क्राईम

माईनंतरची ओकीबोकी दिवाळी:- माईच्या अनाथ लेकरांची एक भावनिक  साद 


“बाबा, लेकीकडे पोहचाल तेव्हा पोहचाल..आधी कुठेतरी सावलीत बसून जेवून घ्या..माईने खाली त्यांच्या पायाकडे पाहिलं,ते अनवाणी होते,गोपालला त्याच्या पायातली चप्पल त्या बाबाला द्यायला सांगितली ,गोपालने दिली सुद्धा..त्या म्हाताऱ्या बाबाचे डोळे भरले,ते ढसाढसा रडू लागले,माईंनी त्यांना धीर दिला, आणि आम्ही निघालो..गाडीत शांतता होती..माई म्हटली ” विन्या,म्हातारपण आणि त्यात गरिबी वाईट रे,आयुष्यभर कष्ट करायचे आणि उतारवयात हे असं जगणं वाट्याला येणं तर त्याहून वाईट..”

 

 

 

“माई असतानाची दिवाळी आणि आताची दिवाळी यात प्रचंड तफावत आम्हाला जाणवते,माई असताना प्रचंड गर्दी असायची,लोकं खूप गोड खाऊ घेऊन यायचे,माईसोबत फोटो काढायचे,पण माई गेल्या त्यानंतरची दिवाळी मात्र ओकीबोकी होती,कुणीही आलं नाही,मुलांसाठी खाऊ आणायचं सोडा पण साधी भेट सुद्धा दिली नाही कुणी..”

माईनंतरची ओकीबोकी दिवाळी:-

माईच्या अनाथ लेकरांची एक भावनिक 

साद 

 

 

 

आदरणीय स्नेही….नमस्कार….

 

तुम्हा सर्वांना दिपावलीच्या आभाळभर शुभेच्छा..!!

या दिवाळीच्या निमित्ताने तुम्हा सर्वांशी मनमोकळेपणाने बोलावसं वाटलं म्हणून बोलतोय..आमची माई पद्मश्री आदरणीय सौ. सिंधुताई सपकाळ यांनी मला लहानच मोठं केलं..सांभाळलं..खऱ्या अर्थानं आईच प्रेम देऊन जगण्याचं बळ दिलं.. माईने आयुष्यभर खस्ता खाऊन..मानापमान पचवून माझ्यासारख्या हजारो जिवांना जगवलं.जीवांना या अर्थाने कारण ती फक्त अनाथ मुलामुलींचीच आई झाली नाही तर असंख्य गाईंची सुद्धा ती आई होती…रस्त्यावर पडलेल्या ,सोडून दिलेल्या,दूध देत नाही,म्हाताऱ्या झाल्या म्हणून टाकून दिलेल्या गाईंना सुद्धा आपलंसं करून सांभाळलं तिने …तिचा उद्देश फक्त एकच होता,जे मला मिळालं नाही ते इतरांना द्यायचं ..सर्वव्यापी होती ती..रडणाऱ्यांचे अश्रू तिला बघवत नव्हते.तिला कधी भाकर मिळाली नाही,म्हणून तीने हजारों निराधारांना भाकर दिली,तिला शिकता आलं नाही म्हणून तिने तिच्या सांभाळलेल्या मुलामुलींना डॉक्टर,इंजिनिअर, वकील बनवलं..जे शिकले नाही त्यांना समाजात कसं जगावं,राहावं याच व्यावहारिक ज्ञान दिलं.. तिने उभ्या केलेल्या संस्थेच्या आवारातून कुणी कंबरेला बाळ बांधून.. काही किरकोळ वस्तू विकणाऱ्या किंवा तत्सम आयुष्य जगणाऱ्या गरीब महिलेला/पुरुषाला संस्थेत बोलावून खाऊ पिऊ घालून पाठवण्याचं तत्वज्ञान ही तिनेच आम्हा सर्वांना शिकवलं..चालतं बोलतं विद्यापीठ होती आमची माई..घट्ट खायच्या ऐवजी पातळ खाऊ पण सर्वाना सोबत घेऊन खाऊ ..असं म्हणून हजारो अनाथ माईंच्या पदराखाली पोट भरत होते..माझ्या माईने उभ्या केलेल्या या घरांमधून असंख्य अनाथ ,निराधार,जगले ..मोठे झाले..आज ही ते कार्य अविरत सुरू आहे,उणीव भासते ती फक्त माईची.एकदा मी आणि माई वर्धेच्या संस्थेतून पुण्याकडे येत होतो.वर्धेचं काम सांभाळणाऱ्या मनीष भाऊ यांच्या मंडळींनी-आमच्या वहिनींनी छान डबा बांधून दिला होता, दुपारची वेळ होती.. रखरखतं ऊन होतं.तेव्हा समृद्धी महामार्ग नव्हता,मेहकर क्रॉस केलं आणि माईने अचानक गाडी थांबवायला लावली,गाडी थांबली..गोपाल गाडी चालवत होता,त्याला माईने गाडी रिव्हर्स घ्यायला सांगितली,एक वयस्कर बाबा काठी टेकवत जात होते,धोतर आणि फाटकं शर्ट त्यांच्या अंगात होतं, माईंनी त्यांच्या जवळ गाडी थांबवायला सांगितली आणि काच खाली घेतली..आम्हाला कळेनाच माईंनी का गाडी थांबवायला सांगितली ते..काच खाली घेऊन माईंनी त्या बाबांना जवळ बोलावलं आणि मायेने विचारपूस केली..गाडीतला जेवणाचा डबा मला काढायला सांगितला ..मी काढला..आणि त्या बाबांना तो डबा द्यायला लावला..मी दिला..आणि माई म्हटली ” बाबा, लेकीकडे पोहचाल तेव्हा पोहचाल..आधी कुठेतरी सावलीत बसून जेवून घ्या..माईने खाली त्यांच्या पायाकडे पाहिलं,ते अनवाणी होते,गोपालला त्याच्या पायातली चप्पल त्या बाबाला द्यायला सांगितली ,गोपालने दिली सुद्धा..त्या म्हाताऱ्या बाबाचे डोळे भरले,ते ढसाढसा रडू लागले,माईंनी त्यांना धीर दिला, आणि आम्ही निघालो..गाडीत शांतता होती..माई म्हटली ” विन्या,म्हातारपण आणि त्यात गरिबी वाईट रे,आयुष्यभर कष्ट करायचे आणि उतारवयात हे असं जगणं वाट्याला येणं तर त्याहून वाईट..असे असंख्य प्रसंग माझ्या डोळ्यादेखत मी पाहिले,माईला कित्येक वेळा अडचणीत असलेल्या व्यक्तीला मदत करताना मी पाहिलं..त्या प्रसंगांचा मी साक्षीदार असल्याचा मला अभिमान वाटतो..

Advertisement

तिची तळमळ कळत होती मला ,रस्त्याने असा कुणी गरीब दिसला की तिला राहवत नव्हतं,गाडी थांबवून काहीना काही द्यायचीच,आणि म्हणायची ” तुझी माई सुद्धा रेल्वेत भीकच मागायची की रे, ” कुणी तरी येईल आणि काहीतरी देईल या आशेवर सारं जग जगतय बघ…

धार होती तिच्या शब्दांना..भाषण है तो राशन है,म्हणत संपूर्ण महाराष्ट्र भर पदर पसरून मागणाऱ्या माझ्या माईला दुःख लवकर कळत होतं,म्हणूनच ती अनाथांची माय झाली.माई असतानाची दिवाळी आणि आताची दिवाळी यात प्रचंड तफावत आम्हाला जाणवते,माई असताना प्रचंड गर्दी असायची,लोकं खूप गोड खाऊ घेऊन यायचे,माईसोबत फोटो काढायचे,पण माई गेल्या त्यानंतरची दिवाळी मात्र ओकीबोकी होती,कुणीही आलं नाही,मुलांसाठी खाऊ आणायचं सोडा पण साधी भेट सुद्धा दिली नाही कुणी.. .या दिवाळीच्या निमित्ताने मला तुम्हाला सांगायचंय की आजही माईच हे कार्य जोमाने सुरू आहे..आमचे मोठे बंधू माईंचे पहिले मानसपुत्र,ज्यांच्यापासून या कार्याचा श्रीगणेशा माईने केला ते दिपक दादा गायकवाड,ममताताई सपकाळ,अरुण भाऊ सपकाळ ,मनीष भाऊ बोपटे आणि आम्ही सर्व भावंड माईंचा हा वसा पुढे चालवतोय,माईच्याच पद्धतीने..तिनेच दाखवलेल्या मार्गाने,त्यात तसूभरही खंड नाही,बदल नाही,गरज आहे ती फक्त तुम्ही सोबत असण्याची..माई नेहमी म्हणत असायची ..बा महाराष्ट्रा ,मायबाप महाराष्ट्रा, मी झोळी पसरली आणि त्या झोळीत तुम्ही तुमच्या कष्टाचे चार पैसे टाकून माझ्या लेकरांना जगवल..इथून पुढे ही तुम्हीच माझ्या लेकरांना जगवणार आहात,माझ्या लेकरांना,हा महाराष्ट्र कधी उपाशी पोटी झोपू देणार नाही याची तिला खात्री होती..कुठल्या तरी एका गैरसमजाने ती संस्था किंवा संस्थात्मक कार्य मरत नसते..ते जिवंत ठेवण्याचं कार्य तुम्हा आम्हा सर्वांचं आहे,माई गेल्या नंतर या गैरसमजांचं पीक जास्त आलंय, त्यावर विश्वास ठेवू नका,त्याचा फटका या अनाथ निराधार लेकरांना बसू देऊ नका,त्यात त्यांची काय चूक?..आपण सुशिक्षित आणि समजदार आहात, माईंच्या संस्थेला भेट द्या..काम बघा,तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते संस्था चालकांना विचारा, पण आमच्यापासून लांब जाऊ नका..कारण तुमच्याशिवाय आम्हाला कुणी नाही. या महाराष्ट्रातील सुजाण नागरिकांना आम्ही माईंची लेकरं विनंती करतो की माईंच्या कार्यात सहभागी व्हा..हे कार्य थांबणार नाही याची काळजी आपण घेऊया..माई म्हणायची, “मी अनाथांची माय झाले, तुम्ही गणगोत व्हा,नातलग बना.”

आपल्या प्रतीक्षेत..माई परिवार..

– विनय सिंधुताई सपकाळ

– द मदर ग्लोबल फौंडेशन,शिरूर पुणे

– 9049474544


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *