जिल्हा शल्य चिकित्सकांनी खरंच गुळणी सोडली? त्या कथित दिव्यांगांना यु डी आय डी सादर करण्याचे आदेश ; आदेशाची अंमलबजावणी होणार की केराची टोपलीत टाकणार
जिल्हा शल्य चिकित्सकांनी खरंच गुळणी सोडली?
त्या कथित दिव्यांगांना यु डी आय डी सादर करण्याचे आदेश ;
आदेशाची अंमलबजावणी होणार की केराच्या टोपलीत टाकणार

नाशिक प्रतिनिधी
आरोग्य सेवेत रुजू होण्यासाठी कर्मचाऱ्यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्याची शंका उपस्थित केल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सकांनी संबंधित संशयित कर्मचाऱ्यांना यु डी आय डी दिव्यांग प्रमाणपत्र सादर करण्याचा आदेश जारी करून अखेर गुळणी सोडली. मात्र हे आदेश केल्यानंतर स्वतःच्याच आदेशाची काटेकोर अंमलबजावणी जिल्हा शल्य चिकित्सक करणार की स्वतःच्या हाताने इतर कारवाई आदेशाप्रमाणे या आदेशालाही केराची टोपली दाखवणार हे पाहण्यासाठी आपली दुनियादारीला काही दिवसांची प्रतिक्षा आहे.
जिल्हा आरोग्य सेवेत सुरु असलेला सावळा गोंधळ विभागाच्या कुटुंब प्रमुखांनी कृपा हस्त ठेवल्यानेच कॅन्सर सारखा पसरत असल्याची अनेक उदाहरणे निदर्शनास येत आहेत. नाशिक जिल्हा आरोग्य सेवेवर आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे नियंत्रण आहे. मात्र ज्यांनी नागरिकांच्या आरोग्याच्या मूलभूत अधिकाराचे रक्षण करायचे त्यांनीच सार्वजनिक आरोग्य विभाग कुरतडण्यास सुरुवात केल्याने हा सावळा गोंधळ अधिकच सुरक्षित झाला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयातून चिरीमिरी घेऊन खिरापती सारखी वाटली जात असलेली बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र चर्चेचा विषय बनली आहेत. विविध शासकीय विभागात काम करणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांची वैद्यकीय बिले मंजुरीसाठी आवश्यक असलेली शासकीय रुग्णालय प्रक्रिया तर उभ्या महाराष्ट्रात बदनाम झाली आहे. हे प्रकरण पोलिस तपासाच्या चरकात मुद्दामहून अडकवून कालापव्यय सुरु असतानाही जिल्हा शासकीय रुग्णालयातील या विभागाशी संबंधित वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना लागलेली टक्केवारीची लत मात्र अद्याप सुटलेली दिसत नाही. कुणालाही कुठल्याही कारणास्तव वैद्यकीय प्रमाणपत्र हवे असेल तर बेकायदा रोख रक्कम मोजल्याशिवाय प्रमाणपत्र तयार होत नाही.
टक्केवारीची ही लतखोरी आरोग्य खात्यात रुजू होण्याची इच्छा असलेल्या कर्मचाऱ्यांना बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देण्याइतपत घसरली आहे. जिल्ह्याच्या आरोग्य सेवेत काम करणाऱ्या असंख्य कर्मचाऱ्यांनी लाच देऊन बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळविल्याचे निष्पन्न होत आहे. याविषयी अनेकदा तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने यातून मिळणाऱ्या बेकायदेशीर महसूलात एक नंबरपासून शेवटच्या घटकापर्यंत प्रत्येकाचा हैसियत प्रमाणे वाटा असल्याची शंका चर्चेत आहे. हीच बाब आम्ही वारंवार विविध माध्यमांमधून व्यवस्थेच्या नजरेत आणून दिली आहे. त्याचाच परिणाम दिसण्यास सुरुवात झाली असून काल परवाच “जिल्हा शल्य चिकित्सक गुळणी का धरतात”या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या भावनांची लाज राखण्याचा प्रयत्न करणारा आदेश जिल्हा शल्य चिकित्सकांनी काढला आहे.
दिनांक ९/१२ /२०२४ या तारखेच्या या आदेश पत्रावर काढण्यात आलेल्या या कार्यालयीन आदेशात
यु डी आय डी दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणे बाबत
मुख्य प्रशासकिय अधिकारी, जिल्हा रुग्णालय नाशिक यांचे तोंडी आदेश संदर्भाने यु डी आय डी दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणे बाबत नमूद करण्यात आले असून दिनांक १०/१२ /२०२४ रोजी जिल्हा शल्य चिकित्सकांनी या आदेश पत्रावर स्वाक्षरी केल्याचे समजते.
बबन छबाजी बोराडे, उदवाहनचालक, उल्हास हिरामण पैठणपगार, व्रर्णोपचारक, गुलबिरसिंग किरणसिंग चितोळे, सफाईगार निलेश जालिंदर निकम, कक्षसेवक, नितीन रामचंद्र तिवडे, कक्षसेवक, सुनिल अंबादास शेजवळ, शस्त्रक्रियागृह सहायक, सरला जबाजी नागरे, कक्षसेविका, झिनत सलिम मिर्झा, कक्षसेविका, शंकर भिकाजी पंडीत, कक्षसेवक या नऊ कर्मचाऱ्यांना हे आदेश पत्र निर्गमित करण्यात आले असून यात म्हटले आहे की,आपण प्रशासकिय कार्यालयात दिव्यांग प्रमाणपत्र सादर केलेले आहे,त्याप्रमाणे आपणास दिव्यांग भत्ता अदा करण्यात येत असतो.तरी आपणास आदेशित करण्यात येते कि, दिव्यांग व्यक्तीसाठी कोणत्याही प्रकारचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या कर्मचारी यांनी शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग कमांक कायदा अप्रकि२०१८/प्रक४६/आरोग्य६ दिनांक १४ सप्टेबर २०१८ मधील आदेशानुसार केंद्र शासनाचे www. swavlambancard.gov.in या संगणकीय प्रणालीव्दारे वितरीत करण्यात आलेले नविन नमुन्यातील दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र या कार्यालयास सादर करावे. जे कर्मचारी दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणार नाहीत त्याचा दिव्यांग भत्ता अदा करण्यात येणार नाही.या यादीतील दोन कर्मचारी खऱ्या अर्थाने वास्तव दिव्यांग असल्याची खात्रीशीर माहिती असून आणखी एका महिला कर्मचाऱ्याने दिव्यांग असल्याबाबतचा प्रस्ताव सादर केल्याचे समजते.
काय आहे प्रकार:सुदृढ शरीर यष्टी असली तरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र मिळते ही कुख्याती आहे.त्यातच संशयित कर्मचाऱ्यांचे डॉक्टरांशी लागेबांधे असल्याने व ते सिव्हिलचेच कर्मचारी असल्याने या कर्मचाऱ्यांनी बोगस अपंगाचे सर्टिफिकेट बनवून घेतले व जिल्हा रुग्णालयातील कार्यालयात सर्टिफिकेट सादर करून शासनाच्या सुख सुविधांचा लाभ घेत आहेत. परंतु शासनाच्या नियमानुसार त्यांनी यु डी आयडी कार्ड अद्याप पर्यंत काढलेले नाही. तसेच निलेश जालिंदर निकम यांनी कानाचे बोगस सर्टिफिकेट आणून नोकरी मिळवली असल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. निलेश निकम यांनी वडिलांच्या मदतीने मुंबईहून हे प्रमाणपत्र प्राप्त केल्याची चर्चा आहे. निकम हे नाशिकचे स्थानिक रहिवासी असतानाही त्यांनी मुबंईहून प्रमाणपत्र मिळविल्याने संशय अधिक गडद झाला आहे. हे एकच प्रकरण नाही, निकम यांनी अनेकांना असे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सहाय्य केल्याचीही चर्चा आहे.जालिंदर निकम हे टक्केवारी घेऊन जिल्हा रुग्णालयामध्ये बोगस सर्टिफिकेट व मेडिकल बिल मंजूर करुन देण्याच्या प्रक्रियेत महत्वाचा दुवा असल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाने जिल्हा चिकित्सकांना दिलेल्या निवेदनात केला आहे.हे संशयित कर्मचारी दिव्यांग नसतानाही पगारासोबत दिव्यांगाना मिळणाऱ्या इतर भत्ता व तत्सम सवलती मिळवीत आहेत.