क्राईम

सत्य :एका पंखावर उडणारा पक्षी: व्यवस्था आणि कत्तलखाना


सत्य: एका पंखावर उडणारा पक्षी; व्यवस्था आणि कत्तलखाना

 

“सत्य

एका पंखावर उडणारं असतं…”

हे वाक्य फक्त ऐकायला गोड आहे. पण प्रत्यक्षात ते जगण्यासाठी रक्त सांडावं लागतं.

आणि आजकाल, ते रक्त, पत्रकारांचं आहे, समाजाचं आहे, लोकशाहीचं आहे.

पत्रकाराचं काम सत्य दाखवणं.

पण जेव्हा ही सत्याची मशाल व्यवस्थेच्या क्षितिजावर दाटलेलेअंधाराचे मळभ दूर करण्यासाठी पेटवली जाते,

तेव्हा ती मशाल स्वतःचंच घर जाळायला लागते. सुरु होतो ‘खोट्या गुन्ह्यांचा खेळ.’

कधी ऍट्रॉसिटी, कधी ब्लॅकमेल, कधी खंडणीचे आरोप…

जे खरे बोलतात, त्यांच्यावरच खोटे गुन्हे दाखल होतात.

कारण कायदा बदललाय, बदलवला गेलाय. “FIR घ्यावीच लागते”

पोलीस अधिकारी म्हणतात,

“FIR घेतली नाही तर माझ्यावर गुन्हा… घेतली तर सत्य माणूस गुन्हेगार!”

ही परिस्थिती केवळ कायद्याची गुंतागुंत नाही,व्यवस्थेचा कत्तलखाना केल्याचं द्योतक आहे.

दुसरी बाजू :-काही विशिष्ट प्रकरणामध्ये पक्षपाती भूमिका घेतली जाते. सत्य माहित असून देखील कायद्याचा दुरुपयोग करण्यात ही मंडळी विशेष स्वारस्य दाखवते, हा भाग वेगळा. अशी अनेक उदाहरणे आहेत.त्याचाही उहापोह क्रमशः करणार आहोतच.या प्रवृत्ती सत्याचे पंख छाटण्यात हशील मानतात.

जिथे सत्य घेऊन उडू पाहणाऱ्या पक्ष्यांनी भरारी मारायची असते,तिथे व्यवस्थेने धारदार पट्टा लावला आहे.या धारदार पट्यावर स्वार होऊन ही मंडळी संधी साधून घेते.

पक्षी उडतो… पण एका पंखावर.

दुसऱ्या पंखाने पार्श्व भाग झाकत उडतो.

कारण दुसरा पंख मोकळा केलात,

तर व्यवस्थेचं धारदार पट्टा त्याला तोडतो.

आज सत्य लिहिणं, माणूस मारण्याइतकं धोकादायक झालंय.

ही पत्रकारांचीच नव्हे तर लोकशाहीच्या अस्तित्वाची लढाई आहे.

खोट्या गुन्ह्यांचे शस्त्रं :सत्यावर चालणारी तलवार

जे कायदे दुर्बल घटकांच्या संरक्षणासाठी बनवले गेले,

तेच आज सत्य सांगणाऱ्यांवर हत्यार म्हणून वापरले जातायत.

आज कुणीही,कुठेही,कोणत्याही पत्रकारावर

खोटा खटला दाखल करू शकतो.

 

काही प्रामाणिक,पोलीस अधिकारीही व्यवस्थेच्या वाहक पट्यावर वर लटकलेले सावज झालेत.

Advertisement

FIR घ्यावीच लागते… नाहीतर त्यांच्यावरच गुन्हा.

म्हणजे कायदा झाला गुन्हेगारांचे कवच!

आणि पोलिसांना फक्त Action Replay Machine बनवतो!हा सन्माननीय अपवाद वगळता बाकी सारा आनंदी आनंद..

 

ही परिस्थिती अशी आहे,

की सत्य उघड केल्यावर तुमचं भविष्य लिलावात काढून उध्वस्त केलं जातं,

आणि खोटं बोलल्यावर तुम्हाला सन्मानित केलं जातं..

 

सत्याचा पहिला पंख उडतो…

दुसरा पंख मात्र धमक्यांपासून, खोट्या खटल्यांपासून स्वतःचा गळा वाचविण्यासाठी उपयोगी पडेल म्हणून झाकावा लागतो.

आणि समाज मात्र मौन पाळतो.

पत्रकारिता वाचवायची असेल तर…

सत्याच्या पंखाला पुन्हा मोकळं करावं लागेल.

फिर्याद घेणाऱ्या अधिकाऱ्यालाही संरक्षण द्यावं लागेल.

सत्याची बाजू घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला

“FIR नाही घेतली तर गुन्हेगार”

आणि

“FIR घेतली तर माणूस गुन्हेगार”

या दुहेरी फासातून बाहेर काढावं लागेल.

 

लोकशाही फक्त मतदानावर चालत नाही…

ती सत्य दाखवणाऱ्या पंखांवर उडते.

 

एका पंखावर उडणारे पक्षी

हे फक्त रूपक नाही,

तर आजच्या व्यवस्थेत जगण्यासाठीची अपरिहार्यता झाली आहे.

जिथे सत्य सांगणं हा गुन्हा ठरतो,

तिथे दुसऱ्या पंखाने स्वतःचा गळा झाकत जगावं लागतं!

व्यवस्था एक मशीन आहे, प्रोग्राम फिट केलेलं. व्यवस्था चालवणारे हात केवळ ऑपरेटर आहेत. त्यांच्या इच्छेप्रमाणे नाही,तर मशीनच्या आत समावलेल्या प्रोग्राम प्रमाणे व्यवस्था राबवली जाते. आपल्या दिसतात फक्त ते हात. आपण त्यांनाच दोषी ठरवतो. अधिकारी तो कुठल्याही विभागाचा असो, दोष त्यांचा नाही, तर व्यवस्थेच्या मशीन मध्ये भरलेला प्रोग्राम दोषी आहे. हा प्रोग्राम बदलण्याची आणि या प्रोग्रामला हवी तशी कमांड देऊन आपल्या इच्छेनुसार हे यंत्र चालवू पाहणाऱ्या मानसिकतेचे प्रबोधन करण्याची शपथ पत्रकारितेला घ्यावी लागेल. लाल दिवाचे संपादक भगवान थोरात यांनी उपस्थित केलेल्या माया नगरीचा एक पंखी पक्षी  या खंत वर हाच रामबाण उपाय आहे. काम अवघड आहे, पण अशक्य नाही.

-कुमार कडलग, नाशिक

दुनियादारी won’t lie

 

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *