महायुती सत्तेत आल्यानंतर मालेगावचे नाव बदलून “माहुलीग्राम” करण्याची चंदन पवार यांची मागणी
महायुती सत्तेत आल्यानंतर मालेगावचे नाव बदलून “माहुलीग्राम” करण्याची चंदन पवार यांची मागणी
मालेगाव प्रतिनिधी
मालेगाव शहराला अनेक दशकांचा इतिहास आहे, जवळपास 40 वर्षापासून मालेगाव जिल्हा व्हावा यासाठी सामान्य लोक प्रयत्न करीत आहेत त्यात काही राजकीय नेते सोडले तर इतर राजकीय नेत्यांना मालेगाव जिल्हा व्हावा याची चिंता नाही, आजही मालेगाव जिल्ह्याची मागणी सरकार दरबारी धूळ खात पडलेली आहे, पुर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मालेगावी येऊन मालेगाव जिल्हा करण्याचे आश्वासन दिले होते.परंतु ते पूर्ण झालेले नाही, महायुतीची सत्ता आल्यानंतर नवीन मुख्यमंत्री मालेगाव जिल्ह्याची मागणी नक्कीच पूर्ण करतील अशी खात्री आहे, दुसरी म्हणजे मालेगावचे नाव बदलून “माहुलीग्राम” करावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालावे अशी मागणी नमो विचार मंच, महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष चंदन पवार यांनी पत्राद्वारे केली आहे.
“माहुलीग्रामचा इतिहास:-
हैदराबाद संस्थान आर्थिक डबघाईला आल्याने तेथील वीणकरांना निजामाने हाकलुन लावले होते. वीणकरांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची महेश्वर येथे भेट घेवुन रोजगाराची मागणी केली तेव्हा त्यांनी हैदराबादच्या वीणकरांना चरखा,सुत,अन्नपाणी तसेच राहायला जागा दिली त्यास मालेगंज /मालेगाव असे नाव दिले असून आपल्या पुत्राच्या स्मरणार्थ मालेरावांच्या नावाने मालेगाव वसाहत निर्माण केली गेली आहे. मालेगावात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी निर्माण केलेला एक पुल देखील अस्तित्वात असुन त्यांच्या कार्याची साक्ष देत आजही उभा आहे.”
मालेगावचा इतिहास :-
मालेगाव हे नाव कसे पडले, याबाबत अनेक प्रवाद आहेत. संगमेश्वर भागात माळी समाज मोठ्या प्रमाणावर आहे, माळीग्राम वरुन मालेगाव हे नाव पडले असावे, तर एकेकाळी पहिलवानांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या मल्लग्राम वरुन मालेगाव झाले असावे. मालेगावच्या दक्षिण दिशेला चंदनपुरी येथे खंडोबाचे ( दोन्ही पत्नींसह असलेले एकमेव) प्राचीन मंदिर आहे. मल्हारी मार्तंड यावरुन मालेगाव आले असावे. मालव्याच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांचे साम्राज्य इंदोर, उज्जैन शिवाय चांदवड येथे होते. आपला एकुलता एक मुलगा मालेराव यांचे निधनानंतर त्याचे स्मरणार्थ मालेगाव नाव ठेवले असावे असे अनेक प्रवाद आहेत. इसवी सन आठव्या आणि नवव्या शतकात हिंदुस्थानच्या एका मोठ्या भूखंडावर राष्ट्रकुट नावाच्या राजाचे साम्राज्य होते. ज्यात मालेगावसह आसपासच्या इलाख्यांचा समावेश होता. मालेगावपासून सात किमी अंतरावरील वजीरखेडे येथे नारायण मोतीराम माळी या शेतकऱ्याला नांगरतांना एक ताम्रपट सापडला तो संस्कृत भाषेत आहे. या राष्ट्रकुट वंशाचा राजा इंद्रराज तिसरे याने काही गावे दान केली होती. ताम्रपटावर यासंबंधीचे दानपत्र, बक्षिसनामा कोरलेला आहे. २४ फेब्रुवारी ९१५ ला कोरलेला ह्या ताम्रपटावर ‘माहुलीग्राम’ असे कोरले असून माहुलीग्रामचा अपभ्रंश मालेगाव झाले असावे अशी माहिती उपलब्ध आहे. हा सर्व इतिहास जाणून घेता आपण मालेगावचे नामकरण “माहुलीग्राम” करावे, कारण इतिहासाची जपवणूक आणि त्याचा प्रसार प्रचार होणे खूप गरजेचे आहे, मागील काही वर्षाच्या अनुभवावरून राजकारण्यांनी इतिहासाची तोडमोड करून एक वेगळाच इतिहास लोकांसमोर ठेवला आहे असा आरोप पवार यांनी केला आहे, आपला इतिहास आणि संस्कृती कशी जपली जाईल याकडे बारकाईने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. असा दावा पवार यांनी केला आहे.