✍️ संपादकीय विचारांच्या ‘फ्लेक्स’वर हल्ला!
✍️ संपादकीय
विचारांच्या ‘फ्लेक्स’वर हल्ला!
संगमनेर हे शांतता, सुसंस्कृती आणि सहिष्णुतेचे प्रतिक मानले जाणाऱ्या तालुक्यांपैकी एक. या मातीतून अनेक समाजवादी विचारसरणीचे, लोकशाही मूल्यांचे पुरस्कर्ते पुढे आले. बाळासाहेब थोरात हे त्या विचारधारेचे अध्वर्यू – एक सुसंस्कृत, समावेशक, संवादावर विश्वास ठेवणारे नेतृत्व. मात्र आज त्यांच्या शुभेच्छा फलकाबाबत जे घडले, ते केवळ एका व्यक्तीविरोधातील चळवळ नाही तर तो एका मूल्यप्रणालीवर हल्ला आहे.
जिथे सहिष्णुतेचा श्वास घेतला जातो, लोकशाहीचा मान राखला जातो, आणि राजकारण म्हणजे सुसंस्कृततेचा आदर्श मानला जातो. या मातीतून फुललेल्या विचारवंत, समाजवादी, लोकहितवादी परंपरेत बाळासाहेब थोरात यांचं नाव आदराने घेतलं जातं. परंतु त्यांच्या शुभेच्छा फलकावर झालेली छेडछाड ही फक्त राजकीय असहिष्णुतेची झलक नाही; ती समाजाच्या मूलभूत मूल्यांवर केलेला आघात आहे.
ही घटना केवळ एक राजकीय दृष्टीकोन विसंवादाची परिणती नसून,विचारस्वातंत्र्य, अभिव्यक्ती, आणि सहअस्तित्वाच्या तत्त्वांना दिलेला जबरदस्त धक्का आहे.‘फ्लेक्स’वरून सुरु झालेल्या छेडछाडीच्या घटना, आता समाजाच्या मनोभूमीवर खोल घाव करत आहेत.एका पोस्टरवर हल्ला करणं, एखाद्याच्या प्रतिमेवर कुरघोडी करणं, हे सत्तेच्या किंवा विरोधाच्या खेळात आज फार सामान्य मानलं जातं. पण ही घटना यापलीकडे जाते. ही एक विकृत प्रवृत्ती आहे
“फलकाची छेडछाड झाली, आणि तालुक्यात संतापाची लाट उसळली”,हे फक्त बातमीचे स्वरूप नाही; तर एक सामाजिक चेतावणी आहे. फलक कापणाऱ्या हातांपेक्षा त्या हातांना डोकं देणाऱ्या विकृत प्रवृत्ती जास्त घातक आहेत.
ही केवळ राजकीय वैमनस्याची झलक नाही, तर ही अशा मानसिकतेची लक्षणं आहेत जी संवाद, सहिष्णुता, मतभिन्नता या लोकशाही मूल्यांचा स्वीकार करत नाहीत. आपल्याला न पटणाऱ्या गोष्टींचा निषेध करायचा तर कायदेशीर मार्ग खुले आहेत.पण आज यांचं हत्यार आहे, अपमान, अश्लीलता, छेडछाड, आणि सायबर विषारीपणा.
ही केवळ ‘फ्लेक्स’ची छेडछाड नाही,ही लोकशाहीची विटंबना आहे!
शब्दाच्या जागी चिथावणी, मुद्द्यांच्या जागी गुद्दे, आणि राजकारणाच्या नावाखाली असभ्य विकृती; ही आजची आपत्ती बनतेय. एकेकाळी सहिष्णुता जपणाऱ्या गावागावांमध्ये आज विषारी भाष्यं, अफवा आणि वैमनस्य पेरण्याचे प्रयोग सुरू आहेत.याचे आश्चर्य वाटते.
प्रशासनाला कठोर भूमिका घ्यावी लागेल
जर अशा प्रकारांवर तातडीने कठोर कारवाई झाली नाही, तर उद्या एखाद्याचा पुतळा फोडला जाईल, पोस्टर पेटवले जातील, मग समाज पेटेल… आणि शांतता राखणाऱ्या संगमनेरला जळण्याचा कलंक चिकटेल . त्यामुळे “फक्त गुन्हा नोंदवला” इतके पुरेसे नाही, अशा विकृतींना रोखण्यासाठी समाजप्रबोधन, तातडीने तपास, आणि सामाजिक एकात्मतेचा बळकट आवाज उठवणंही गरजेचं आहे.
या प्रकरणी प्रशासनाने गुन्हा दाखल केल्याची बातमी आली खरी. पण समाजाला केवळ गुन्हा दाखल झाला एवढ्यावर समाधान मानता येणार नाही.आज जर अशा प्रकारांना रोखलं नाही, तर उद्या आगी लावणारे, पुतळे तोडणारे, लोकांची हिंसक टिंगल करणारे खुलेआम रस्त्यावर नाचू लागतील.
प्रशासनाला हे लक्षात घ्यावं लागेल की अशा कृतींचा उद्देश केवळ विरोध दर्शवणं नसतो, तर समाजात भिती, द्वेष आणि गोंधळ पसरवणं असतो.त्यामुळे या घटनांवर केवळ तात्कालिक कारवाई नव्हे, तर दीर्घकालीन उपाययोजना गरजेच्या आहेत
शांत संगमनेर, तूच आता जागा हो…
विचार, मत, श्रद्धा, राजकीय मते… यात भिन्नता असो, पण संगमनेरच्या मातीत गोंधळ नव्हे तर चर्चा व्हायला हवी. सुसंस्कृत तालुका म्हणवणाऱ्या भूमीत विचारांच्या ‘फ्लेक्स’वर हल्ला होणं हे अपमानास्पद आहे.
हा फक्त थोरातांचा अपमान नाही, हा आपल्या सर्वांच्या वैचारिक स्वातंत्र्याला छेद आहे.इथे राजकीय परंपरा कधीही चिखलफेक किंवा द्वेषाच्या आंधळेपणावर उभी नव्हती.या भूमीत अपमान नव्हे, तर आत्ममुल्यांचा आदर केला गेला.म्हणूनच आज जे घडलं, ते तुमच्या-आमच्यासारख्या नागरिकांनी सहन करणं म्हणजे त्या परंपरेशी गद्दारी ठरेल.हा फक्त बाळासाहेब थोरात यांचा अपमान नाही,हा त्या सभ्य राजकारणाचा, त्या सुजाण जनतेच्या विवेकाचा, त्या संवादाच्या परंपरेचा अपमान आहे,ज्यावर संगमनेरची ओळख उभी आहे.
-कुमार कडलग
नाशिक



