क्राईम

नाशिक महापालिकेच्या हलगर्जीपणाचा कळस; कपालेश्वर मंदिर परिसरात भिंत कोसळून भाविक जखमी  महापालिकेच्या निष्क्रिय कारभारामुळे भाविकांच्या जीवाशी खेळ; कुंभमेळ्यापूर्वीच धोक्याची घंटा


नाशिक महापालिकेच्या हलगर्जीपणाचा कळस; कपालेश्वर मंदिर परिसरात भिंत कोसळून भाविक जखमी

 महापालिकेच्या निष्क्रिय कारभारामुळे भाविकांच्या जीवाशी खेळ; कुंभमेळ्यापूर्वीच धोक्याची घंटा

नाशिक :प्रतिनिधी

पहिल्याच पावसाने नाशिक महापालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढले असून कपालेश्वर मंदिर परिसरातील धोकादायक वास्तूंबाबत प्रशासन किती बेफिकीर आहे, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. आज झालेल्या पावसाच्या तडाख्यात कपालेश्वर मंदिराजवळील बिवलकर वाड्याची भिंत अचानक कोसळली, तर वाड्यावरील पत्रे उडून गेल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. या दुर्घटनेत अनेक भाविक जखमी झाले असून एका भाविकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

विशेष म्हणजे, ही दुर्घटना नैसर्गिक नसून महापालिकेच्या निष्क्रियतेमुळे घडलेली असल्याचा आरोप संतप्त भाविक आणि स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. सदर वाडा मिळकत संस्थान श्री कपालेश्वर महादेव मंदिराच्या मालकीची असून या वास्तूचा एक भाग धोकादायक असल्याचे महापालिकेने स्वतः नोटीस देऊन मान्य केले आहे. मात्र नोटीस देऊनही प्रत्यक्ष कारवाई करण्याचे धाडस प्रशासनाने दाखवले नाही.

याहून गंभीर बाब म्हणजे उर्वरित भागात अनधिकृत बांधकाम असल्याची नोंद असूनही त्यावरही कारवाई प्रलंबित ठेवण्यात आली आहे. संस्थानने वारंवार पत्रव्यवहार करून धोका निदर्शनास आणून दिला, संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले, मात्र महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.

Advertisement

 

आजच्या या दुर्घटनेनंतर एक प्रश्न उपस्थित होत आहे जर एखाद्या भाविकाचा जीव गेला असता तर त्याची जबाबदारी कुणी स्वीकारली असती? नोटीस देऊन प्रशासनाची जबाबदारी संपते का? प्रत्यक्ष कारवाई करणे हे ही प्रशासनाचे कर्तव्य नाही का?

आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. लाखो भाविक नाशिकमध्ये येणार असताना शहरातील अशा धोकादायक वास्तूंकडे महापालिका डोळेझाक करत असेल तर भाविकांच्या सुरक्षेची हमी कोण देणार? प्रशासनाला मोठ्या दुर्घटनेची वाट पाहायची आहे का?

आजची घटना ही केवळ एक भिंत कोसळण्याची नाही, तर ती महापालिकेच्या बेजबाबदार आणि ढिसाळ कारभाराची साक्ष आहे. त्यामुळे या प्रकरणातील संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात यावी, तसेच मंदिर परिसरातील सर्व धोकादायक वास्तूंचे तातडीने सर्वेक्षण करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी भाविकांकडून होत आहे.

 

अन्यथा, उद्या एखादी मोठी दुर्घटना घडल्यास तिचे पाप आणि जबाबदारी थेट नाशिक महापालिकेच्या माथी राहील, अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *