नाशिक शहरातील गुन्हेगारी आणि सत्ताधाऱ्यांची ‘बनावटगीरी’! दिनकर अण्णांचा मनसे सवाल: जनतेचे उत्तरदायित्व कुणी स्वीकारायचे? पोलिस निर्दोष, सत्ताधारी बेहोष
नाशिक शहरातील गुन्हेगारी आणि सत्ताधाऱ्यांची ‘बनावटगीरी’!
दिनकर अण्णांचा मनसे सवाल: जनतेचे उत्तरदायित्व कुणी स्वीकारायचे?
पोलिस निर्दोष, सत्ताधारी बेहोष
नाशिक :कुमार कडलग
अलीकडेच नाशिक शहर गुन्हेगारी, अमली पदार्थांचे जाळे, अवैध धंदे, अवैध सावकारी आणि हनी ट्रॅपसारख्या घटनांनी हादरून गेले आहे. या वाढत्या गुन्हेगारीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांनी १२ सप्टेंबर २०२५ रोजी नाशिकमध्ये ऐतिहासिक असा जनआक्रोश मोर्चा काढला. या मोर्च्यानंतर अचानक सत्ताधाऱ्यांना जाग आली आणि शहरातील तिन्ही आमदारांनी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेऊन गुन्हेगारी कमी करा अशी मागणी केल्याच्या बातम्या झळकल्या. त्याच्या एक दिवस आधी ना. दादा भुसे यांनीही पोलिस आयुक्तांशी चर्चा करून कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध असलेल्या गुन्हेगाराला सोडू नका,, असे निर्देश दिल्याचीही बातमी होती.या दोन्ही भेटीविषयी बोलायचे झाले तर हा खरोखर नाशिकच्या गुन्हेगारीच्या मुसक्या बांधण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून केलेला प्रयत्न होता की, गुन्हेगारीने केलेल्या नाशिककरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार होता? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नोंदणीकृत गुंडांची फौज सांभाळणाऱ्या राजकीय पक्षाच्या शिलेदारांनी पोलिस आयुक्तांना गुन्हेगारी संपविण्यासाठी निवेदन करावं आणि पुन्हा एखाद्यावर कारवाई झाली, गुन्ह्यात नाव आलं किंवा तडीपारी झाली की राजकीय दबाव आणावा, ही दुहेरी भूमिका घेणारे सत्ताधारी केवळ फार्स करीत आहेत अशी शंका नाशिककरांनी घेतली तर त्याला देशद्रोही ठरवू नये.
नेमका हाच धागा पकडून सत्ताधाऱ्यांना खरचं जाग आली की मगरमच्छ अश्रू ढाळीत आहे, असा सवाल महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर आण्णा पाटील यांनी विचारलाय.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर अण्णा पाटील यांनी नाशिककरांच्या भावनांना शब्द देतांना सांगितले की, “सत्ताधाऱ्यांना आता गुन्हेगारीविरोधात बोलायची आठवण झाली आहे. पण हेच सत्ताधारी स्वतः गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना पक्षात घेतात, त्यांना पदं देतात, आणि आज ‘गुन्हेगारीमुक्त नाशिक’ची भाषा करतात, हा विनोद नाही का?”
ते पुढे म्हणाले की,”मनसे आणि शिवसेनेने काढलेला मोर्चा पोलीस प्रशासनाविरुद्ध नव्हता. पोलीस आपलं काम करत आहेत. पण सत्ताधाऱ्यांनी ‘आपलं घर’ आधी साफ करावं. सत्ताधारी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजितदादा गट) यांनी गुन्हेगारी व देशविघातक पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना पक्षात घेतलं आहे. मग अशांनी ‘भयमुक्त नाशिक’ची ग्वाही देणं हा जनतेचा अपमान आहे.”
नुकत्याच झालेल्या खून, अपहरण, वसुली आणि हनी ट्रॅप प्रकरणांत काही सत्ताधाऱ्यांची नावे समोर आली आहेत,हाही जनतेच्या चर्चेचा विषय आहे. “अहो, इथे तर निवडून आलेले लोकप्रतिनिधी स्वतःच्या मतदारसंघालाच ‘पाकिस्तान’ म्हणतात. मग अशा लोकांना कोणती नैतिकता उरते?” असा सवालही दिनकर पाटील यांनी उपस्थित केला.
त्यांनी पुढे सत्ताधाऱ्यांना थेट आव्हान दिलं,“जर खरंच शहर गुन्हेगारीमुक्त करायचं असेल, तर आधी आपल्या पक्षातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कार्यकर्त्यांची हकालपट्टी करा. नंतर जागे झाल्याचं सोंग आणा. तोपर्यंत नाशिक भयमुक्त, गुन्हेगारीमुक्त किंवा भ्रष्टाचारमुक्त होणार नाही.”असा दावा दिनकर आण्णा पाटील यांनी केला.
शहरातील सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच आता जनतेलाही वाटतंय की सत्ताधाऱ्यांची ‘जाग’ ही कृत्रिम आहे, आणि खरी जाग येईल ती केवळ गुन्हेगारीमुक्त कृतीनेच, भाषणांनी नव्हे.