सौंदर्याच्या बाजारात शरीराचा सौदा: हार्मोन इंजेक्शन तस्करीचा भीषण चेहरा
सौंदर्याच्या बाजारात शरीराचा सौदा: हार्मोन इंजेक्शन तस्करीचा भीषण चेहरा
आजच्या तथाकथित प्रगतीशील समाजाची एक भयंकर आणि लपवून ठेवलेली बाजू उघडकीस येत आहे – अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसायात ढकलण्याआधी त्यांच्या शरीरावर प्रयोग करणं आणि त्या प्रयोगात ‘वय वाढविणाऱ्या’ हार्मोनल इंजेक्शनचा खुलेआम वापर करणं.
ही केवळ अमानुषता नाही; ही संयुक्त तस्करी, बलात्कार आणि वैद्यकीय शस्त्रांचा वापर करून घडवलेली आधुनिक गुलामगिरी आहे.
वेश्याव्यवसायातील नव्या शस्त्राचा उदय
‘प्रौढ दिसण्यासाठी’ वापरली जाणारी Estrogen, Progesterone, Growth Hormone, Oxytocin अशा हार्मोनल औषधांची काळ्या बाजारात खुलेआम तस्करी केली जात आहे. जे औषध खरोखर वैद्यकीय गरज असलेल्यांसाठी वापरले जावे, तेच औषध आता 13-14 वर्षांच्या मुलींच्या शरीरात जबरदस्तीने टोचले जात आहे केवळ त्या ‘प्रौढ दिसाव्यात’ म्हणून.ही बाब ठाण्यातील एका निर्लज्ज प्रकरणातून समोर आलीच आहे. हार्मोन्स ग्रोथसाठी वापरण्याची घातक प्रथा समाजात रुजली आहे. विशेषतः म्हशीसारख्या दुधाळ जनावरावर याचा खुला वापर सुरु आहे. शहरासोबत ग्रामिण भागातील गोठ्यात याचा मोठा साठा पहायला मिळतो. वास्तविक ही औषधं प्रतीबंधित आहेत . याचा वापर दूध वाढीसाठी केला जातो. त्या दुधात देखील दुष्परिणाम करणारे घटक उतरतात. तेच दूध खाण्या पिण्यात आले की, त्याचे दुष्परिणाम मानवी शरीरावर झालेले पहायला मिळतात. विशेषतः अल्पवयीन मुलींना अकाली मासिक पाळी येणे, स्तनांची अनावश्यक वाढ झालेली आढळते. या औषधाच्या खरेदी विक्रीवर देखील प्रशासनाचे नियंत्रण नाही. ही एक बाजू.
दुसऱ्या बाजूला या इंजेक्शन्समुळे काही आठवड्यांत शरीराची रचना बदलते. उदा. स्तनवाढ, नितंबवाढ, मासिक पाळीची लवकर सुरुवात, त्वचेला चमक. त्याचा गैर फायदा महिला तस्करीत सक्रिय असलेले दलाल घेत आहेत. अशा अल्पवयीन मुलींची तस्करी केल्यानंतर त्यांच्या शरीरावर या औषधाचा प्रयोग केला जातो. मग हे शरीर वेश्याव्यवसायाच्या बाजारात उभं केलं जातं.जिथे वयाने अल्पवयीन असलेल्या मुली ‘प्रौढ’ भासतात.
औषध कंपन्या, दलाल आणि डॉक्टर्सचं अघोषित रॅकेट:
ही देह बाजारातील एकट्या दलालांचे कारस्थान नाही. या मागे औषध विक्रेते, छुपे बोगस वैद्यकीय क्लिनिक यांची कट योजना आहे.या जातकुळीतील डॉक्टर, आणि वेश्याव्यवसायातील एजंट यांचं मोठं रॅकेट काम करत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोठमोठ्या शहरांत आणि आता तर ग्रामीण भागांतही ही औषधे ‘बिनधास्त’ मिळत आहेत. काहीजण तर सोशल मीडियावर “बॉडी डेव्हलपमेंट इंजेक्शन”च्या नावाने जाहिरातही करत आहेत.
कायदा कुठे आहे? प्रशासन कुठे आहे?
POCSO, NDPS, आणि ड्रग्स अँड कॉस्मेटिक अॅक्ट यामध्ये अशा तस्करीसाठी कठोर शिक्षा आहेत. पण कारवाई फक्त कागदावर आहे. पोलिस आणि औषध निरीक्षक यांचं संपूर्ण दुर्लक्ष किंवा सहभाग यामुळे ही यंत्रणा बिनधास्तपणे चालू आहे.
मुलीचं बालपण विकणाऱ्या समाजाला आरसा दाखवण्याची वेळ
ही तस्करी केवळ औषधांची नाही. ही मुलींच्या स्वातंत्र्याची, शरीराची आणि भविष्याची तस्करी आहे.
हे इंजेक्शन टोचताना तिच्या केवळ शरीराला दुखापत होत नाही ,तर तिच्या आत्म्याची चिरफाड होते .
जेव्हा समाज अशा “फॅशन”, “ग्लॅमर” किंवा “कमाई”च्या नावाने मौन बाळगतो, तेव्हा तो त्या गुन्ह्याचाच भाग बनतो.
अल्पवयीन मुलींवर इंजेक्शनचा काळा खेळ:
एका कोवळ्या, मासूम चेहऱ्याला कृत्रिम उजळपणा देणारी सुई…
एका अजाण शरीरात प्रौढता ओतणारी रसायनं…
आणि या साऱ्या प्रक्रियेमागे लपलेली भयंकर काळी बाजू – बालवेश्याव्यवसायाचा भस्मासुर!
आज आपल्याला समाजाच्या एका अंधाऱ्या कोपऱ्यात डोकावण्याची गरज आहे. जिथे अल्पवयीन मुलींना ग्लुटाथायोन, बोटॉक्स, हॉर्मोन इंजेक्शन्स देऊन, त्यांचं बालपण झपाट्यानं लुबाडलं जातंय. कारण फक्त एक — त्या प्रौढ आणि “विक्रीस लायक” दिसाव्यात.
सौंदर्य की शोषण?
या रासायनिक सुईंमुळे त्वचा गोरी होते, शरीर उठावदार वाटतं, वय जास्त दिसतं.आणि मग त्या मुलींना थेट नेलं जातं वेश्याव्यवसाय, डान्स बार, पॉर्न इंडस्ट्री किंवा तस्करीच्या जाळ्यात.या साऱ्या मागे बेकायदेशीर सौंदर्य क्लिनिक, दलाल टोळ्या, आर्थिक गरिबीचा फायदा घेणारे एजंट आणि काही भ्रष्ट वैद्यकीय व्यावसायिक आहेत.
कायद्याचा भंग, माणुसकीचा संहार:
POCSO कायदानुसार अल्पवयीन मुलींवर असा हस्तक्षेप लैंगिक अत्याचाराच्या श्रेणीत मोडतो.NDPS कायदा, औषध नियंत्रण कायदा आणि मानव तस्करी विरोधी कायदे यावर बंदी घालतात.पण जेव्हा प्रशासन दुर्लक्ष करतं, समाज गप्प बसतो, आणि पालकही अडाणीपणानं किंवा गरजेपोटी संमती देतात,तेव्हा गुन्हेगारांना मोकळं रान मिळतं.
समाजाचे संपूर्ण अपयश:
ही केवळ काही लोकांची चूक नाही. हे आपल्या एकूण समाजव्यवस्थेचं अपयश आहे.जिथे स्त्री सौंदर्य म्हणजेच तिचं “मूल्य” मानलं जातं.
जिथे गरीब कुटुंबांच्या मुलींना शिक्षण, संरक्षणाऐवजी फक्त “कमाईचं साधन” समजलं जातं.जिथे माध्यमं सेलिब्रिटींच्या गोऱ्या त्वचेला ग्लॅमर देतात, आणि ही काळी बाजू झाकतात.
प्रशासनाने तातडीने तपास पथक नेमून सौंदर्य क्लिनिक्सची छाननी करावी.शाळांनी आणि पालकांनी मुलींची आरोग्यविषयक जागरूकता वाढवावी.माध्यमांनी ही वास्तव कहाणी बेधडक समोर आणावी.
एक आवाहन: – आता उठावाची वेळ आली आहे!
औषध निरीक्षकांनी काळ्या बाजारावर तातडीने छापे टाकावेत.वैद्यकीय परिषदांनी डॉक्टरांचा परवाना रद्द करावा, जे गैरवापर करतात.सोशल मीडियावर या औषधांची जाहिरात करणाऱ्यांवर IT Act अंतर्गत कारवाई व्हावी.सर्वसामान्यांनी संशयास्पद क्लिनिक किंवा व्यक्ती यांची माहिती प्रशासनाला द्यावी.
ही लढाई केवळ इंजेक्शनच्या तस्करीविरोधात नाही, ही लढाई मुलींच्या अस्तित्वासाठी आहे.
आज जर आपण शांत राहिलो, तर उद्या आपल्या घरातलीही एखादी मुलगी या नरकात ढकलली जाईल.



