विमान कंपन्यांकडून होणारी लूट थांबवावी; तिकिटांचे दर स्थिर ठेवण्यासाठी नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना चंदन पवार यांचे पत्र
विमान कंपन्यांकडून होणारी लूट थांबवावी;
तिकिटांचे दर स्थिर ठेवण्यासाठी नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना चंदन पवार यांचे पत्र
नाशिक प्रतिनिधी
अनेक वर्षापासून विमान कंपन्या ह्या प्रवासी तिकिटाचे दर रोज बदलत असतात, प्रत्येक दिवशी त्याच मार्गावरील विमानांच्या तिकिटात मोठी तफावत असते आणि विशेष बाब म्हणजे सुट्टीचे दिवस आणि सणासुदींच्या दिवसात तर विमानांच्या तिकिटात विमान कंपन्या अनेक पटीने वाढ करीत असतात, दोन तासाच्या प्रवासासाठी जर सामान्यता 4 हजार रुपये लागत असतील तर, तोच प्रवास करण्यासाठी सणासुदींच्या दिवसात 9 ते 10 हजार रुपये घेवून कंपन्या सर्रास लूट करतांना दिसत आहेत. अशी लूट थांबवावी अशी मागणी भाजपा बुद्धिजीवी प्रकोष्ठ,उत्तर महाराष्ट्रचे अध्यक्ष तसेच नमो विचार मंच (दिल्ली) महाराष्ट्र प्रदेशचे कार्याध्यक्ष चंदन पवार यांनी नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना पत्र पाठवून केली आहे.
पवार यांनी मंत्री मोहोळ यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की,विमान प्रवास आता फक्त श्रीमंत लोक करीत नसून, मध्यमवर्गीय लोक सुद्धा करीत असतात. या कारणास्तव नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने विमान कंपन्यांना आदेशित करून प्रवास तिकिटाचे दर स्थिर करावेत, असे केले तर अनेक मध्यमवर्गीय लोकांवरील आर्थिक भार कमी होईल.विमान प्रवास फक्त श्रीमंत लोकांसाठीच आहे हा जो भ्रम सामान्य लोकांमध्ये निर्माण झाला आहे,तो दूर करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत आणि सामान्य लोकांना प्रवास करण्यासाठी प्रोत्साहित करावे.जेणेकरून सामान्य लोकांना विमान प्रवास करण्यास कुठलीही अडचण निर्माण होणार नाही.आज ज्या पध्दतीने रेल्वे, सरकारी बस तसेच खाजगी बस यांचे तिकिटांचे दर स्थिर आहेत व त्यावर सरकारचे नियंत्रण आहे, त्याचप्रमाणे विमानांचे दर सुद्धा स्थिर असावेत आणि त्यावर सरकारचे नियंत्रण असावे अशी मागणी भाजपा बुद्धिजीवी प्रकोष्ठचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष चंदन पवार यांनी नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.