Bussiness

राजकारणाचा रस्ता समाजकारणाच्या पोटातून जातो! राजकारणासाठी राजकारण करण्याचा अट्टहास नेतृत्वाला शोभणारा नाही… कुमार कडलग, नाशिक-संगमनेर 


राजकारणाचा रस्ता समाजकारणाच्या पोटातून जातो!

राजकारणासाठी राजकारण करण्याचा अट्टहास नेतृत्वाला शोभणारा नाही…

कुमार कडलग, नाशिक-संगमनेर 

 

राजकारण आणि समाजकारण यांच्यामध्ये एक अतिशय पुसटशी सीमारेषा असते. खरं तर कोण राजकारण करतोय आणि कोण समाजकारण, हे वरवर पाहून सहज लक्षात येत नाही. त्यासाठी दृष्टिकोन हवा, वैचारिक प्रगल्भता हवी आणि प्रसंगाचे सामाजिक व सांस्कृतिक संदर्भ समजून घेण्याची प्रतिभाही हवी. हे येड्यागबाळ्याचे काम नाही. ही जाण ज्यांच्याकडे असते किंवा ज्यांनी अनुभवी लोकांच्या सहवासातून ती आत्मसात केलेली असते, ते राजकारणात सहसा दिशाहीन ठरत नाहीत.

 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अमर कातारी यांनी ही बाब गांभीर्याने समजून घेण्याची गरज आहे. राजकारणासाठी राजकारण करणे चुकीचे नाही; मात्र त्यालाही एक हंगाम असतो, एक वेळ असते आणि एक मर्यादा असते. प्रत्येक दिवस उजाडला की प्रत्येक गोष्टीत राजकारण शोधणे, प्रत्येक सामाजिक उपक्रमाकडे राजकीय चष्म्यातून पाहणे, हे सुदृढ आणि निरोगी राजकीय मानसिकतेचे लक्षण निश्चितच नाही. असुया किंवा पूर्वग्रहदूषित मानसिकता असेल, तर माणसाला प्रत्येक गोष्टीत राजकारणच दिसते.

 

अलीकडच्या काळात अमर कातारी यांच्या राजकीय भूमिकेत काहीशी अस्वस्थता आणि संयमाचा अभाव जाणवू लागला आहे. वास्तविक पाहता, ते एक अभ्यासू, लढवय्ये आणि संघर्ष करण्याची क्षमता असलेले नेतृत्व म्हणून संगमनेरच्या मातीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू शकतात. त्यांच्याकडे राजकीय भवितव्य घडविण्याची क्षमता आहे. मात्र, त्यासाठी संयम, व्यापक दृष्टिकोन आणि सामाजिक प्रश्नांकडे पाहण्याची सकारात्मक वृत्ती अंगी बाणवणे आवश्यक आहे.

 

राजकारणाचा रस्ता हा समाजकारणाच्या पोटातून जातो, हे राजकीय कार्यकर्त्यांनी विसरता कामा नये. समाजाच्या सुख-दुःखात सहभागी होणे, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून पाठबळ देणे, हीसुद्धा नेतृत्वाचीच कसोटी असते. प्रत्येक व्यासपीठ हे राजकीय शक्तिप्रदर्शनासाठी नसते आणि प्रत्येक सामाजिक कार्यक्रम हा कुणाच्या तरी राजकीय वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी आयोजित केलेला नसतो.

Advertisement

 

अनंत फंदी नाट्यगृहाच्या लोकार्पण सोहळ्याचेच उदाहरण घ्या. या कार्यक्रमाचे निवेदन स्मिता गुणे यांनी केले म्हणून त्यात राजकीय अर्थ शोधण्याची गरज काय? या विचारपीठावर सर्वपक्षीय आणि विविध गटांतील महिला नेत्या उपस्थित होत्या, याचा अर्थ राजकीय समीकरणे बदलली किंवा कुणी कुणाला राजकीय शह दिला, असा होत नाही. सांस्कृतिक व्यासपीठ आणि राजकीय व्यासपीठ यांच्यातील फरक समजून घेण्यासाठी राजकीय परिपक्वता लागते.

 

सांस्कृतिक संस्कार आणि राजकीय संघर्ष या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. राजकारणात विरोधक असू शकतात; पण समाजकारणात सहकार्याची दारे कायम खुली ठेवावी लागतात. कारण समाज कोणत्याही एका पक्षाचा, गटाचा किंवा नेत्याचा नसतो. सांस्कृतिक वारसा कुणाच्या राजकीय मालकीचा नसतो आणि सामाजिक उपक्रमांकडे पक्षीय चष्म्यातून पाहणे म्हणजे स्वतःच्या राजकीय कक्षा संकुचित करून घेण्यासारखे आहे.

 

अमर कातारी यांनी आपल्या राजकीय ऊर्जेचा वापर सकारात्मक संघर्षासाठी करावा. सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारावेत, जनतेचे प्रश्न लावून धरावेत, अन्यायाविरोधात आवाज उठवावा. पण प्रत्येक सामाजिक-सांस्कृतिक घडामोडीत राजकीय षडयंत्र शोधण्याचा अट्टहास टाळावा.

 

कारण राजकारणात केवळ विरोध करून नेता होता येत नाही; तर समाजाला सोबत घेऊन चालावे लागते. विरोधकांच्या चांगल्या कामाचे कौतुक करण्याइतकी उदारता आणि स्वतःच्या भूमिकेचे आत्मपरीक्षण करण्याइतका संयमही नेतृत्वात असावा लागतो.

 

अनंत फंदी नाट्यगृहाच्या लोकार्पण सोहळ्यातील निवेदनापासून सर्वपक्षीय महिला नेत्यांच्या उपस्थितीपर्यंतच्या घटनांकडे राजकीय संशयाच्या नजरेतून पाहण्यापेक्षा त्यामागील सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भ समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे.

 

हा साधा फरक जोपर्यंत अमर कातारी यांच्या लक्षात येत नाही, तोपर्यंत त्यांच्या राजकीय अस्वस्थतेचे कोडे त्यांनाही उलगडता येणार नाही.

 

तूर्तास इतकेच!

दुनियादारी won’t lie 

(मार्कंडेय प्रकाशन फिचर्स सर्व्हिस)


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *