विकास आणि पर्यावरण? CREDAI चा हरित उपक्रम नाशिकसाठी नवा मापदंड ठरणार!
विकास आणि पर्यावरण?
CREDAI चा हरित उपक्रम नाशिकसाठी नवा मापदंड ठरणार!
भारताच्या शहरीकरणाच्या वेगवान प्रवासात पर्यावरणाचा समतोल राखणे ही सर्वात मोठी कसरत ठरली आहे. एका बाजूला काँक्रीटची वाढती जंगलं आणि दुसऱ्या बाजूला घटणारे नैसर्गिक स्रोत या विरोधाभासी वास्तवात CREDAI सारख्या रिअल इस्टेट क्षेत्रातील संस्थेकडून पर्यावरण पुनर्संचयितीकरणाचा घेतलेला पुढाकार निश्चितच लक्षवेधी आहे. नाशिकमध्ये पश्चिम घाट परिसरात सुरू केलेला वृक्षारोपण व परिसंस्था पुनरुज्जीवनाचा उपक्रम केवळ प्रतीकात्मक न राहता दीर्घकालीन परिणाम साधेल का, हा खरा प्रश्न आहे.
दिंडोरीपासून सुरू झालेल्या या मोहिमेत १,४२५ एकर क्षेत्रावर ३३ हजार स्थानिक प्रजातींची लागवड ही सकारात्मक सुरुवात म्हणावी लागेल. मात्र, १ लाख एकरावर २० लाख रोपांचे उद्दिष्ट केवळ आकड्यांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्षात टिकून राहणारी हरित क्रांती ठरावी, यासाठी सातत्यपूर्ण देखभाल, वैज्ञानिक नियोजन आणि स्थानिक समुदायांचा सहभाग अनिवार्य आहे.
रिअल इस्टेट क्षेत्रावर पर्यावरणीय नुकसानाचे आरोप होत असताना, त्याच क्षेत्रातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश जाणे हा महत्त्वाचा बदल ठरू शकतो. परंतु, अशा उपक्रमांची विश्वासार्हता टिकवण्यासाठी पारदर्शकता, डेटा आधारित अहवाल आणि प्रत्यक्ष परिणाम मोजण्याची प्रणाली आवश्यक आहे. अन्यथा, ‘ग्रीन इमेज’ निर्माण करण्यापुरते हे प्रयत्न मर्यादित राहण्याचा धोका नाकारता येणार नाही.
कामगार कौशल्य विकासाच्या माध्यमातून सामाजिक परिणाम साधण्याचा CREDAI चा प्रयत्नही महत्त्वाचा आहे. शाश्वत विकास म्हणजे केवळ झाडे लावणे नव्हे, तर माणसांच्या जीवनमानात सुधारणा घडवणेही तितकेच आवश्यक आहे.
नाशिकला एकात्मिक भूभाग आणि नदी कॅचमेंट पुनर्संचयितीकरणाचे मॉडेल बनवण्याची घोषणा आशादायी असली, तरी तिची खरी कसोटी अंमलबजावणीत आहे. पर्यावरण आणि विकास यांच्यातील संघर्षाला सहअस्तित्वाचा मार्ग मिळू शकतो का? CREDAI चा हा हरित प्रयोग त्या प्रश्नाचे उत्तर ठरू शकतो.
-कुमार कडलग
नाशिक
दुनियादारी won’t lie



