प्रश्न विचारावेत, व्यक्तिगत हिशेब चुकते करू नयेत. कारण पत्रकारितेचे मोठेपण तिच्या हातातील लेखणीत नाही , तर ती लेखणी कोणत्या हेतूने चालवली जाते, यात असते!

-कुमार कडलग, नाशिक

दुनियादारी won’t lie 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *