क्राईम

उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मटका जुगार पुन्हा तेजीत ; विशेष पथकातील “त्या” अधिकाऱ्यांवर विशेष लक्ष देण्याची गरज 


 

उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मटका जुगार पुन्हा तेजीत ;

विशेष पथकातील “त्या” अधिकाऱ्यांवर विशेष लक्ष देण्याची गरज 

 

नाशिक प्रतिनिधी

 

पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारितील परिमंडळ दोन अंतर्गत उपनगर पोलिस ठाणे कायद्याने संमती दिलेल्या मात्र नैतिकतेच्या पातळीवर निषेधार्ह ठरविलेल्या ऑनलाईन रमीशी संबंधित आय डी धारकांची यादी तयार करून महसूल वाढविण्यात व्यस्त असल्याने हद्दीतील कायद्याने अवैध ठरवलेल्या व्यवसायावर कारवाई करण्यासाठी फुरसत नसल्याचे वास्तव दै. प्रहारच्या निदर्शनास आले आहे.

उपनगरातून म्हणजेच नवीन उपनगर पोलीस ठाण्याच्या इमारतीपासून जेलरोडच्या दिशेला जात असताना अप्पू चौकात रस्त्याच्या दोन्ही बाजूला मटका जुगारीचा अड्डा राजरोस सुरू आहे. एका बाजूला अवैध धंदे चालकाच्या मोठ्या धंद्याचे “दर्शन” होते. त्या ठिकाणी मटका जुगार अंदर बाहेर टेबल सोरट पत्त्याचा क्लब खुलेआम सुरु आहे.. त्याच्या अगदी समोरच अवैध व्यवसायाची दुसरी आस्थापना आहे. या धंद्याचा मालक उघडपणे कायद्याला “शेंड्या” लावून पोलिसांना “मोहिनी”घालतो.

Advertisement

मुख्य म्हणजे या दोन यशस्वी धंदे चालकांनी उपनगर परिसरातील सगळ्याच अवैध धंद्यांचे कंबरडे मोडले आहे. आणि या अवैध धंद्यावर मोठी उलाढाल पाहायला मिळते.या धंद्याच्या मिल्कतीतून अवघ्या काही महिन्यात दोन मजली इमारत उभी करण्याइतपत महसूल गोळा झाल्याने धंद्याची व्याप्ती सहज लक्षात येते.ही उदाहरणे फक्त प्रातिनिधीक आहेत. उपनगर हद्दीत याच धाटणीचे अनेक अवैध धंदे सुरु असून अंबड, देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यालाही या पोलिस ठाण्याच्या कर्तव्यदक्षतेने मागे टाकले आहे.

पोलिस ठाण्याकडे आलेल्या तक्रारीला न्याय देण्यासाठी फुरसत नसलेल्या या पोलिस ठाण्यात मात्र ऑनलाईन रमीशी संबंधित व्यक्तींना पोलिस ठाण्यात बोलावून, साम, दाम दंड अशी अस्रे वापरून भेद निर्माण करायचा आणि एकाकडून दुसऱ्याविरुद्ध साधा अर्ज लिहून घ्यायचा, त्या अर्जाचा आधार घेऊन संबंधित व्यक्तीला पोलिस ठाण्यात बोलावून घ्यायचे, यातच पोलिस ठाण्याची ऊर्जा खर्च केली जात आहे. या पोलिस ठाण्यातून इच्छा नसताना विशेष पथकात नुकतीच बदली झालेल्या अधिकाऱ्याने दोनशे लोकांचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून यादी तयार केल्याचे माहितीगार सूत्रांनी सांगितले. या विशेष पथकात राहूनही हे अधिकारी पदावरील व्यक्तिमत्व हीच कार्यशैली पुढे नेणार नाही यासाठी पोलिस आयुक्त आणि उपायुक्तांना विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *