जगात प्रत्येकाचे काहीना काही स्वप्न असते. त्यात काहींचे स्वप्नं पूर्णत्वास येतात, तर काहींची स्वप्न पूर्ण होता होता राहून जातात.मात्र ही राहिलेली स्वप्ने मनाच्या गाभाऱ्यात सुप्तावस्थेत एखाद्या संधीची वाट पाहतात योग्य वातावरण मिळताच ही सुप्त स्वप्ने अंकुरू लागतात. स्वप्नाळूची जिद्द आणि प्रयत्नांची पराकाष्ठा ही स्वप्न जेंव्हा प्रत्यक्षात आणतात तेंव्हा हळू हळू स्वप्नांचे तांडवे निघाल्यागत ती कल्पना समाजात रुजते. आणि या रोपट्याचा वटवृक्ष केव्हा होतो हे स्वप्न उराशी बाळगलेल्या त्या महानुभवाच्याही लक्षात येत नाही. असाच एक महानुभव ठाणगाव सारख्या प्रयोगशील कृषिप्रधान गावात असच एक स्वप्न घेऊन मार्गस्थ आहे या पांथस्थ्याचे नाव आहे जयराम देवराम शिंदे.
मनात बाळगलेली दुर्दम्य इच्छा प्रत्येकाला पुर्ण करता येतेच असे नाही. केवळ इच्छा असून चालत नाही तर त्यासाठी हवी असते प्रामाणिक इच्छाशक्ती. फार कमी व्यक्तिमत्व आपल्या स्वप्न पूर्तीच्या उद्दिष्ठापर्यंत पोहचू शकतात.म्हणूनच स्वप्न पूर्ण झालेल्यांची संख्या कमी परंतु पूर्ण झालेल्या स्वप्नांना जगणे, त्यातील आनंद उपभोगण्यचे सौभाग्य फारच कमी जणांच्या वाट्याला येते. ठाणगावचा जयराम शिंदे नावाचा हा अवलिया त्यातलाच एक. पित्याच्या नावाने देवराम कारभारी शिंदे फाउंडेशनची स्थापना केली आणि त्याअंतर्गत समर्थ सावली बाल संगोपन केंद्र ठणगावमध्येच सुरु केले.
आपल्या अवतीभोवती अशी अनेक बालसंगोपन केंद्र सुरु असल्याचे दिसते मात्र फलक लावून चंदा गोळा करण्यापलीकडे या केंद्रांचे अस्तित्व दिसत नाही. पदरमोड करून समाजाने नाकारलेली पिढी उभी करण्याचे धाडस फारच थोडी माणसं दाखवतात. ठाणगावस्थित समर्थ सावली बाल संगोपन केंद्राला भेट दिल्यानंतर हेच वेगळेपण सहज नजरेत भरते.
खिशात पैसा खुळखुळत असतांना अशा कल्पना सुचने केवळ देवदूताची लक्षणे असलेल्या व्यक्तिमत्वलाच शक्य. कुठलेही विधायक काम खरं तर पैश्यांच्या राशीत मोजता येत नाही. तरीही विधायक काम पैशाशिवाय होत नाही. हे वास्तव ज्यांना माहित आहे ती माणसं अशी कामे उभी करतांना समाजाचा आधार घेण्याचा प्रयत्न करतात. आणि जरा कुठे नकारात्मक प्रतिसाद मिळाला की ते स्वप्नच अर्ध्यावर सोडून पुन्हा मळलेल्या वाटेने पारंपारिक प्रवास सुरु करतात. जयराम शिंदे या तरुणाचे मत याबाबतीत वेगळे आहे.समाजाकडे हात पसरून स्वप्न पुर्ण करण्यावर त्यांचा विश्वास नाही. आपले स्वप्न आपणच आपल्या हिमतीवर पुर्ण करायचे हा निर्धार पक्का करून शेतकरी कुटुंबातील जयराम शिंदे यांनी समर्थ सावलीचे रोपटे लावले.
जयराम शिंदे तसे शेतकरी कुटुंबातील , एक शिस्तप्रिय, समर्थ चरणी लीन, पदवीधर आणि नेतृत्व करणारे दादा म्हणून पंचक्रोशित प्रसिद्ध. संस्कारी वातावरनात बालपन गेले असल्याने मोठे पणी काही तरी करून दाखवावे, ही जिद्द मनात होतीच. यात लहान मुलांची विशेष आवड असल्याने वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या नावाने कै. देवराम कारभारी शिंदे फाऊंडेशन अंतर्गत त्यांनी समर्थ सावली हे. बाल संगोपन केंद्र अनाथ मुलंसाठी सुरु केले. आज २६ जानेवारी रोजी समर्थ सावलीच तिसरा वर्धापन दिवस आहे. यासोबतच जयराम शिंदे यांचा वाढ दिवस पण आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे एक कार्यकर्ते,युवा तालुकाध्यक्ष, आणि सध्याचे तालुका कार्यध्यक्ष ही सगळी पदे ही त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाची पोहच पावती आहे. तरीही त्यांची खरी ओळख ही आज समर्थ सावली मध्ये असलेल्या २६ मुलांचे पालक अशीच अधिक आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी वेळोवेळी व्याख्यानमाला, आरोग्य शिबिर, क्रीडा,संगीत,गायन या जोडीने अध्यात्म यांची योग्य सांगड ते घालतात. या प्रत्येक कामात ते स्वतः. सहभागी असतात, म्हणूनच म्हटले आहे त्यांचे स्वप्न ते एन्जॉय करतात. कोणताही गाजावाजा न करता पदरमोड करून आपलेच कुटुंब आपण चालवतोय , याला कशाला हवी प्रसिद्धी? समर्थ सावली मधील मुलं सनाथ आहेत कारण त्यांच्या.सोबत त्यांचा जयराम दादा आहे.
खरं तर साधारण सहा सात वर्षांपूर्वी जयराम दादाने या समर्थ सावलीचे प्रारूप सांगितले तेंव्हा मनातल्या मनात हसू आवरता आले नाही. बोलेल तो करील काय अशी समाजाची धारणा मला हसवत होती. आज अवघ्या तीन वर्षात या ठिकाणी उभा राहिलेला एक टूमदार बंगला, स्विमिंग पुल, लॉन सगळे काही एखाद्या सुखवास्तुसारखे. एखाद्या मध्यम वर्गीय श्रीमंत कुटुंबाला आवश्यक त्या साऱ्या सोयी सुविधा याठिकाणी उपलब्ध आहेत. फरक फक्त एव्हढाच की, इथे समाजाने अनाथ केलेली चिमुकली सनाथ म्हणून आपल्या आयुष्याचे एकेक पाऊल हसत खेळत, शिकत पुढे टाकत आहेत.हे वास्तव पाहिल्यानंतर तिसऱ्या वर्धापन दिन आणि जयराम दादाच्याही वाढदिवसाच्या शुभेच्या देतांना सहा सात वर्षांपूर्वीचे माझे ते आश्चर्य मिश्रित हास्य मलाच वाकुल्या दाखवून चिडवत आहे.
पुन्हा एकदा आपली दुनियादारी परिवाराकडून समर्थ सावली आणि चिमुकल्यांच्या जयराम दादाला मनःपूर्वक शुभेच्छा!