शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेच्या उत्तर महाराष्ट्र संपर्क समन्वयकपदी ऍड अक्षय कलंत्री यांची नियुक्ती
शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेच्या उत्तर महाराष्ट्र संपर्क समन्वयकपदी ऍड अक्षय कलंत्री यांची नियुक्ती
नाशिक | प्रतिनिधी
शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेच्या उत्तर महाराष्ट्र संपर्क समन्वयकपदी नाशिकचे श्री. अक्षय कलंत्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री ना. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या हिंदुत्ववादी विचारसरणीच्या प्रेरणेने शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना कार्यरत आहे. नव्याने नियुक्त झालेल्या अक्षय कलंत्री यांनी संघटन विस्तार, अध्यात्मिक विचारांचा प्रचार-प्रसार आणि शिवसेना पक्ष बळकटीसाठी कार्य करण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
या पदाचा कार्यकाल एक वर्षाचा असून, नियुक्तीपत्रात संघटनात्मक कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच केलेल्या कार्याचा मासिक अहवाल सादर करण्याची जबाबदारीही देण्यात आली आहे.
नियुक्तीनंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून विविध स्तरातून अक्षय कलंत्री यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कोण आहेत अक्षय कलंत्री
कायद्याचे पदवीधर असलेले ऍड अक्षय कलंत्री हे नव्या पिढीतील उमदे नेतृत्व असून विशेषतः आध्यत्मिक क्षेत्राच्या माध्यमातून सामाजिक सुधारणा आणि नव्या पिढीत संस्कार संस्कृती रुजविण्याचे काम त्यांनी हाती घेतले आहे. विश्व् कीर्तिमान स्थापित असलेल्या श्री कपालेश्वर देवस्थानच्या माध्यमातून भक्ती आणि शक्तीचा सुमिलाफ घडवून आणता येतो हा संदेश ते आपल्या कृतीतून देतात.
नाशिकच्या धार्मिक आणि सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग असलेल्या कपालेश्वर देवस्थानाच्या कार्यपद्धतीत गेल्या काही काळात बदल जाणवत असल्याची चर्चा सुरू आहे. या बदलांच्या केंद्रस्थानी अध्यक्ष म्हणून अक्षय कलंत्री यांची भूमिका निर्णायक ठरली आहे.
धार्मिक स्थळ म्हणजे केवळ पूजा-अर्चा आणि श्रद्धा यापुरते मर्यादित नसते; व्यवस्थापन, पारदर्शकता आणि भक्तांसाठी सुविधा या बाबी तितक्याच महत्त्वाच्या असतात. अध्यक्ष म्हणून कलंत्री यांनी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन, कार्यकर्त्यांचा समन्वय आणि अध्यात्मिक उपक्रमांना चालना देण्याचा प्रयत्न केला असल्याचे समर्थक सांगतात. उत्सव व्यवस्थापन, भक्तांसाठी सुविधा वाढविणे आणि मंदिर परिसरात शिस्त आणण्याचे काही प्रयत्नही दिसून आल्याचे मत व्यक्त केले जाते.
मात्र दुसरीकडे, धार्मिक संस्थांमध्ये वाढता राजकीय प्रभाव हा वादाचा विषय ठरत आहे. मंदिर व्यवस्थापनात संघटनात्मक किंवा राजकीय विचारसरणी कितपत येऊ द्यावी, यादिशेनेही ऍड कलंत्री विशेष प्रयत्नशील असल्याचे दिसते. स्थानिकांच्या मते, धार्मिक मंचांचा वापर सामाजिक आणि राजकीय प्रभाव वाढवण्यासाठी केला जात असल्याची चर्चा आहे. अशा परिस्थितीत समन्वयक म्हणून कलंत्री पारदर्शकता, सर्वसमावेशकता आणि धार्मिक संस्थेची निष्पक्षता जपण्यासाठी ते स्वतःला उत्तरदायी मानतात.
शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेच्या उत्तर महाराष्ट्र संपर्क समन्वयक म्हणून आगामी काळात कपालेश्वर देवस्थानच नाही तर उत्तर महाराष्ट्रातील धार्मिक अध्यात्मिक चळवळीत मोठे बदल दिसून येतील याविषयी सकारात्मक भावना व्यक्त होत आहेत.



