क्राईम

साहेब!उरलं-सुरलंही गेलं…!! येवला तालुक्यातील  शेतकऱ्यांची व्यथा  विश्रांतीनंतर पुन्हा पीक पावसाने भिजले


साहेब!उरलं-सुरलंही गेलं…!!

येवला तालुक्यातील  शेतकऱ्यांची व्यथा 

विश्रांतीनंतर पुन्हा पीक पावसाने भिजले

येवला (प्रतिनिधी) –

“उरलं सुरलं गेलं सायेब…” अशा शब्दांत पांजरवाडी येथील शेतकरी दिलीप किसन जेजुरकर यांनी आपल्या हतबलतेची व्यथा व्यक्त केली. दोन दिवसांच्या उघडीपीत कसाबसा चिखलात रुतलेले मक्याची कणसे सुरक्षित ठिकाणी उचलून नेण्याआधीच गुरुवारी संध्याकाळपासून पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली.

पांजरवाडी, धामणगाव, तळवाडे, गारखेडा या गावात झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे उरलेले पीक भिजवून टाकले. परिसरातील काही शेतकऱ्यांनी दिवसभर कष्ट करून सोयाबीन सोंगले होते; मात्र मुसळधार पावसामुळे तेही चिखलात माखून गेल्याने आता त्याचीही विक्री होईल का, याबाबत शंका निर्माण झाली आहे.

Advertisement

शेतकऱ्यांची व्यथा सांगताना भागवतराव सोनवणे यांनी सांगितले की, “उरलं सुरलं पीक काढून घरात टाकू, या आशेवर शेतकरी सारं विसरून कामाला लागले होते.. पण अचानक आभाळ दाटून आलं आणि पुन्हा एकदा सगळं पावसात वाहून गेलं. आता भिजलेल्या मालातून काय हाती लागणार, हेच सांगता येत नाही.”

तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेतमालाच्या हानीची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांच्या हातात आता काहीच राहणार नसल्याची खंत सर्वत्र व्यक्त होते आहे.

सरकार किती मदत करणार आणि किती मिळणार हे शेतकऱ्यांना ठाऊक आहेच. मात्र अशा परिस्थितीत त्यांनी स्वतःची तसेच मुक्या जनावरांची काळजी घ्यावी, असे आवाहनही सोनवणे यांनी केलंय.

 

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *