क्राईम

हे राम! सीतेचं अब्रू हरण होतेय तरीही….. चार मंत्री! कुणी छंद जपण्यात , कुणी पुनर्वसनात, कुणी बदला घेतोय तर कुणाला गम ना पस्तावा!!


हे राम! सीतेचं अब्रू हरण होतेय तरीही…..

 

चार मंत्री! कुणी छंद जपण्यात , कुणी पुनर्वसनात, कुणी बदला घेतोय तर कुणाला गम ना पस्तावा!!

 

कुमार कडलग /नाशिक

नाशिक जिल्ह्याला इतिहास आहे. मंत्र, तंत्र, यंत्र ही परंपरा एकविसाव्या शतकात आयटीसारख्या तंत्रज्ञानाला गवसणी घालून विकासाच्या मार्गावर झेपावणारे नाशिक वाईन व्हॅली म्हणून जगाच्या नकाशावर आनंदी आनंद साजरा करीत आहे. दुसरीकडे सार्वजनिक विकासाची सारी बोंब. नैसर्गिक वरदान भरभरून लाभलेला नाशिक जिल्हा क्षमतेइतका विकसित झाला नाही, ही नेहमीची ओरड आजही कायम असतांना नागरिकांचे व्यक्तिगत जीवन देखील सुरक्षित नसल्याची अनेक उदाहरणे व्यवस्थेच्या छाताडावर रोज नंगानाच करीत आहेत. विशेषतः महिलांची सुरक्षा राज्यभर ऐरणीवर आली असतांना सुसंस्कृत, अध्यात्मिक नाशिक देखील अपवाद नाही. समाजात वावरणारी, विकृत वासनेने वखवखलेली अनेक गिधाडं महिलांचा मानसिक, शारीरिक छळ करतांना दिसतात. या गिधाडांना कधी राजकीय तर कधी सामाजिक पाठबळ मिळत असल्याने व्यवस्था निमूटपणे गिधाडांचे हे दुष्कृत्य डोळसपणे माफ करीत आहे. त्याचाच फायदा घेत ही गिधाडं आता सार्वजनिक व्यवस्थेत देखील पोसली जाऊ लागल्याचे भयाण वास्तव जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अखत्यारितील नर्सिंग प्रशिक्षण केंद्र आणि जिल्हा परिषदेतील महिला शोषण प्रकरणावरून अवघ्या समाजाच्या नजरेत आले आहे.

एक घर जळत असतांना केलेलं दुर्लक्ष गाव खाक करण्यास पुरेसे आहे. व्यवस्थेने पोसलेले तेच पाप या पद्धतीने ओसंडून आले आहे.

Advertisement

नाशिक जिल्ह्याला एक दोन नव्हे तर तब्बल चार मंत्री लाभले आहेत. मालेगाव म्हणजे पूर्व, दिंडोरी म्हणजे उत्तर, सिन्नर म्हणजे दक्षिण आणि येवला पण निवास नाशिकमध्ये असल्याने पश्चिम अशा जणू चारही दिशा सुरक्षित राहाव्यात या भावनेतून दिलेले मंत्रिपद देखील प्रभू रामचंद्रांच्या भूमीचे सर्वच पातळीवर होत असलेले अब्रू हरण रोखू शकत नाही, हे आजचे दुर्दैवी वास्तव आहे.जिल्हा परिषदमधील वासनांध अधिकारी असोत नाही तर शासकीय रुग्णालयातील बदफैली डॉक्टर्स, कुणालाही जाब विचारण्याची हिम्मत कुणाही मंत्र्यांनी दाखवली नाही. दोषी असलेल्या प्रवृत्तीवर कारवाई तर सोडा, पण त्यासाठी आंदोलनात्मक प्रतिक्रिया देखील मंत्र्यांच्या गोटातून आली नाही. जिल्हा परिषद आणि शासकीय रुग्णालय हे दोन्ही सेवा केंद्र ग्रामिण जनतेच्या थेट संपर्कात येणारे सेवा केंद्र आहेत. या ठिकाणी वर्षानुवर्षे पोसल्या गेलेल्या मुजोर प्रवृत्ती ग्रामिण भागातून येणाऱ्या जनतेचा कोण छळ करतात, हे माहित असूनही गांधारीची भूमिका साकारणारे हे नेते आपल्याच मस्तीत आहेत.कुणी आपले छंद कुणी, मुलाबाळांचे पुनर्वसन करण्यात तर कुणी आपले राजकीय विरोधक देशोधडीला लावून सूड घेण्यात व्यस्त आहेत.एका मंत्र्याला तर कुठलंच सोयरे सुतक नाही. बेताल बडबड हा छंद जोपसण्यातच हशील मानणारे हे मंत्री. नाशिक जिल्ह्याला आजवर पाणीदार नेतृत्व मिळाले नाही, ही सल या निमित्ताने पुन्हा जीवन्त झाली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *