पोरांसाठी नेत्यांची फिल्डिंग भारी, मतदारांना मुर्खात काढी ¡
पोरांसाठी नेत्यांची फिल्डिंग भारी, मतदारांना मुर्खात काढी ¡
……………..
कुमार कडलग
कार्यकारी संपादक, सायं. दै. नायक
नाशिक
…………….

विद्यमान राजकारण किती गलिच्छ झाले, राजकारणाची किती घसरण झाली? नीतिमत्ताच राहिली नाही, अशा प्रकारच्या चर्चा अलीकडच्या काळात सर्रास कानावर येऊ लागल्या. यापूर्वी राजकीय पक्षांचे राजकारण तत्वनिष्ठ होते.केवळ विरोधासाठी विरोध न करता तात्विक विरोध हेच राजकीय अधिष्ठान होते. राजकीय पक्षाने विचारांची बैठक होती. म्हणूनच नेते आणि त्या पाठोपाठ कार्यकर्त्यांनाही नैतिक मूल्य पायदळी तुडविण्याचे धाडस होत नव्हते. मतदार देखील निवडणुकीचा आनंद खुलेपणाने लुटत होते. सामाजिक सलोख्याला नख लावण्याची हिंमत क्वचितच दाखवली जात होती. एकूणच पूर्वीच्या राजकारणात निष्ठा पाझरत होती. सत्ता साध्य नव्हते तर साधन होते. जन कल्याण हे साध्य होते.
अलीकडच्या काळात जन कल्याण साधनही राहिले नाही, सत्ता साध्य बनली. निष्ठा पासंगालाही उरली नाही. वैचारिक बैठक म्हणजे काय याचे उत्तर शोधूनही सापडत नाही. तत्वाचे सत्व नासले आहे. सारे राजकारण सत्तेभोवती पिंगा घालू लागले आहे. निष्ठा, अधिष्ठान केवळ शब्दकोशात पहायला मिळतात. हे शब्द, शब्द कोशात वाचलायलाही भीती वाटावी, राजकीय नीतिमत्ता एवढी घसरली आहे.
लोकशाही जशी प्रगल्भ होत आहे, तसा हा प्रवास वेगाने उलटा सुरु आहे. खरे तर राजकारण एव्हाना परीपक्व व्हायला हवे होते, ते अधिकच बालिश होऊ लागले आहे.हा बदल आता म्हणजे गुवाहटी गोवा मुंबई व्हाया सुरत मार्गांवरून झाला असे अजिबात नाही, त्याची सुरुवात फार आधीपासून झाली आहे. तीव्रता अडीच वर्षांपूर्वी दिसली इतकेच.
राजकारणात युद्ध आणि प्रेमासारखेच सर्व काही माफ असते,हा समज पूर्वीपासून प्रचलित असला तरी विद्यमान राजकारणात युद्धाची तीव्रता आणि प्रेमाचे अंधत्व प्रकर्षाने जाणवू लागले लागले आहे. कोण कुणावर शत्रू भावनेने हल्ला करतो आणि कोण कुणावर प्रेम करते हेच कळत नाही. जनता मात्र वेड्यात निघत आहे. युती आघाडीच्या युगात कोण सत्तेत आहे आणि कोण विरोधात याचा ठाव सापडत नाही.सर्वच सक्रिय राजकीय नेते सत्तेत आणि जनता विरोधी पक्षात असे नवे समीकरण तयार झाले आहे. राजकीय नेते जनतेशी राजकारण खेळत आहेत. विद्यमान विधानसभा निवडणूक हे त्याचे ज्वलंत उदाहरण. निवडणुकीत उमेदवारी मिळाली नाही तर बंडखोरी ही सवय तशी जुनीच. हयात खर्च केलेल्या पक्षात उमेदवारी नाकारली गेली की पारंपरिक विरोधी पक्षाकडून उमेदवारी घ्यायची किंवा थेट अपक्ष मैदानात उतरायचे ही आजवरची प्रथा. यंदाच्या निवडणुकीत तर काय चाललंय तेच कळत नाही. कुठूनही मिळो, उमेदवारी करून सत्तेत बसायचे डोहाळे सर्वांनाच लागले आहे. राजकीय पक्ष देखील हे डोहाळे पुरवायला उत्सुक आहेत. कुणाचाच पायपोस कुणात राहिला नाही. बाप, काका,पुतण्या, वहिनी,भाऊ,बायको सारेच एकाच सभागृहात सोबत बसण्यासाठी आतुर झालेत. त्यासाठी फिल्डिंग देखील सोयीची लावली जात आहे. यात दोन प्रकारच्या प्रवृत्तीचा प्रवाह ओसंडून वाहताना दिसतो.
स्व पक्षात उमेदवारी मिळत नाही याचा अंदाज आला की, विरोधी पक्षात जाऊन निवडणूक लढवायची, विरोधी पक्ष अगदीच टोकाचा विरोधक असेल तर आपल्याच युती किंवा आघाडीतील मित्र पक्षात प्रवेश करून निवडणूक लढवायची अशी नवी प्रथा यंदा पडू पाहत आहे. आश्चर्य म्हणजे या प्रथेला युती किंवा आघाडीतील जेष्ठ श्रेष्ठ नेतृत्वाचीच फूस असल्याचे लपून राहिले नाही. ही लोकशाहीशी केलेली थट्टा नव्हे तर काय? हे सारे उपदव्याप नेते मंडळीच्या दिवट्यांसाठीच सुरु आहेत, हे सांगण्यासाठी कुण्या तत्व वेत्त्याची गरज भासू नये. अशा निवडणुका निष्ठावंत कार्यकर्ते, मतदार विशेषतः केडर बेस वोट बँकेची फसवणूक करणाऱ्या आहेत. आणि मग इथे राजकारणात कट्टर विरोधक देखील मित्र असतो, विरोध केवळ जनतेला दाखवण्यासाठी आहे. याची खात्री पटू लागते. नेते मंडळींनी आपल्या पोरांच्या सोयीसाठी केलेली ही व्यवस्था जनतेला मात्र मुर्खात काढीत आहे.
अर्थात कुठलाही राजकीय वारसा नसलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना कायम डावलले जात असेल, त्यांच्या निष्ठेला कुस्करले जाऊन दिवट्यांचेच फाजील लाड पुरवले जात असतील, तर त्यांनी हक्क म्हणून पक्षाला आव्हान दिले तर ते नैसर्गिक मानायला हवे. असे धाडस फारच थोड्या कार्यकर्त्यांमध्ये असते. बाकी. मंडळींनी कायम सतरंज्या टाकायच्या आणि उचलायच्या…, दिन में भैय्या आणि रात में सैय्या सारखे हे राजकारण मतदार आणखी किती पंचवार्षिक छाताडावर नाचवून घेणार यावरच लोकशाहीचे भवितव्य अवलंबून आहे.