नाशिकमध्ये अन्न व औषध प्रशासनाचा दणका! एकाच दिवसात पाच हॉटेल्सवर कारवाई; चार परवाने, एक नोंदणी प्रमाणपत्र निलंबित _अस्वच्छता, मुदतबाह्य अन्नपदार्थ, किचनमध्ये कीटकांचा प्रादुर्भाव; काही ठिकाणी उंदरांची विष्ठाही आढळली_ विहार, तुषार दुर्गा कॅफे, श्याम सुंदरचा समावेश
नाशिकमध्ये अन्न व औषध प्रशासनाचा दणका! एकाच दिवसात पाच हॉटेल्सवर कारवाई; चार परवाने, एक नोंदणी प्रमाणपत्र निलंबित
_अस्वच्छता, मुदतबाह्य अन्नपदार्थ, किचनमध्ये कीटकांचा प्रादुर्भाव; काही ठिकाणी उंदरांची विष्ठाही आढळली_
विहार, तुषार दुर्गा कॅफे, श्याम सुंदरचा समावेश
नाशिक : प्रतिनिधी
शहरातील हॉटेल्स आणि खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांमधील अस्वच्छता व अन्न सुरक्षा नियमांच्या उल्लंघनाविरोधात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. एकाच दिवसात नाशिकमधील पाच अन्न आस्थापनांवर कारवाई करत चार हॉटेल्सचे परवाने आणि एका कॅफेचे नोंदणी प्रमाणपत्र तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. तपासणीदरम्यान काही ठिकाणी स्वयंपाकघरातील अस्वच्छता, कीटकांचा प्रादुर्भाव, मुदतबाह्य अन्नपदार्थ, अयोग्य साठवणूक, तर एका हॉटेलच्या स्टोअर रूममध्ये चक्क उंदरांची विष्ठा आढळून आली. या कारवाईमुळे शहरातील हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे, सहआयुक्त मंगेश माने तसेच सहाय्यक आयुक्त विनोद धवड आणि ज्ञानेश्वर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली १९ नोव्हेंबर रोजी नाशिक शहरातील विविध अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर २० नोव्हेंबर रोजी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पाच आस्थापनांविरोधात परवाने व नोंदणी प्रमाणपत्र निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली.
पाच आस्थापनांवर कारवाई
अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केलेल्या आस्थापनांमध्ये गंगापूर रोडवरील जुना गंगापूर नाका परिसरातील मे. हॉटेल विहार, सातपूर एमआयडीसीतील मे. हॉटेल श्यामसुंदर, कॉलेज रोडवरील मलेरिया स्टॉप येथील मे. हॉटेल तुषार मिसळ, आडगाव फाटा येथील मे. हॉटेल महाराजा काठियावाडी आणि कृषीनगर येथील क्युबॉइड बिझनेस सेंटरमधील मे. कॅफे दुर्गा यांचा समावेश आहे.
यापैकी चार हॉटेल्सचे अन्न व्यवसाय परवाने, तर कॅफे दुर्गाचे नोंदणी प्रमाणपत्र निलंबित करण्यात आले आहे.
हॉटेल विहारमध्ये कीटकांचा प्रादुर्भाव
जुना गंगापूर नाका येथील हॉटेल विहारच्या तपासणीत अन्न सुरक्षा व मानके नियम २०११ मधील अनुसूची-४ चे उल्लंघन झाल्याचे आढळले. आस्थापनेत अस्वच्छता असून अन्न तयार करण्याच्या ठिकाणी कीटक व इतर उपद्रवी जीवांचा प्रादुर्भाव असल्याचे तपासणीत समोर आले.
श्यामसुंदर हॉटेलमध्ये कच्च्या मालाची अस्वच्छ साठवणूक
सातपूर एमआयडीसीतील हॉटेल श्यामसुंदर येथेही स्वच्छतेच्या नियमांना हरताळ फासल्याचे आढळले. कच्चा अन्नमाल अस्वच्छ परिस्थितीत साठविण्यात आला होता. तसेच स्वयंपाकघराच्या निर्धारित रचना व बांधकामविषयक अटींचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाले.
कॅफे दुर्गाच्या बिलांवर FSSAI क्रमांकच नाही
कृषीनगर येथील कॅफे दुर्गामध्ये अस्वच्छतेबरोबरच ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या बिलांवर FSSAI परवाना क्रमांक नमूद नसल्याचे आढळले. विशेष म्हणजे, मेन्यू कार्ड किंवा डिस्प्ले एरियामध्ये स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या माध्यमाचा (Cooking Medium) उल्लेखही करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे या आस्थापनेचे नोंदणी प्रमाणपत्र निलंबित करण्यात आले.
तुषार मिसळमध्ये मुदतबाह्य पदार्थ
कॉलेज रोडवरील मलेरिया स्टॉप परिसरातील हॉटेल तुषार मिसळच्या तपासणीत अन्नपदार्थांच्या साठवणुकीसाठी अपुरी जागा असल्याचे तसेच मुदतबाह्य अन्नपदार्थ आढळून आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. याशिवाय स्वच्छतेच्या नियमांचेही उल्लंघन झाले होते.
महाराजा काठियावाडीच्या स्टोअर रूममध्ये उंदरांची विष्ठा
आडगाव फाटा येथील हॉटेल महाराजा काठियावाडीमधील परिस्थिती अधिक गंभीर असल्याचे तपासणीत समोर आले. स्टोअर रूममध्ये उंदरांची विष्ठा आढळली, मुदतबाह्य अन्नपदार्थ साठवून ठेवण्यात आले होते. तसेच अन्नपदार्थ तयार करण्याच्या जागेत धूळ व कीटकांचा प्रवेश रोखण्यासाठी आवश्यक व्यवस्था नसल्याचेही निदर्शनास आले.
पथकाची कारवाई, नागरिकांना तक्रारीचे आवाहन
ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी अश्विनी पाटील, ऋतुजा नवले, प्रतीक महाजन, किशोर चांदगुडे आणि संकेत वेलमामे यांनी केली.
नागरिकांचे आरोग्य, अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि सुरक्षितता यांना सर्वोच्च प्राधान्य देऊन अशा आस्थापनांची तपासणी व नियमानुसार कारवाई सुरूच राहणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सर्व अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ तसेच त्याअंतर्गत लागू नियमांचे काटेकोर पालन करावे आणि आवश्यक परवाना अथवा नोंदणी प्राप्त केल्यानंतरच व्यवसाय करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अन्नपदार्थांच्या गुणवत्ता किंवा सुरक्षिततेबाबत संशय असल्यास नागरिकांनी complaints.mahafda.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असेही प्रशासनाने म्हटले आहे.
एकाच दिवसात पाच आस्थापनांवर झालेल्या या कारवाईमुळे शहरातील हॉटेल्समधील स्वच्छता आणि अन्नसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. केवळ तपासणीपुरती कारवाई न राहता ती नियमित आणि व्यापक स्वरूपात सुरू राहणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.



