Bussiness

माणसातलं माणूसपण जपणारा पोलीस अधिकारी! संदीप कोळी : खाकी वर्दीच्या पलीकडे माणुसकीच्या नात्याची वीण वीणणारं व्यक्तिमत्त्व… कुमार कडलग, नाशिक


माणसातलं माणूसपण जपणारा पोलीस अधिकारी!

संदीप कोळी : खाकी वर्दीच्या पलीकडे माणुसकीच्या नात्याची वीण वीणणारं व्यक्तिमत्त्व…

कुमार कडलग, नाशिक

सन २०१८-१९ चा काळ असावा. अहिल्यानगर जिल्ह्यातील एका वृत्तपत्राच्या नाशिक आवृत्तीचा निवासी संपादक म्हणून काम पाहत होतो. त्याच दरम्यान येवल्यातील एका प्रतिष्ठित शिक्षण संस्थेत विद्यार्थ्याच्या मृत्यूची घटना चर्चेचा विषय बनली होती. हा मृत्यू आत्महत्या होता की अपघात, याबाबत स्पष्टता नव्हती. मात्र, घटनेच्या निमित्ताने आरोप-प्रत्यारोपांचे पेव फुटले होते.

कुणी संस्थाचालकांवर आरोप करीत होते, कुणी त्यांच्या निष्काळजीपणावर ताशेरे ओढत होते. कुणाला संस्थाचालकांची मुजोरी अस्वस्थ करीत होती, तर कुणी पोलीस प्रशासनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करीत होते. संस्थाचालकांना पाठीशी घातले जात असल्यापासून ते पोलीस मॅनेज झाल्यापर्यंतच्या चर्चा रंगल्या होत्या.

या सगळ्या गदारोळात पत्रकार म्हणून सत्याचा शोध घेण्याची उर्मी स्वस्थ बसू देत नव्हती. चर्चेच्या धुरळ्यातून वास्तवाचा चेहरा शोधायचा होता. सुरुवात कुठून करावी, असा प्रश्न मनात आला आणि उत्तरही लगेच मिळाले. अर्थातच, चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या पोलिसांपासूनच!

येवला तालुका पोलीस ठाण्याच्या तत्कालीन प्रभारी अधिकाऱ्यांचा मोबाईल क्रमांक मिळवला आणि फोन जोडला. प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. आवाजात आक्रमकता होती, प्रश्नांमध्ये संशय होता आणि उत्तरांमधून वस्तुस्थिती जाणून घेण्याची घाई होती.

मात्र, पलीकडून मिळणारा प्रतिसाद अपेक्षेपेक्षा वेगळा होता. माझा आवाज जितका कठोर, तितकीच समोरून उत्तरे मृदू, संयमी आणि समजूतदारपणाची! कुठेही चिडचिड नाही, आवाज चढविणे नाही, पत्रकार असल्याचा राग नाही की प्रश्न विचारल्याने जागा झालेला पोलिसी  अहंकार नाही.

क्षणभर जाणवले, आपण काहीतरी वेगळेच अनुभवत आहोत. पत्रकारितेच्या आक्रमकतेत आपण संवादाचे भान तर हरवत नाही ना, असा प्रश्न स्वतःलाच पडला.कारण पलीकडे केवळ एका पोलीस अधिकाऱ्याशी संवाद सुरू नव्हता, तर संवेदना जपणाऱ्या, माणसातलं माणूसपण जाणणाऱ्या एका व्यक्तीशी संवाद सुरू होता. खाकी वर्दीच्या अधिकारापेक्षा माणुसकीच्या भाषेला अधिक महत्त्व देणारा अधिकारी अनुभवत होतो.

आणि ते व्यक्तिमत्त्व होते, कोल्हापूरचा रांगडा गडी असलेले तत्कालीन येवला तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी!

कोल्हापूरचा रांगडेपणा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भौगोलिक संदर्भ असला, तरी त्यांच्या स्वभावात मात्र संवादातील सौजन्य, संयम आणि संवेदनशीलता प्रकर्षाने जाणवत होती. एखाद्या व्यक्तीला तिच्या प्रश्नांवरून किंवा आक्रमकतेवरून न जोखता तिच्यामागची भूमिका समजून घेण्याचा त्यांचा स्वभाव त्या पहिल्याच संवादातून लक्षात आला.

खरं तर पोलीस आणि पत्रकार हे लोकशाही व्यवस्थेतील दोन महत्त्वाचे घटक. एक कायदा-सुव्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी सांभाळतो, तर दुसरा समाजातील प्रश्न, अन्याय आणि वास्तव जनतेसमोर आणतो. दोघांच्या कामाच्या पद्धती वेगळ्या असल्या तरी दोघांच्याही कामाच्या केंद्रस्थानी सामान्य माणूस असायला हवा.

Advertisement

मात्र, अनेकदा या दोन्ही घटकांमध्ये संशयाची भिंत उभी राहते. पत्रकारांचा प्रश्न म्हणजे पोलिसांवरील हल्ला आणि पोलिसांचे उत्तर म्हणजे पत्रकारांना दिलेले स्पष्टीकरण, असे समीकरण तयार होते. अशा वातावरणात संदीप कोळी यांच्यासारख्या अधिकाऱ्यांचा संवादाचा दृष्टिकोन वेगळा ठरतो. प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला शत्रू समजण्यापेक्षा त्याच्या प्रश्नामागची सामाजिक अस्वस्थता समजून घेणे, हीसुद्धा प्रशासकीय संवेदनशीलताच आहे.

माझ्या त्या पहिल्या संवादाने एक गोष्ट प्रकर्षाने शिकवली. अधिकाराच्या खुर्चीत बसल्याने माणूस मोठा होत नाही; तर त्या खुर्चीवर बसूनही तो समोरच्या माणसाशी किती सहजतेने वागतो, यावर त्याच्या व्यक्तिमत्त्वाची उंची ठरते.

काळ पुढे सरकला. पदे, ठिकाणे आणि जबाबदाऱ्या बदलत गेल्या. संदीप कोळी यांनी पोलीस दलातील आपल्या प्रवासात विविध ठिकाणी काम केले. कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याची जबाबदारी सांभाळल्यानंतर त्यांची अकोले पोलीस ठाण्याच्या प्रभारीपदी नियुक्ती झाली. आज  अकोले येथे पोलीस निरीक्षक म्हणून ते कार्यरत आहेत.

अलीकडे पत्रकारांशी झालेल्या संवादातही त्यांनी पोलीस हा जनतेचा विश्वासू दूत असल्याची भूमिका मांडली. नागरिकांचे सहकार्य, कायदा-सुव्यवस्था, वाहतुकीचे नियोजन आणि वादांचे प्रभावी निवारण यासाठी लोकसहभागाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. ही भूमिका त्यांच्या कामाकडे पाहण्याचा एक महत्त्वाचा दृष्टिकोन स्पष्ट करते.

खरं तर पोलिसांच्या कामाचे मूल्यमापन केवळ दाखल गुन्ह्यांची संख्या, केलेल्या कारवाया किंवा आरोपींना केलेल्या अटकांवरून होऊ नये. एखाद्या सामान्य माणसाला पोलीस ठाण्यात गेल्यानंतर किती विश्वास वाटतो, अन्यायग्रस्त व्यक्तीचे म्हणणे किती संवेदनशीलतेने ऐकले जाते आणि संकटात सापडलेल्या माणसाला किती आधार मिळतो, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. खाकी वर्दीला कायद्याचे सामर्थ्य असते; पण त्या वर्दीला जनतेच्या मनात सन्मान मिळवून देण्याचे काम माणुसकी करते.

संदीप कोळी यांच्याविषयी लिहिताना माझ्या मनात सर्वप्रथम येते ती २०१८-१९ मधील येवल्यातील ती घटना आणि त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर झालेला आमचा पहिला संवाद. एखाद्या व्यक्तीची ओळख करून घेण्यासाठी अनेक वर्षांचा सहवास आवश्यक नसतो. कधी कधी काही मिनिटांचा संवादही त्या व्यक्तीच्या स्वभावाचा ठसा मनावर उमटवून जातो.

माणसांची नाती विणणारा विणकर म्हणावे असे हे व्यक्तिमत्त्व! पदाच्या मर्यादा सांभाळूनही माणसांशी नाते जोडता येते, अधिकाराचा वापर करतानाही संवेदनशील राहता येते आणि कठोर कर्तव्य बजावत असतानाही संवादातील मृदुता जपता येते, हे अशा व्यक्तिमत्त्वांकडून शिकण्यासारखे आहे.

आज २८ नोव्हेंबर. पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांचा वाढदिवस!या निमित्ताने त्यांना केवळ औपचारिक शुभेच्छा देण्यापेक्षा त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील माणुसकीच्या पैलूला सलाम करावासा वाटतो.

त्यांच्या हातून दीन-दुबळ्या, अन्यायग्रस्त आणि गरजू जनतेची सेवा घडत राहो. कर्तव्य बजावताना त्यांच्या संवेदनशीलतेची वीण अधिक घट्ट होत राहो. पोलीस अधिकारी म्हणून कर्तृत्वाचा आलेख उंचावत असतानाच माणूस म्हणूनही त्यांनी अशीच माणसांची मने जिंकत राहावीत.

आई भवानी चरणी हीच प्रार्थना!

संदीप कोळी साहेब, वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

शेवटी वर्दी अंगावर असते; पण माणुसकी मनात असावी लागते!

 

— कुमार कडलग

दुनियादारी Won’t Lie.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *