मौजे पातळीच्या शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचा बनाव ; पो. नि. समाधान नागरेंच्या कौशल्याने खूनी ताब्यात काही तासांतच सुरगाणा पोलिसांचा गुन्ह्याचा उलगडा
मौजे पातळीच्या शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचा बनाव ;
पो. नि. समाधान नागरेंच्या कौशल्याने खूनी ताब्यात
काही तासांतच सुरगाणा पोलिसांचा गुन्ह्याचा उलगडा
सुरगाणा प्रतिनिधी :
सुरगाणा तालुक्यातील पळसनजवळील हातरुंडी गावात घडलेल्या एका खळबळजनक प्रकरणाचा सुरगाणा पोलिसांनी अवघ्या काही तासांत उलगडा केला आहे. देवराम नाना गावीत (वय ६५, रा. हातरुंडी) यांचा मृत्यू हा बिबट्याच्या हल्ल्यात झाल्याचा बनाव रचला गेला होता. मात्र, पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या कौशल्यपूर्ण तपासामुळे खरी कहाणी समोर आली.
बिबट्याच्या हल्ल्याचा संशय, पण ठसे नाहीच!:
दि. ०३ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास गावकऱ्यांनी देवराम गावीत यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांनी आणि वनविभागाने घटनास्थळाची पाहणी केली असता बिबट्याचे पावलांचे ठसे कुठेच आढळून आले नाहीत. शिवाय, जखमांचा तपास करता त्या प्राण्यांच्या हल्ल्याच्या नव्हत्या, असे स्पष्ट झाले.
खूनी दाम्पत्याचा पर्दाफाश:
तपासाचा धागा पुढे नेत पोलिसांनी संशयित शिवराम गंगा गवळी व त्याची पत्नी रंगुबाई (रा. पातळी, ता. सुरगाणा) यांच्या घराची झडती घेतली. त्यावेळी घराच्या पडवीत रक्ताचे डाग आणि गुन्ह्यात वापरलेले हत्यार सापडले. चौकशीत दाम्पत्याने कबुली देत सांगितले की त्यांनीच आपल्या व्याही देवराम गावीत यांची हत्या केली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन:
या कारवाईत नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले.
कारवाईत पोलीस निरीक्षक समाधान नागरे, पो. उपनिरीक्षक अण्णासाहेब दिघे, चंद्रकांत दवंगे, अंबादास बैरागी, सहाय्यक पो. उपनिरीक्षक शंकर भोये, पोलीस हवलदार शिवराम गायकवाड, दिलीप वाघ तसेच पोलीस शिपाई रमेश चव्हाण, भास्कर भोये, मनोज चव्हाण, जगदीश घुटे यांनी सहभाग घेतला.
पुढील तपास:
सदर आरोपींविरुद्ध सुरगाणा पोलीस ठाण्यात गु. र. नं. २०२/२०२५ भादंवि कलम ३०२, २०१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करून न्यायालयीन कोठडीत रिमांड मिळविण्यात आला आहे. पुढील तपास पो. नि. समाधान नागरे हे करीत आहेत.

