क्राईम

संपादकीय 👇👇👇….. कुंभासाठी हजारो कोटी … नाशिककरांसाठी मात्र मृत्यूचे रस्ते


संपादकीय 👇👇👇…..

कुंभासाठी हजारो कोटी …

नाशिककरांसाठी मात्र मृत्यूचे रस्ते

…..कुमार कडलग, नाशिक

“कुंभमेळा जागतिक दर्जाचा होणार”, “हजारो कोटी रुपयांचा निधी मंजूर”, “भव्य विकासकामे”, “स्मार्ट पायाभूत सुविधा”,गेल्या काही महिन्यांपासून सरकारच्या घोषणांचा हा अखंड वर्षाव सुरू आहे. प्रत्येक पत्रकार परिषदेत कुंभमेळ्याचे गोडवे गायले जात आहेत. मंत्री, अधिकारी आणि लोकप्रतिनिधी विकासाच्या मोठमोठ्या दाव्यांनी आकाश ठेंगणे करत आहेत.

पण या घोषणांच्या धुरामागे एक भीषण वास्तव लपवले जात आहे. अवघ्या सहा महिन्यांत नाशिकमध्ये ९५ भीषण अपघात झाले आणि ८७ नागरिकांचा मृत्यू झाला. हा केवळ आकडा नाही; हा प्रशासनाच्या अपयशाचा रक्ताने लिहिलेला कर्तव्यालेख आहे.

एकीकडे कुंभासाठी हजारो कोटींच्या योजना आखल्या जात आहेत, तर दुसरीकडे रोज सामान्य माणूस जीव मुठीत धरून रस्त्यावर चालतो आहे. सरकारला कुंभासाठी येणाऱ्या भाविकांचे प्राण महत्त्वाचे वाटतात; पण नाशिककरांचे जीव स्वस्त आहेत का?हा खरा प्रश्न आहे.

नाशिकच्या रस्त्यांवर फिरताना असे वाटते की विकास नव्हे, तर निष्काळजीपणाचे साम्राज्य उभे राहिले आहे. कुठे खड्डे, कुठे अर्धवट रस्ते, कुठे निकृष्ट दर्जाची कामे, कुठे अंधारे चौक, कुठे चुकीचे वाहतूक नियोजन. प्रत्येक ठिकाणी अपघाताला निमंत्रण देणाऱ्या परिस्थितीचा सुळसुळाट आहे. आणि जेव्हा एखादा जीव जातो, तेव्हा प्रशासनाची ठरलेली स्क्रिप्ट सुरू होते,चौकशीचे आदेश, अधिकाऱ्यांची पाहणी, दोन दिवसांची धावपळ आणि नंतर पुन्हा सगळे शांत.हा निष्काळजीपणा नाही; हा व्यवस्थेचा निर्लज्जपणा आहे.

सरकारने स्वतःला एक प्रश्न विचारावा,कुंभासाठी ज्या रस्त्यांवर कोट्यवधी खर्च होणार आहेत, त्याच रस्त्यांवर आज नागरिक मरत असतील, तर त्या विकासाला काय म्हणायचे? कुंभाच्या नावाखाली होणारा खर्च हा श्रद्धेसाठी आहे की ठेकेदारांच्या तिजोरीसाठी?

आज सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे अपघातानंतर दोष नेहमी नागरिकांच्या माथी मारला जातो. हेल्मेट नव्हते, वेग जास्त होता, नियम मोडले… पण खड्डा कुणी तयार केला? निकृष्ट दर्जाचा रस्ता कुणी मंजूर केला ? धोकादायक चौक वर्षानुवर्षे तसेच कुणी ठेवले? चुकीच्या नियोजनावर स्वाक्षरी कुणी केली? याचे उत्तर मात्र कुणाकडेच नसते.

या व्यवस्थेत मृत्यूला जबाबदार कुणीच नसते; फक्त मृत माणूस दोषी ठरतो.

Advertisement

आज नाशिकमध्ये विकासाच्या नावाने मोठे फलक उभे राहतात, भूमिपूजनाचे सोहळे होतात, फिती कापल्या जातात, प्रसिद्धीपत्रके वाटली जातात; पण रस्त्यावर सांडलेले रक्त कुणाच्याच प्रसिद्धीपत्रकात दिसत नाही. कारण मृत्यूchyv फोटोंचे मतांमध्ये परिवर्तन होत नाही.

कुंभमेळा हा केवळ धार्मिक सोहळा नाही; तो प्रशासनाच्या चारित्र्याची परीक्षा आहे. लाखो भाविक येण्यापूर्वी शहरातील नागरिक सुरक्षित आहेत का, याला पहिले प्राधान्य हवे. ज्या शहरात स्वतःच्या नागरिकांना सुरक्षित प्रवास देता येत नाही, ते शहर जगाला सुरक्षिततेचे धडे देणार आहे का?याहून मोठा विरोधाभास असू शकत नाही.

राजकारण्यांना उद्घाटने करायला वेळ आहे, जाहिरातींवर कोट्यवधी खर्च करायला पैसा आहे, स्वागत कमानी उभारायला उत्साह आहे; पण अपघातप्रवण चौक दुरुस्त करण्यासाठी, धोकादायक रस्ते सुरक्षित करण्यासाठी आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी इच्छाशक्ती नाही.

सरकारने लक्षात ठेवावे,रस्त्यावर होणारा प्रत्येक टाळता येण्याजोगा मृत्यू हा केवळ अपघात नसतो; तो प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे झालेला मृत्यू असतो. जेव्हा व्यवस्था धोके माहिती असूनही उपाय करत नाही, तेव्हा त्या प्रत्येक मृत्यूत व्यवस्थेचाही वाटा असतो.

आज नाशिककरांचा संताप रास्त आहे. कारण त्यांना विकासाची भाषणे नकोत; सुरक्षित आयुष्य हवे आहे. त्यांना घोषणांचे फलक नकोत; खड्डेमुक्त रस्ते हवेत. त्यांना आश्वासनांचे ढोल नकोत; उत्तरदायी प्रशासन हवे आहे.

कुंभासाठी येणाऱ्या भाविकांच्या स्वागताची तयारी जरूर करा. पण आधी या शहरातील नागरिकांना जिवंत राहण्याचा अधिकार द्या. कारण ज्या शहरात रोज मृत्यूचा सापळा उभा आहे, त्या शहराला “तीर्थक्षेत्र” म्हणणेही वेदनादायक वाटते.

कुंभमेळ्यासाठी कोट्यवधी रुपये मंजूर करणाऱ्या सरकारला नाशिककरांच्या जीवाची किंमत किती आहे?

जर या प्रश्नाचे उत्तर आजही फक्त नवीन घोषणा, नवीन समित्या आणि नवीन आश्वासने असेल, तर सत्ताधाऱ्यांनी कुंभाचा सोहळा भव्य केला; पण त्या सोहळ्याच्या शहरात सामान्य माणसाचा जीव मात्र स्वस्तच राहिला.अशी नोंद इतिहासात झाल्याशिवाय राहणार नाही.

श्रद्धेच्या नगरीत अमृताचा कुंभ भरावा, ही जनतेची अपेक्षा आहे; पण जर निष्काळजीपणामुळे मृत्यूचाच कुंभ भरत असेल, तर त्याची नैतिक जबाबदारी सत्तेवर बसलेल्या प्रत्येक लोकप्रतिनिधीची आणि प्रत्येक संबंधित अधिकाऱ्याची आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *