पांडाणे टोल नाक्यावर आय जी पथकाने बांधल्या गुटखा माफियांच्या मुसक्या ;
पांडाणे टोल नाक्यावर आय जी पथकाने बांधल्या गुटखा
माफियांच्या मुसक्या ;
वणी प्रतिनिधी
गुजरातहुन धरमपूर पेठ तसेच सापुतारा वणी मार्गे गुटख्याची चोरटी वाहतूक सुरु असल्याची चर्चा आयजीच्या पथकाने केलेल्या कारवाईमुळे वास्तव ठरली आहे.अनेकदा गोपनीय खबर मिळुनही स्थानिक पोलिसांशी असलेले लागेबांधे कारवाईला प्रतिबंध करीत आहे.
सापूतारा रस्त्यावरील पांडाणे टोलनाक्यावर झालेल्या कारवाईत देखील वणी पोलिसांच्या हद्दीत कारवाई झाली म्हणून त्यांना कारवाईत सहभागी करून घेतले अशी चर्चा सुरु आहे.
गुजरात राज्यातून अहिल्यानगर येथे विक्रीसाठी महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा आयशर वाहनाने चोरटी वाहतूक करताना विशेष पोलिस महानिरीक्षक नाशिक परीक्षेत्र नाशिक यांचे पथकाने संयुक्त कामगिरी करीत पकडला आहे. याबाबत सुरत येथील दोघा व्यापाऱ्यांसह पाच जणांवर वणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुजरात राज्यातून वणीमार्गे गुटखाची राज्यातील विविध ठिकाणी विक्रीसाठी चोरटी व अवैध वाहतूक होत असते. गुरुवारी (ता. १७) सायंकाळी ५.४५ च्या सुमारास गुटखाविरोधी केलेल्या कारवाईत विशेष पोलिस महानिरीक्षक नाशिक परीक्षेत्र नाशिक यांचे पथकाने मालवाहू ट्रकमध्ये गुटख्याची अवैधरीत्या तस्करी करणाऱ्या व्यक्तींवर छापा टाकून कारवाई केली आहे. छाप्यात २३ लाख ४० हजार किमतीचा हिरा पानमसाला व मालवाहू ट्रक, असा एकूण ४३ लाख ६५ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी संशयित शौकत चांद शेख, (वय २६, रा. न्यू. टिळक रोड, वाडिया पार्कसमोर, अहिल्यानगर), शेख जमील जब्बार (वय २५, रा. शेवगाव, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर), व्यापारी रिजवान भाई (रा. श्रीरामपूर), गुटखा पुरवठादार व्यापारी मदनी चाचा (मयूर एजन्सी, साहिल मार्केट, मेन रोड, सुरत) व हस्तक नामे शोऐब (रा. सुरत) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.