मालेगावातील व्यापा-याची लुटमार करणारी सराईत टोळी गजाआड; नाशिक एलसीबीची कामगिरी ; ११ लाखाहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त, ८ दिवसांची पोलिस कोठडी
मालेगावातील व्यापा-याची लुटमार करणारी सराईत टोळी गजाआड;
नाशिक एलसीबीची कामगिरी ; ११ लाखाहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त, ८ दिवसांची पोलिस कोठडी
नाशिक प्रतिनिधी
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या पथकाने एका जबरी दरोड्याच्या गुन्ह्याची कसोशीने उकल केली असून पाच संशयितांना ताब्यात घेत तब्बल ११ लाख २५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. संशयितांना आठ दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.
दि. २३/०३/२०२५ रोजी रात्रीचे सुमारास मालेगावातील संकेत ट्रेडिंग कंपनीचे व्यापारी मनोज मुथ्था व त्यांचे भाऊ कारने मुंबई आग्रा महामार्गावरून मालेगाव शहराकडे जात असतांना, अज्ञात ०६ आरोपींनी संगणमत करून त्यांची कार थांबवली. त्यांना शिवीगाळ करून, कोयत्यासारख्या हत्याराचा धाक दाखवीत, कारच्या काचा फोडल्या. आणि २५,००,०००/- रू.ची रोकड,खरेदी विक्रीचे रजिस्टर जबरीने घेवुन पळून नेले. याविषयी मालेगाव किल्ला पोलीस ठाण्यात गुरनं ५७/२०२५ भा.न्या.सं. कलम ३१०(२), ३२४(४), ३५२, ३(५), ६१ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांचे मार्गदर्शनानुसार मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक तेगबिर सिंह संधु, सहा. पोलीस अधीक्षक मालेगाव कॅम्प विभाग सुरज गुंजाळ, मालेगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी तात्काळ घटनास्थळावर भेट देवुन घडलेल्या परिस्थितीची पाहणी केली. सदर घटनेतील अज्ञात आरोपींचा शोध घेणेसाठी वरिष्ठांचे मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, किल्ला पोलीस ठाण्याचे पोनि शिवाजी डोईफोडे व विशेष तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सुचना देण्यात आल्या होत्या.त्यानुसार पोलीस पथकांनी आरोपींचे वर्णन व त्यांची गुन्हा करण्याची पध्दत, तसेच त्यांनी गुन्हा करतांना वापरलेल्या मोटर सायकलींचा माग काढुन गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेतली असता, यातील गुन्हेगार हे मालेगाव शहर व नजीकचे गावांतील असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती. त्यावरून तपासाची चक्रे फिरवुन पोलीस पथकांनी ६ सराईत गुन्हेगारांना निष्पन्न केले आहे.
त्यापैकी अटक करण्यात आलेले ५ आरोपीतांना विश्वासात घेवुन सखोल चौकशी केली असता संशयितांनी गुन्ह्याची कबुली देत गुन्हा कसा केला याचे वर्णन केले. घटनेच्या दिवशी संगणमत करून, फिर्यादी त्यांच्या किराणा दुकानातील रोख रक्कम घेवुन घरी जात असतांना, गाडीला कट मारल्याचा बनाव करीत त्यांची कार थांबवून धारदार कोयत्याने काचा फोडल्या, त्यानंतर त्याच कोयत्याचा धाक दाखवुन फिर्यादीकडील रोख रक्कम जबरीने चोरून नेल्याची कबुली दिली.या आरोपींच्या ताब्यातून गुन्हयातील चोरून नेलेल्या रकमेपैकी ७,२०,५००/- रूपये रोख व चोरीच्या पैशांतुन विकत घेतलेला ५५,०००/- रूपये किंतीचा .आयफोन मोबाईल तसेच गुन्हयात वापरलेल्या दोन पल्सर मोटर सायकल व एक स्कुटी असा एकुण ११,२५,५००/- मुद्देमाल जप्त करण्यात आला. यातील आरोपीतांना वरील गुन्हयात अटक करण्यात आली असून, त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची ८ दिवस पोलीस कोठडी मंजुर करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांचे पथक करीत आहे.
यातील आरोपी हे नाशिक ग्रामीण जिल्हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असुन त्यांचेविरूध्द यापुर्वी, मालेगाव तालुक्यातील छावणी, किल्ला, वडनेर खाकुर्डी पो.स्टे. तसेच धुळे जिल्हयातील मोहाडी पोलीस ठाणे येथे खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी, चोरी, दुखापत, पॉक्सो, आर्म अॅक्ट यासदराखाली अनेक गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपी हे मालाविरूध्द व शरिराविरुध्द गुन्ह्य करणारे सराईत गुन्हेगार असुन त्यांचेकडून वरील गुन्हयाचे तपासात आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, किल्ला पोलीस ठाण्याचे पोनि शिवाजी डोईफोडे, स्थागुशाचे पोउनि दत्ता कांभीरे, पोउनि हर्षल भोळे, पोहवा गिरीष निकुंभ, सचिन देसले, शरद मोगल, सुभाष बोपडा, नरेंद्र कोळी, योगेश कोळी, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, किशोर बोडके, रोहित पगारे, विशेष तपास पथकातील अंमलदार दिनेश शेरावते, सचिन बेदाडे, राकेश जाधव, राम निसाळ, किल्ला पो.स्टे. चे अंमलदार सचिन भामरे, पंकज भोये, विशाल तावडे, संदिप राठोड, प्रसाद देसले यांचे पथकांनी वरील दरोडयाचा गुन्हा उघडकीस आणला.