सेनापतीच्या प्रामाणिक इच्छाशक्तीने सैन्याच्या बाहुत संचारले बळ ; सावकारीच्या पाठीवर कायद्याच्या आसुडाचे वळ!!
सेनापतीच्या प्रामाणिक इच्छाशक्तीने सैन्याच्या बाहुत संचारले बळ ;
सावकारीच्या पाठीवर कायद्याच्या आसुडाचे वळ!!
आपली दुनियादारी /नाशिक
नाशिक शहर आणि जिल्ह्यातच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्र पोलिसांच्या कर्तव्याचे पारायण व्हावे अशी उल्लेखनीय कामगिरी नाशिक शहर पोलिसांनी केल्याची चर्चा प्रसार माध्यमांवर दिवसभरापासून सुरु आहे. शहरातील नामचिन सावकारीचा बुरखा फाडणारी ही कारवाई केवळ उल्लेखनीय नाही तर आयुक्तालयाच्या इतिहासात अपवादात्मक असल्याने या कारवाईचे जेव्हढे कौतुक करावे तेव्हढे कमीच आहे. एका बाजूला ही कारवाई होत असताना याच आयुक्तालयात खाकीत दडलेला एक गुन्हेगार देखील खड्यासारखा बाजूला काढल्याने आयुक्तालयाच्या शिरपेचात कारवाईचा आणखी एक तुरा खोवला गेला आहे. खरे तर हे दोन्ही प्रकरणे अलीकडचे नाहीत, तर वर्षानुवर्षे आयुक्तालयाच्या भिंतींना लटकलेली ही जळमटे दूर करण्याची प्रामाणिक इच्छाशक्ती दाखवली गेली नाही, जी आत्ता दाखवली गेली. म्हणूनच या कारवाईचे सारे श्रेय आयुक्तालयाचे सरसेनापती पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या प्रामाणिक इच्छाशक्तीलाच जाते.
सैन्य कितीही पराक्रमी असले तरी सेनापतीकडे इच्छाशक्ती नसेल तर पराक्रमी सैन्याला तलवारी म्यान कराव्या लागतात, हा आजवरचा आयुक्तालयाचा अनुभव आहे.
मी मी म्हणणारे अनेक सेनापती या आयुक्तालयाच्या सहवासात राहून गेले, मात्र काही सन्माननीय अपवाद, त्यांची एखाद दुसरी प्रातिनिधिक कारवाई, असा अपवाद सोडला तर अशा घाऊक कारवाया करून मुजोर सावकारांना रस्त्यावर आणण्याचे धाडस कुणाही सेनापतीने दाखवले नाही. याचा अर्थ त्यांच्याकडे धाडस नव्हते असे नाही. धाडस होते, इच्छाशक्तीही होती. मात्र वर्दीशी इमान राखून, सावकारीच्या फासात लटकलेली सामान्य माणसाची मान सोडवण्याची प्रामाणिक इच्छाशक्ती नव्हती. होती ती मायारूपी आसक्ती. म्हणून आजवर या बड्या सावकारांवर कारवाई करण्याचे पाऊल उचलले गेले नाही.
संदीप कर्णिक यांनी आयुक्तालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर सर्वच घटकांचा अभ्यास करून त्यात्या पातळीवर कायदा सुव्यवस्था दोरीत आणण्याचे काम त्यांनी हाती घेतले. माणूस म्हणून वेगळे व्यक्तिमत्व आणि आयुक्त म्हणून वेगळे असा संगम असणारा अधिकारी बऱ्याच कालावधी नंतर शहराला लाभला.व्यक्तिमत्वाचा ठाव सहजासहजी सापडणे कठीण. एखाद दुसऱ्या भेटीत तर शक्य नाही. मात्र सेनापतीची खरी ओळख त्याच्या सैन्यावरून होते, हे ऐतिहासिक सत्य अलीकडच्या काळात खऱ्या अर्थाने नाशिककरांना उमजू लागले आहे.
नाशिक शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तेरा खासगी सावकारांच्या घरी नाशिक पोलिसांनी सह उपनिबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांसह छापासत्र राबवले. यामध्ये आठ सावकारांकडून जवळपास चाळीस लाख रुपये, करारनामे, कोरे चेक, खरेदी खत, पैसे मोजण्याचे मशीन, अमेरिकन डॉलर, कोरे स्टॅम्प असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या खासगी सावकारांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या कारवाईमुळे शहरातील खासगी सावकारांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. शहरात एव्हढ्या मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदाच कारवाई झाल्याने हे घबाड सापडले. या कारवाईतील संशयितांची नावे पहिल्यानंतर आजपर्यंत कारवाई का झाली नाही याचेही उत्तर सापडते. यातील अनेकांच्या विरोधात यापूर्वी अनेक तक्रारीही झाल्या आहेत. मात्र पोलिस खात्यात आणि निबंधक कार्यालयात या सावकारांनी निर्माण केलेले हितसंबंधांचे बॅरिकेड्स अडथळा निर्माण करीत होते. ते बॅरिकेड्स सर सेनापतींनी हटवल्याने सैन्याला आपले कसब दाखवता आले.खासगी सावकारांच्या जाचाला न जुमानता थेट पोलिसांशी संपर्क करण्याचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचे आवाहन भविष्यातील प्रवासाची दिशा दाखवण्यास पुरेसे आहे.
गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरातील खासगी सावकारी चांगलीच चर्चेत आली होती. या खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून काही नागरिकांनी आपली जीवनयात्रा संपवली होती. मुद्दल पेक्षा व्याज जास्त झाल्याने कर्ज फेडायचे कसे यासाठी अनेकांना आपले घरदार, वाहने, जमीन, शेती सावकारांच्या घशात घालावी लागली होती. इतके करून देखील सावकारांची मागणी कमी होत नसल्याचे काही दाखल गुन्ह्यांवरून सिद्ध झाले होते. त्यामुळे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी खासगी सावकारीविरोधात कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली. खासगी सावकारी करणाऱ्या वैभव देवरे याच्या पत्नीसह टोळीला थेट मोक्का लावत एक धडाकेबाज कारवाई करून दाखवण्याचे साहस दाखवले होते. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांविषयी झालेल्या आपल्या मतात बदल करून खासगी सावकारांविरोधात तक्रार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी कैलास कुंडलवाल, रोहित कुंडलवाल, निखिल कुंडलवाल या पितापुत्रांविरोधात खासगी सावकारी प्रकरणात गुन्हे दाखल करीत रोहित कुंडलवाल याच्या मुसक्या आवळत त्याला कारागृहाची हवा खायला पाठवले.
शनिवार दि. ५ रोजी सकाळपासून शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खासगी सावकारांच्या घरी जिल्हा उपनिबंधक कार्याकायातील अधिकाऱ्यांसोबत छापासत्र सुरु केले. यामध्ये नय्या खैरे याच्या घरी छापा टाकून १२ करारनामे, १९ चेक, २१ लाख पन्नास हजार रुपये रोख, संजय शिंदे याच्या घरातून ८१ कोरे चेक, ४० खरेदी खत, ६ लेजर बुक, चार डायऱ्या, ३ लाख २० हजार ५०० रुपये रोख रक्कम, पैसे मोजण्याचे मशीन, प्रकाश अहिरे याच्या घरातून २३ रजिष्टर कागदपत्र, ४ लाख ५० हजार रुपये रोख, साडेसात लाख रुपयांचे ८८ अमेरिकन डॉलर, सुनील पिंपळे याच्या दोन घरांची आणि तीन दुकानांची झडती घेत ११ खरेदीखत, दोन साठेखत, एक कब्जा पावती, पाच कोरे स्टँप, २४ कोरे चेक, दोन हात उसनवार पावत्या, ४ लाख ८ हजार रुपये रोख, गोकुळ धाडा याच्या घरातून ५० उसनवार पावत्या, दोन खरेदी खत,७० कोरे चेक, धनु लोखंडे याच्या घरातून ५० खरेदीखत, १२ कोरे चेक, राजेंद्र जाधव याच्या घरातून दोन डायऱ्या २ लाख ३ हजार ३५० रुपये रोख तर कैलास मैंद याच्या घरातून दोन कोरे चेक, एक एमओयू, ९ खरेदीखत असा मुद्देमाल पोलीस अधिकाऱ्यांसह उपनिबंधक अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतला आहे. या सर्वांविरोधात महाराष्ट्र सावकारी अधिनियम सन २०१४ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर गुरुदेव कांदे, जुबेर पठाण, कैलास मुदलियार, सचिन मोरे आणि रोहित चांडोळे यांच्या घराच्या झडतीमध्ये अवैध सावकारी व्यवसायाबाबत काहीही आढळून आले नसल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनावणे, विलास श्रीमनवार, अशोक गिरी, जगवेंद्र राजपूत, आंचल मुदगल, सुनील पवार, सचिन खैरनार, जितेंद्र सपकाळे, रणजित नलवडे यांनी आपल्या सहकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह केली आहे. यातील एखाद दुसरा चेहरा सोडला तर बहुतेक इतरांच्या तुलनेत शहरासाठी नवीन आहेत. या कारवाईसाठी निवडलेली टीम देखील विचार करून निवडली असल्याचे लक्षात येते. याचा अर्थ आयुक्तालयात असलेले इतर अधिकारी निष्क्रिय आहेत असे अजिबात नाही मात्र विशिष्ट प्रवृत्तीला बाजूला ठेवण्यासाठी कधी कधी कर्तृत्वालाही इच्छा नसताना प्रवाहातून बाहेर ठेवावे लागते, यामुळे कदाचित अन्य अधिकाऱ्यांचा या कारवाईसाठी विचार झाला नसावा. कदाचित दुसऱ्या कारवाईसाठी त्यांना संधी दिली जाऊ शकते. मात्र पोलिस आयुक्तांनी प्रामाणिक इच्छाशक्ती दाखवल्याने अधिकारी कर्मचाऱ्यांना छापा कारवाई करणे सोपे झाले. आणि अवैध सावकारीची नैय्या कायद्याच्या किनाऱ्यावर आणून नांगरली गेली हे मात्र नक्की.
: यापूर्वी नाशिकमध्ये अनेकांनी आत्महत्या करीत संपूर्ण कुटुंब संपवले आहे. तर अनेकांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत अनेकदा पोलीस ठाण्यांच्या पायऱ्या झिजवून देखील काही उपयोग होत नव्हता. उलट पोलिसांकडूनच खाजगी सावकारांना तक्रारदाराबद्दल माहिती पुरवली जात होती. त्यामुळे या खासगी सावकारांविरोधात पोलिसांकडे जाण्याचे धाडस कोणीही करीत नव्हते. मात्र, सध्या असलेले पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नागरिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण केल्याने खासगी सावकाराला कंटाळलेले नागरिक पुढे येऊ लागले आणि कारवाई होण्यास सुरुवात झाली आहे.



