Bussiness

शिकण्याची इच्छा असेल तर मार्ग निघतो – खासदार भास्कर भगरे डॉ. डी. के. आहेर यांचा ३७ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवापूर्ती गौरव सोहळा


शिकण्याची इच्छा असेल तर मार्ग निघतो – खासदार भास्कर भगरे

डॉ. डी. के. आहेर यांचा ३७ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवापूर्ती गौरव सोहळा

 

देवळा : प्रतिनिधी –

रामरावजी आहेर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. डी. के. आहेर हे ३७ वर्षांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त आयोजित सेवापूर्ती गौरव सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून खासदार भास्कर भगरे बोलत होते.

यावेळी भगरे म्हणाले की, “शिकण्याची इच्छा असेल तर मार्ग नक्कीच निघतो. परिस्थिती कितीही खडतर असली तरी जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर माणूस यशाचे शिखर गाठू शकतो.” डॉ. डी. के. आहेर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत आपल्या कार्यकर्तृत्वातून शैक्षणिक क्षेत्रात वेगळा ठसा उमटविला आहे. त्यांचा जीवनप्रवास नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे, असेही त्यांनी नमूद केले.

Advertisement

डॉ. आहेर यांनी राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) च्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. वृक्षलागवड, जलसंधारण, ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ यांसारख्या उपक्रमांतून त्यांनी पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक विकासासाठी मोलाचे योगदान दिले. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता सामाजिक जाणीव, श्रमप्रतिष्ठा आणि सेवाभावाचे संस्कार देण्याचे काम त्यांनी केले.

३७ वर्षांच्या प्रदीर्घ सेवाकाळात डॉ. आहेर यांनी अध्यापनासोबतच संस्थेच्या शैक्षणिक व सामाजिक वाटचालीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या कार्याचा गौरव करत उपस्थितांनी त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी, हितचिंतक आणि मान्यवर उपस्थित होते.देवळा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष हितेंद्र आहेर, डॉ मालती आहेर, प्राचार्य डॉ सतीश ठाकरे, डॉ तुषार चांदवडकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *