क्राईम

जागा झालेला सामान्य माणूसच सत्तेचे घर उन्हात बांधू शकतो! उन्हात जरांगे पाटील बसले,… चटके मात्र सत्तेला!!


जागा झालेला सामान्य माणूसच सत्तेचे घर उन्हात बांधू शकतो!

उन्हात जरांगे पाटील बसले,… चटके मात्र सत्तेला!!
……………….कुमार कडलग, नाशिक…………………..
महाराष्ट्राच्या राजकारणात आंदोलने नवीन नाहीत. मोर्चे, धरणे, उपोषणे आणि घोषणा यांची परंपरा राज्याने अनेकदा पाहिली आहे. मात्र काही आंदोलने अशी असतात की ती केवळ एखाद्या मागणीपुरती मर्यादित राहत नाहीत. ती सत्तेला आरसा दाखवतात. ती लोकशाहीतील खऱ्या मालकाची ओळख करून देतात. मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन हे अशाच आंदोलनांपैकी एक ठरले आहे.
भर उन्हात एक माणूस बसतो. अंगावर उन्हाचे चटके झेलतो. डोक्यावर सत्तेचे छत्र नसते, पदाचा रुबाब नसतो, सरकारी यंत्रणेची ताकद नसते. पण त्याच्या मागे उभा असतो जनतेचा महासागर. मग त्या उन्हाचे चटके केवळ त्या व्यक्तीला बसत नाहीत; ते थेट सत्तेच्या भिंतींवर जाऊन आदळतात.
ग्रामीण भागात एक वाक्य नेहमी उपहासाने किंवा धमकीच्या सुरात म्हटले जाते, “तू काय माझं उन्हात घर बांधणार आहेस का?” या वाक्याचा अर्थ असा असतो की तू माझे काहीही बिघडवू शकत नाहीस. माझ्यावर तुझा काही प्रभाव नाही. पण या आंदोलनाने या म्हणीचा अर्थच बदलून टाकला आहे.
आज परिस्थिती अशी आहे की सत्ता कितीही बलाढ्य असो, कितीही मुजोर असो, कितीही अहंकाराने फुगलेली असो; सामान्य माणसाने  ठरवले  तर तो सत्तेचे घरही उन्हात बांधू शकतो. हाच या आंदोलनाचा सर्वात मोठा संदेश आहे.
लोकशाहीत सत्ता ही जनतेने दिलेली तात्पुरती जबाबदारी असते. पण अनेकदा सत्ताधारी स्वतःलाच मालक समजू लागतात. जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जाते. आश्वासने फाईलमध्ये अडकून पडतात. प्रशासन जनतेपेक्षा सत्तेच्या सोयीचे होऊ लागते. अशा वेळी एखादे आंदोलन सत्तेला वास्तवाची जाणीव करून देते.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाने नेमके तेच केले. आंदोलनकर्त्यांच्या अंगाला  उन्हाचे चटके बसत  होते, पण अस्वस्थता मात्र मंत्रालयात निर्माण झाली. उन्हात बसलेला एक माणूस दिसत होता, पण त्याच्या मागे उभ्या असलेल्या लाखो लोकांच्या भावना सत्तेला अस्वस्थ करीत  होत्या. म्हणूनच वातानुकूलित कार्यालयात बसणाऱ्यांना बाहेर यावे लागले. चर्चा करावी लागली. विनंती करावी लागली.
ही कोणत्याही एका व्यक्तीची ताकद नव्हती. ही जनतेच्या एकजुटीची ताकद होती.
इतिहास सांगतो की सत्तेला सर्वाधिक भीती विरोधकांची नसते. सत्तेला सर्वाधिक भीती असते ती जागृत झालेल्या जनतेची. कारण विरोधी पक्ष निवडणुकीत पराभूत होऊ शकतो, पण जनता कधीच पराभूत होत नाही. मतपेटीसमोर उभा राहिलेला सामान्य नागरिक हा कोणत्याही मंत्र्यापेक्षा, कोणत्याही आमदारापेक्षा आणि कोणत्याही सत्तेपेक्षा मोठा असतो.
याच कारणामुळे हे आंदोलन केवळ आरक्षणाचा किंवा एखाद्या समाजाच्या प्रश्नापुरता मर्यादित  विषय राहिला नाही. ते लोकशाहीतील जनशक्तीचे प्रतीक बनले. एका सामान्य माणसाच्या मागे लाखो लोक उभे राहिले की सत्ता कितीही मजबूत असली तरी तिला झुकावे लागते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
या आंदोलनाची आणखी एक महत्त्वाची बाजू म्हणजे त्याचा अहिंसक स्वभाव. ना दगडफेक, ना जाळपोळ, ना सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान. फक्त ठाम भूमिका आणि जनतेचा पाठिंबा. हीच खरी लोकशाहीची ताकद आहे. महात्मा गांधींनी देशाला दिलेल्या सत्याग्रहाच्या परंपरेची ही आधुनिक आवृत्ती आहे.
हिंसा सत्तेला निमित्त  देते, पण अहिंसा सत्तेला उत्तर द्यायला भाग पाडते. म्हणूनच भर उन्हात बसलेला आंदोलनकर्ता अनेकदा सत्तेच्या वातानुकूलित दालनांपेक्षा अधिक प्रभावी ठरतो.
आज या आंदोलनाने महाराष्ट्राला एक महत्त्वाचा धडा दिला आहे. तो म्हणजे सामान्य माणूस शांत असतो, पण शक्तिहीन नसतो. तो संयमी असतो, पण कमकुवत नसतो. त्याच्या सहनशीलतेचा अंत झाला की तो इतिहास घडवतो. गावातील शेतकरी, कष्टकरी, मजूर, युवक आणि सामान्य नागरिक जेव्हा एकाच भावनेने उभे राहतात, तेव्हा सत्तेच्या सर्व समीकरणाना  छेद जातो.
खुर्ची मोठी नसते, खुर्ची देणारा मोठा असतो. सत्ता मोठी नसते, सत्ता निर्माण करणारी जनता मोठी असते. लोकशाहीत खरा मालक मंत्रालयात बसलेला नसतो; तो शेतात राबत असतो, कारखान्यात घाम गाळत असतो, रस्त्यावर संघर्ष करत असतो.
म्हणूनच ग्रामीण भागातील त्या जुन्या वाक्याला आज नवा अर्थ प्राप्त झाला आहे. “तू काय माझं उन्हात घर बांधणार आहेस का?” या प्रश्नाचे उत्तर जनतेने आपल्या सामूहिक शक्तीने दिले आहे.
“हो… जर सत्ता जनतेपासून दूर गेली, लोकांच्या प्रश्नांकडे पाठ फिरवली आणि अहंकाराने आंधळी झाली, तर सामान्य माणूस सत्तेचे घरही उन्हात बांधू शकतो.”
आजच्या आंदोलनाचे सार एका वाक्यात सांगायचे झाले तर ते असे,
“जरांगे पाटील उन्हात बसले, पण चटके मात्र सत्तेला बसले. कारण सत्ता कितीही बलाढ्य असली तरी जनतेपेक्षा मोठी नसते. आणि जेव्हा सामान्य माणूस आपल्या हक्कासाठी शांततेच्या मार्गाने उभा राहतो, तेव्हा तो केवळ आंदोलन करत नाही; तो सत्तेचे घर उन्हात बांधण्याची ताकद दाखवून देत असतो.”
दुनियादारी won’t lie 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *