क्राईम

पक्ष व चिन्हाचा निकाल एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या पक्षांची मृत्यू घंटा ठरेल! सावली बार वरील छापा ही सुरुवात आहे!


पक्ष व चिन्हाचा निकाल एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या पक्षांची मृत्यू घंटा ठरेल!

सावली बार वरील छापा ही सुरुवात आहे!

 

जेष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांचे विश्लेषण

 

महाराष्ट्रात सद्या तीन चाकी रिक्षाचे सरकार आहे. त्याचे मालक दिल्लीत बसून आहेत. देवेंद्र फडणवीस ड्रायव्हिंग सीटवर आहेत तर दोन उपमुख्यमंत्री मागच्या सीटवर आहेत. त्यांना कधीही उतरवता येईल,अशी व्यवस्था भाजपने केलेली आहे. दोन्ही उपमुख्यमंत्री हे असंवैधनिक आहेत. एकनाथ शिंदे असोत की अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदी बसण्याचा कोणताही अधिकार कोणत्याही कायद्यात नाही. राजकीय सोय व तडजोडीसाठी दिलेले हे लॉलीपॉप आहेत. लहान मुलांना जसे मोबाईल हातात देऊन व्यस्त ठेवले जाते तसेच या खट्याळ मुलांनी गडबड करू नये! यासाठी त्यांना हे चॉकलेट दिले आहे. चघळत बसा पण गडबड करायची नाही. सर्व महत्वाची खाती मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे व भाजपाच्या आमदारांकडे आहेत. मध्ये मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रूसतात,अज्ञातवासात जातात,दरे गावात जाऊन आजारीही पडतात, तरी भाजपाला दयेचा पान्हा काही फुटत नाही. मनाजोगती खाती नाहीत, मुख्यमंत्री पद तर कोसो दूर राहिले. अमित शाह यांनी तर सुनावूनच टाकले, “४० आमदार असताना आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री केले हे उपकार विसरू नका.जे दिले ते मुकाट्याने घ्या.” मिंधे यांच्याकडे पर्यायच नव्हता. अलकमानला दुखावून चालणार नाही. शेवटी आपल्या शेंड्या मोदी शाहच्याच हातात आहेत, याची जाणीव असल्याने अस्मिता, स्वाभिमान झुगारून भाजपाची साथ देऊनच आपला विकास होईल, हे ते जाणून आहेत.

Advertisement

 

एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांची गोची करण्याचा फडणवीस भाजपा एकही संधी सोडत नाही. आम्हाला निधी देत नाही असे आरोप शिंदे गटाकडून होऊ लागले आहेत. रामदास कदम हे तसे उघडपणे बोलताना दिसतात. तर एकनाथ शिंदे सरकार उलथवू शकतो, अशी वल्गना करीत आहेत. अश्या वेळी भाजप “मेरी बिल्ली मुझपर म्याव” करताना गप्प बसू शकत नाही. शिंदेचे मंत्री व आमदारांना घेरून शिंदे सेनेस जेरीस आणण्याची एकही संधी भाजपा सोडत नाही. संजय शिरसाट हे स्वगृही चड्डी – बनियानवर असताना त्यांचा व्हिडीओ काढून तो वायरल केला जातो, या मागे कोण असावे? संजय शिरसाट वा त्यांचे हितचिंतक तर तसे मुळीच करणार नाही. मग त्यांच्या बेडरूम पर्यन्त जाऊन व्हिडीओ काढला कोणी ? बरं ते जाऊद्या. योगेश कदम हे तर स्वतःगृह राज्यमंत्री असताना त्यांना अंधारात ठेवून त्यांच्या मातोश्रीच्या नावे परमिट असलेल्या “सावली बार” वर छापा पडतोच कसा? यावरून भाजपाची तिरकी चाल लक्षात येते. कोणता गृह राज्यमंत्री स्वतः च्या कुटुंबियांच्या मालकीच्या बार वर छापा पडू देईल ? हाच प्रकार कृषि मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या बाबत घडला. ते मोबाईल वर रम्मी खेळतानाचा व्हिडीओ विरोधी पक्षाचा आमदार काढू शकत नाही. कारण मंत्र्याच्या आसपास सत्ताधारी मंत्री व आमदारांची आसन व्यवस्था असते. कोकाटे हे बसलेल्या अवस्थेत असताना प्रेक्षक गॅलरीतून उंचावरून व्हिडीओ निघणे अशक्य आहे. तो व्हिडीओ इतक्या जवळून काढला आहे की तो सत्ताधारी बाका वरील व्यक्तीच काढू शकते. यामुळे अजित पवारांवरही दबाव वाढविण्याचा भाजपचा डाव असू शकतो.

 

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सहकारी पक्षांच्या बार्गेनिंग पॉवरला लगाम घालून भाजपाला आपले वर्चस्व राखायचे आहे. याच पद्धतीने संजय गायकवाड यांच्या मारहाणीचा व्हिडीओ कोणी काढला व वायरल केला? याचे रहस्य उलगडले गेले पाहिजे.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतःला राजकारणातील “चाणक्य” समजतात. सत्ता संपादनासाठी ते काहीही करू शकतात. भाजपाला एकहाती सत्ता मिळवायची आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीनंतर त्यांना एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या पक्षांचे अस्तित्व संपवायचे आहे. त्यासाठी या पक्षांना बदनाम करणे गरजेचे आहे. यासाठीच हा बुद्धिबाळाचा पट मांडलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा पक्ष व चिन्ह या बाबतचा निकाल ही या दोन्ही पक्षांची मृत्यूघंटा असेल. तो पर्यन्त त्यांना दाणे टाकून झुंजवत ठेवण्याचे काम भाजपा कुशलतेने करीत आहे. पेराल तेच उगवते! या न्यायाने गद्दारीचे फळ गद्दारीनेच मिळेल. ज्या प्रमाणे उद्धव ठाकरे शरद पवार या नेत्यांचा घात केला त्याच पद्धतीने भाजपा या दोन्ही फुटीरांचा घात करेल.

 

दिलीप मालवणकर

ज्येष्ठ पत्रकार

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *