सजग नेटकरी आणि निर्लज्ज राजकारणी! राजकारणातील निर्लज्ज, मुजोरीवर शब्दांचे वार!!
सजग नेटकरी आणि निर्लज्ज राजकारणी!
राजकारणातील निर्लज्ज, मुजोरीवर शब्दांचे वार!!
☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️
मराठी संस्कृती जतन करा
……………………………………………………………………
कुमार कडलग /नाशिक
वय वाढलं की अक्कल येते अशी ढोबळ धारणा आहे. कुठलीही गोष्ट जेव्हढी जुनी होत जाते, तेव्हढी ती अधिक मजबूत, टिकाऊ आणि उपयोजिता मूल्य अधिक असल्याचे मानले जाते. अपवाद केवळ नाशिवंताचा. हेच गृहीतक लोकशाहीशी घासून पाहिले तर पंचाहत्तर वर्ष वय झालेली आपली लोकशाही प्रगल्भ झाली असे मानायला हरकत नाही. इतकेच नाही तर या लोकशाहीचे पाईक म्हणविणारे नेते, जनता आणि चारही आधार स्तंभ देखील तितकेच प्रगल्भ म्हणून शहाणे झाले असे मानावे का? वास्तव चित्र मात्र भयानक आणि भेसूर आहे. या सर्वांचे उपयोजिता मूल्य अधिक आहे असे म्हणण्याचे धाडस होत नाही, उलट पक्षी हे सारे घटक लोकशाहीला उपद्रवी म्हणून नाशिवंत या वर्गात मोजावे लागतील. आणि अशा काळात काळाच्या पडद्या आड गेलेल्या “त्या” राजकीय नेत्यांची हटकून आठवण काढावीच लागते.
……………….
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर पोलिस प्रशासनाला धारेवर धरण्याचे प्रयत्न दोन्ही बाजूने सुरु आहेत. मात्र संतोष देशमूख यांच्या हत्येला जबाबदार असलेले आर्थिक राजकारण आणि त्याला पाठीशी घालणारे राजकारणी यांना विशेषतः सत्ताधारी पक्षाकडून सोयीस्कर पणे अभय दिले जात आहे. संतोष देशमुख यांची प्रत्यक्ष हत्त्या ज्यांनी केली, त्या नतद्रष्ट प्रवृत्तीना उशिरा का होईना अटक केली झाली असली तरी संतोष देशमुख यांची हत्या ज्या कारणावरून झाली ते खंडणी प्रकरण, खंडणी त्या गुन्हेगारांना परावृत्त करणारे मेंदू आणि त्या मागचे राजकारण, राजकारणी सोयीस्कर रित्या दुर्लक्षित करावे यासाठी एक घटक सातत्याने व्यवस्थेवर आणि न्यायाची याचना करणाऱ्या चळवळीवर दबाव आणण्याचा नटद्रष्ट पणा करीत आहे.
संतोष देशमुख आणि परभणीचा सोमनाथ हे दोन जीव गेल्यानंतर देखील सत्ताधाऱ्यांमधील माणूस हालचाल करीत नाही, या गोष्टीचे दुःख मिश्रित आश्चर्य वाटत आहे. खरे तर बीड यां जिल्ह्याला एक मोठी राजकीय परंपरा आहे. या परंपरेचा वारसा सांगणारे मुंडे घराण्यातील भाऊ बहिणीच्या राजकारणा सभोवताल फिरणाऱ्या अलीकडच्या या घटना आणि त्यानंतर सुरु असलेले राजकारण पहिल्यानंतर राजकीय मंडळी सत्तेसाठी किती आसूसलेली आहे हे लक्षात येते. खरं तर आसूसलेल्या पेक्षा सत्तेच्या बाहेर पडल्यानंतर होणारी अवस्था त्यांच्या लक्षात येत असल्यानेच या घटनांवर आणि एकूण परिस्थितीवर व्यक्त होत नाहीत. त्याहून पलीकडे नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याचे कर्तव्य देखील विसरले ते भीतीपोटीच. त्यांनी घेतलेली निष्ठुर भूमिका अन्याया विरुद्ध सुरु झालेल्या चळवळीला बळ देत असून ज्यांना प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी होता येत नाही, ते आपल्या संतप्त भावना एक्स, फेसबुक, इन्स्टा,यु ट्यूब, व्हाट्स ऍप अशा समाज माध्यमातून व्यक्त करू लागले आहेत.
अनेक नेटकरी संतप्त झाले असून आपल्या भावनांना वाट करून देतांना या नेटकाऱ्यांनी राजकारणाची अक्षरशः लाज काढली आहे.
सामान्य नेटकरी व्यथित आहेतच, पण विचारवंत देखील संतप्त आहेत.
निर्भय बनोचे प्रमुख आधार स्तंभ विश्वम्बर चौधरी म्हणतात, धनंजय मुंडेंचा राजीनामा आरोप सिद्ध होईपर्यंत घेणार नाही हे अजितदादांचं विधान अत्यंत अनैतिक आहे.
गुन्हा सिद्ध झाला तर नैतिक राजीनामा घेऊन तुम्ही लोकशाहीवर असा कोणता उपकार करणार? गुन्हा सिद्ध झालाच तर कायद्यानं राजीनामा द्यावाच लागेल.
लाल बहादूर शास्त्रींचं सोडा. त्यांचं नाव पण घेण्याची लायकी आजच्या राजकीय व्यवस्थेची नाही पण या महाराष्ट्रात काय कमी उदाहरणं आहेत?
बॅ. अब्दुल रहेमान अंतुले (मुख्यमंत्री) यांच्यावर सिमेंट घोटाळ्याचा आरोप झाल्याबरोबर त्यांनी राजीनामा दिला. त्यांचा गुन्हा सिद्ध झाला होता का?
बॅ. रामराव आदिकांवर (उपमुख्यमंत्री) एअर होस्टेसची छेडखानी केल्याचा आरोप झाला, त्यांनी राजीनामा दिला. गुन्हा सिद्ध झाला होता का?
Advertisementशिवाजीराव पाटील निलंगेकर (मुख्यमंत्री) यांच्यावर मुलीचे गुण परिक्षेत वाढवल्याचा आरोप झाला, त्यांनी राजीनामा दिला. गुन्हा सिद्ध झाला होता का?
मनोहर जोशी (मुख्यमंत्री) यांच्या जावयाचं बांधकाम प्रकरण उजेडात आलं, त्यांनी राजीनामा दिला. त्यांचा गुन्हा सिद्ध झाला होता का?
अगदी अलिकडे अशोकराव चव्हाण (मुख्यमंत्री) यांच्यावर आदर्शमध्ये आरोप झाला. त्यांनी राजीनामा दिला. गुन्हा सिद्ध झाला होता का?
बबनराव घोलप, महादेव शिवणकर, शशिकांत सुतार, सुरेशदादा जैन यांनी आरोप झाल्यावर मंत्रीपदाचे राजीनामे दिले. त्यांचे गुन्हे सिद्ध झाले होते का? कधी?
तेलगी प्रकरणी आरोप झाल्यावर भुजबळांना राजीनामा द्यावा लागला होता. गुन्हा सिद्ध झाला होता का?
सिंचन घोटाळ्याचे आरोप झाल्यावर प्रितीसंगमावर आत्मक्लेश करत स्वतः अजित पवारांनी नैतिक जबाबदारी घेत राजीनामा दिला होता. तेव्हा गुन्हा सिद्ध झाला असं दादांना मनोमन वाटलं होतं का?
या राज्यात एक आरोपी इतका डाॅन होतो की पोलीस हात लावू शकत नाहीत, तो सरेंडर होऊन उपकार करतो. त्याचे मंत्र्यांशी थेट आर्थिक संबंध आणि व्यावसायिक संबंध उघडउघड दिसतात, त्याची सर्वांशी जवळीक खालील फोटोतून जनतेला दिसते तरी गुन्हा सिद्ध होईपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार नाही असं दादा म्हणतात? वा रे नैतिकता आणि वा रे लोकशाही!
नैतिक आधारावर राजीनामा हे तुमचे जनतेवर उपकार नसतात. एखाद्याचे लागेबांधे जगजाहीर झाल्यावर चौकशी यंत्रणा आणि न्याय यंत्रणेवर बलाढ्य मंत्री दबाव आणू शकतो आणि त्यातून पिडीताला न्याय मिळत नाही म्हणून राजीनामा घ्यायचा असतो. बाहुबलीच्या भुजेतलं राजकीय बळ काढल्याशिवाय सामना बरोबरीचा होणार नाही आणि न्यायही मिळणार नाही म्हणून राजीनामा घ्यायचा असतो.
अर्थात दादा, फडणवीस, शिंदे, मुंडे यांनी आता नैतिकतेच्या व्याख्याच बदलल्या असतील तर तो त्यांचा दोष नाही. त्यांना प्रचंड बहुमत देणाऱ्या मतदारांचा आहे असं मला वाटतंय.
अभिनेता किरण माने यांनीही आपल्या तीव्र भावना व्यक्त करतांना, जनतेने, त्याहूनही प्रसार माध्यमांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच लक्ष करून विचारणा करायला हवी.गृहमंत्री म्हणून कायदा सुव्यवस्थे संदर्भात ते सपशेल अपयशी ठरलेत असे ठाम पणे गृहमंत्र्यांना का विचारले, सांगितले जात नाही. हे किरण माने यांनी माध्यमांना उद्देशून म्हटलं आहे.
या सोबत काही नेटकऱ्यांनी आर. आर. आबांच्या आठवणी जाग्या केल्या आहेत.
आबा तुमच्यासारखी माणस आता होणार नाहीत.!
शब्द चुकले म्हणून गृहमंत्री पदाचा तुम्ही राजीनामा दिला होता. तुम्ही राजीनामा दिला तेव्हा महाराष्ट्रामध्ये तुमची जात आडवी लागली नाही. तुमच्या जातीचे म्हणून आम्ही तुमची बाजूही घेतली नाही. पण आबा आज खून आणि खंडणी चे प्रकरण झालं , आणि जनतेने राजीनामा मागितला , विरोधक आणि मित्र पक्षांनी जर राजीनामा मागितला , तर ते जातीमुळे राजीनामा मागत आहे असा बाष्कळ पणा आज पसरत आहे.
आबा तुमच्या विचारांचे लोक पण राहिले नाही , आणि जनतेला पण आता राजकारण्यांकडून काही अपेक्षा राहिली नाही.
जिथे विचारांचे मृत्यू पडतात , तिथे शरीराचं काय घेऊन बसलात ………….
आता राहिले ते फक्त मुडदे……….
आबा सलाम तुमच्या कर्तुत्वाला!!
काही निर्लज्ज या प्रकरणाला जातीय वळण देऊ लागले आहेत. परभणीचा सोमनाथ असेल किंवा मस्साजोगचे संतोष देशमुख असतील यांनी जात म्हणून समाजसेवा केली का?त्यांच्या हत्येला हे कारण घडले ते परभणीचे प्रकरण असो किंवा खंडणीखोरांनी केलेला हैदोस थोपविण्यासाठी संतोषने घेतलेली भूमिका असो, हे सारे जातीच्या पलीकडे होते. आता या प्रकरणातील विशेषतः मस्साजोग प्रकरणातील सारे संशयित एकाच प्रवर्गाचे, ते ज्या नेत्यांसाठी, कार्यकर्ते म्हणून काम करीत होते ते त्यांच्याच प्रवर्गाचे यातून विशिष्ट प्रवर्गाची दहशत निर्माण केली. मग जातीय वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न कोण करीत होते, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. कुण्या एके काळी, मराठा समाजातील काही निवडक जमीनदार दीन दुबळ्या समाजावर जो अन्याय अत्याचार करीत होते, त्याचीच ही बीड आवृत्ती. फक्त प्रवर्ग बदलला इतकंच.