श्री सप्तश्रुंगी ट्रस्टची भाकरी फिरवा: ललिता शिंदे यांची प्रधान न्यायधीशांना मागणी; मुख्य न्यायमूर्तीं सह जिल्हाधिकाऱ्यांनाही दिले निवेदन
श्री सप्तश्रुंगी ट्रस्टची भाकरी फिरवा:
ललिता शिंदे यांची प्रधान न्यायधीशांना मागणी;
मुख्य न्यायमूर्तीं सह जिल्हाधिकाऱ्यांनाही दिले निवेदन
नाशिक प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यातील वणी स्थित श्री सप्तश्रृंगी देवी निवासीनी देवस्थान ट्रस्ट मध्ये नविन विश्वस्त निवड प्रक्रिया वादग्रस्त ठरत असून डॉ. राहुल जैन बागमार आणि ऍड अक्षय कलंत्री यांच्या नंतर त्रंबकेश्वर संस्थानच्या माजी विश्वस्त तसेच निवृत्तीनाथ संस्थानच्या विश्वस्त ललिता संदीप शिंदे यांनीही आक्षेप नोंदवला आहे.ललिता शिंदे यांनी या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, नाशिकचे प्रधान न्यायाधीश आणि नाशिकचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आपल्या भावना कळवल्या आहेत.
या निवेदनात सौ शिंदे यांनी म्हटले आहे की आदिमाया आदिशक्ती श्री. सप्तश्रुंगी निवासनी देवी ही तमाम महाराष्ट्रातील तसेच संपूर्ण भारतातील आपल्या साडेतीन शक्तीपीठापैकी अर्ध पीठ आहे. सप्तश्रुंगीदेवीचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भक्त परिवार आहे. तसेच तिचे महत्व अनन्य साधारण आहे.
सप्तश्रृंगी देवस्थान ट्रस्टला स्थापन होवून साधारण ७० ते ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. ट्रस्ट व उत्पन्नामध्ये झपाटयाने वाढ होत आहे सप्तश्रृंगी देवस्थान ट्रस्टमध्ये मागील ५ वर्षा पूर्वी मी स्वतः निवेदन दिले होते. वणी येथील ग्रामस्थांना आणि वणी येथील देवीच्या पुजा-यांना विश्वस्त मंडळामध्ये विश्वस्त म्हणून संधी द्यावी अशी मागणी या निवेदनाव्दारे केली होती.
या ट्रस्ट मध्ये जिल्हा न्यायालय हे पदसिध्द अध्यक्ष असतात तसेच देवस्थान ट्रस्टची घटना त्या पध्दतीने तयार झालेली आहे. मा. जिल्हा न्यायालय आणि विश्वस्त मंडळ संस्थानचा कारभार बघत आहेत. आता नविन विश्वस्त मंडळाची निवड प्रक्रीयेची जाहिरात वर्तमानपत्रा मध्ये प्रसिध्द झाली आहे अर्ज करण्याची अंतिम मुदत दिनांक ०४ ऑक्टोबर २०२५ आहे. पण वारंवार या ट्रस्ट मध्ये कोर्ट कॅम्पस मधील वकील यांचीच नियुक्ती केली जाते साधारण २ वकील हे वारंवार निवडले जातात.
तसे बघितले तर देवीच्या भक्तामध्ये अनेक भक्तांचा परिवार आहे सगळ्यांचा साधक बाधक विचार करून मा. जिल्हा न्यायालयाने संपूर्ण जिल्हयातील सर्व देवी भक्तांना अटीशर्ती नुसार प्रत्येक हिंदू भाविकाला ट्रस्ट मध्य स्थान देणे गरजेचे आहे.स्थानिक लोकांना संधी मिळत नाही अशा भावना वणी येथील ग्रामस्थ तसेच देवीचे भक्त पुजारी बोलून दाखवित आहेत.तरी मेहेरबान जिल्हा न्यायालयाने आणि निवड प्रक्रीया राबविणाऱ्या यंत्रणेने स्थानिकांच्या भावना लक्षात घेऊन कोर्ट कॅम्पस मधील वकील वारंवार प्रतिनिधी म्हणून न नेमता संपूर्ण जिल्हयातील सप्तश्रृंगीदेवीच्या भक्तांना विश्वस्त मंडळावर संधी द्यावी. सर्वाना समान न्याय देवून एक आदर्श उदाहरण महाराष्ट्रासमोर ठेवावे. अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.