नाफेडच्या भ्रष्टाचाराबाबत योग्य ती कारवाई करा,अन्यथा मोठे जनआंदोलन; शेतकरी संघर्ष सभेचा इशारा
नाफेडच्या भ्रष्टाचाराबाबत योग्य ती कारवाई करा,अन्यथा मोठे जनआंदोलन;
शेतकरी संघर्ष सभेचा इशारा
नाशिक प्रतिनिधी
शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करतांना नाफेडकडून विविध प्रकारचे गैर प्रकार झाल्याच्या तक्रारी असतांना त्याची शहानिशा झाली नाही. या संदर्भात प्रशासनाने कुठलेही पाऊले उचलले गेले नाही, त्या अनुषंगाने शेतकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारी पुन्हा निवेदन देऊन या भ्रष्टाचाराची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीने जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.
या संदर्भात शेतकरी संघर्ष समितीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाबाबत करण गायकर यांनी अधिक माहिती दिली.
करण गायकर म्हणाले,शेतकरी संघर्ष सभा,नाशिक, गेल्या ६-७ महिन्यांपासून नाफेडच्या भ्रष्टाचाराबाबत आपली भूमिका स्पष्ट करत आहे. याबाबतचे निवेदन, ऑगस्ट-सप्टेंबर २०२४ मध्येही सादर केले होते.परंतु,अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नाही.
नाफेडने यावर्षी नाशिक जिल्ह्यातून ४.७० लाख मेट्रिक टन उन्हाळ कांदा खरेदी केल्याचा दावा केला आहे.तथापि,त्यातील ५०% देखील बफर स्टॉकमध्ये उपलब्ध नसल्याचे आम्ही निदर्शनास आणून दिले आहे. ग्राहकांसाठी कांदा स्वस्त व वाजवी किमतीत उपलब्ध होण्यासाठी नाफेडने हमी भावात खरेदी केलेला कांदा विक्रीस उपलब्ध करून देणे अपेक्षित होते. मात्र, सध्या बाजारात ५०-८० रुपये प्रति किलो दराने कांदा विक्री होत आहे,हे नाफेडच्या व्यवस्थापनातील गंभीर त्रुटीचे द्योतक आहे.
५ डिसेंबर रोजी लासलगाव येथून नाफेडमार्फत विक्रीसाठी पाठवण्यात येणाऱ्या कांद्याची पाहणी केली असता,उन्हाळ कांद्याऐवजी सुमार दर्जाचा हिवाळी कांदा (लाल कांदा) पाठवला जात असल्याचे आढळून आले.हे नाफेडच्या बफर स्टॉकमध्ये असलेल्या कांद्याच्या अभावाचे आणि नियमबाह्य खरेदीचे स्पष्ट उदाहरण आहे.
ही परिस्थिती नाफेडचे अधिकारी, एफपीओ कंपन्या,आणि भ्रष्ट राजकीय पुढाऱ्यांच्या संगनमतामुळे झालेल्या मोठ्या घोटाळ्याकडे निर्देश करते. यामुळे,जनतेचा पैसा लुबाडला गेला असून,यावर त्वरित कारवाई आवश्यक आहे. संबंधित अधिकारी शेतकऱ्यांना माहिती देण्यास नकार देत आहेत आणि धमक्या देत आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या संतापाला खतपाणी मिळत आहे.
या आहेत मागण्या:
१. नाफेडच्या बफर स्टॉकची पुन्हा ऑडिट करावी.
२. नाफेड, एफपीओ कंपन्या, आणि संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.
३. ग्राहकांना परवडणाऱ्या दरात गुणवत्तापूर्ण कांदा उपलब्ध करून द्यावा.
या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत,तर शेतकरी संघर्ष सभेसह सर्व शेतकरी संघटनांना एकत्र घेऊन मोठे जनआंदोलन छेडण्यात येईल.असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.
यावेळी निवेदन देताना सुनील मालुसरे,सचिन मालेगावकर,प्रभाकर धात्रक, करण गायकर,नानासाहेब बच्छाव,किरण सानप,विजय पाटील,नवनाथ शिंदे,धर्मराज शिंदे,अशोक गायधनी,मिलिंद वाघ,वैभव दळवी आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.