नाशिक ग्रामीण पोलीस यांची धडक कारवाई; छत्रपती संभाजीनगर येथे बनावट नोटांचा छापखाना उध्वस्त; मुख्य सूत्रधारासह ९ आरोपी जेरबंद
नाशिक ग्रामीण पोलीस यांची धडक कारवाई;
छत्रपती संभाजीनगर येथे बनावट नोटांचा छापखाना उध्वस्त; मुख्य सूत्रधारासह ९ आरोपी जेरबंद
नाशिक / प्रतिनिधी :
मालेगाव येथील एचडीएफसी बँकेच्या सटाणा रोड शाखेत ५०० रुपयांच्या बनावट नोटा आढळल्यानंतर सुरू झालेल्या तपासात नाशिक ग्रामीण पोलीसांनी मोठे रॅकेट उघडकीस णले आहे . या कारवाईत मुख्य सूत्रधार संतोष उत्तमराव केळकर (रा. जय भवानी नगर, छत्रपती संभाजीनगर) याच्यासह एकूण आठ जणांना अटक करण्यात आली आहे.
असा लागला सुगावा
दि. २३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ ते ११.३० वाजण्याच्या सुमारास एचडीएफसी बँक, सटाणा रोड, मालेगाव येथे महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स कंपनीच्या खात्यात ८९ हजार रुपये जमा करण्यात आले. त्यापैकी ५० हजार रुपयांच्या ५०० रुपयांच्या १०० नोटा बनावट असल्याचे आढळले.
याबाबत सहाय्यक व्यवस्थापक मोहन बापुराव मुसळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजि. नं. २३/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम १७९, १८० प्रमाणे दाखल करण्यात आला.
खातेदाराची चौकशी
पोलीसांनी गणेश खरे याची चौकशी केली असता त्याला सदर रक्कम अजय राठोड (रा. जातेगाव, ता. नांदगाव) याने ट्रॅक्टरचा हप्ता भरण्यासाठी दिली असल्याचे निष्पन्न झाले.
अजय राठोड यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याला हे पैसे करण राठोड (रा. राजालेगाव/मोरगाव परिसर) याने दिले असल्याचे समजले.
करण राठोड याच्याकडे चौकशी केली असता त्यास बनावट नोटा बन्सीलाल यादव (रा. कन्नड ) याने पुरविल्या असल्याचे उघड झाले. बन्सीलाल यादव याच्याकडून पुढील माहिती घेतली असता त्यास या नोटा समीर शेख (रा. कन्नड) याच्यामार्फत मिळाल्याचे समजले.
तपास अधिक खोलात गेल्यानंतर समीर शेख यास बनावट नोटा गोल्डन कुरेशी (रा. संभाजीनगर) याने पुरवल्या होत्या. पुढे गोल्डन कुरेशी याने त्या नोटा अजिंक्य जाधव याच्याकडून घेतल्याचे सांगितले.
अजिंक्य जाधव याने चौकशीत कबुली देताना या नोटा त्याला शुभम थोरात (रा. संभाजीनगर) याने दिल्याचे सांगितले.
….मुख्य सूत्रधार जेरबंद
सखोल तपासात या संपूर्ण रॅकेटचा सूत्रधार संतोष उत्तमराव केळकर (रा. जय भवानी नगर, छत्रपती संभाजीनगर) असल्याचे निष्पन्न झाले. तो व्यवसायाने ग्राफिक डिझायनर असून “विनायक ग्राफिक्स” नावाचे दुकान चालवित होता.
पोलीसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५०० रुपयांच्या २०० बनावट नोटा जप्त करण्यात आल्या.तसेच दुकानातून संगणक संच,प्रिंटर,८५ GSM कागद,स्क्रीन प्रिंट साहित्य,पेन ड्राईव्ह,मोबाईल फोन,प्रिंटिंग इंक,स्केल कटर व इतर साहित्य असे एकूण अंदाजे १,३६,७०० रुपये किंमतीचे साहित्य जप्त करण्यात आले.
या प्रकरणात गणेश कैलास खरे – महिंद्रा फायनान्स कलेक्शन एजंट,अजय राठोड – रा. जातेगाव, ता. नांदगाव,करण राठोड – रा. राजालेगाव मोरगाव परिसर,बन्सीलाल यादव – रा. कन्नड, समीर शेख – रा. कन्नड,गोल्डन कुरेशी – रा. संभाजीनगर,अजिंक्य जाधव,शुभम थोरात – रा. संभाजीनगर,संतोष उत्तमराव केळकर – मुख्य सूत्रधार, व्यवसाय ग्राफिक डिझायनर, रा. जय भवानी नगर, छत्रपती संभाजीनगर या संशयितांना नाशिक ग्रामिण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तपास पथक
ही कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक दर्शन दुगड यांच्या नेतृत्वाखाली छावणी पोलीस ठाण्याचे पो.नि. योगेश पाटील,पो.हवा. गांगुर्डे पो..शि. सय्यद पो.शि. नितीन अहिरे,पो.शि. वैभव आहेर,पो.शि. सलमान खाटीक,पो.शि. गोरख ठोंबरे यांच्या पथकाने केली.या कारवाईमुळे बाहेरील जिल्ह्यातून चालणारे बनावट चलनी नोटांचे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आले असून पुढील तपास सुरू आहे.



