*कुणी केला जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांचा ‘गेम’?* *मुंबई संभाजीनगरच्या बड्या अधिकाऱ्यांवर संशय;* *धनंजय मुंडे हेच लक्ष्य?*
*कुणी केला जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांचा ‘गेम’?*
*मुंबई संभाजीनगरच्या बड्या अधिकाऱ्यांवर संशय;*
*धनंजय मुंडे हेच लक्ष्य?*
मुंबई प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन आणि वाढीव मावेजा प्रकरणात करोडो रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप झेलणारे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अखेर एसआयटीने लातूर येथील त्यांच्या राहत्या घरातून अटक केली आणि संपूर्ण महसूल विभागात एकच खळबळ उडाली.
मात्र ही केवळ भ्रष्टाचारावरील कारवाई आहे की प्रशासकीय आणि राजकीय पातळीवरून आखलेला मोठा ‘गेम’ आहे, याची चर्चा आता मंत्रालयापासून मराठवाड्याच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
मूळचे लातूरचे असलेले अविनाश पाठक यांनी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात विविध पदांवर काम केले होते. त्यानंतर त्यांची बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली आणि विशेष बाब म्हणून त्यांना थेट बीडच्या जिल्हाधिकाऱ्याची जबाबदारी देण्यात आली होती. प्रशासनात वेगाने वाढलेली त्यांची पकड आणि काही प्रभावी राजकीय नेत्यांशी असलेले संबंध यामुळे पाठक हे नेहमीच चर्चेत राहिले.
दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन प्रक्रियेत जमिनींचे दर कृत्रिमरीत्या वाढवणे, नियमबाह्य मावेजा मंजूर करणे आणि निवडक लाभार्थ्यांना आर्थिक लाभ पोहोचवल्याचा गंभीर आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे. या संदर्भात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
एसआयटीने गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणाचा वेगाने तपास सुरू केला होता. अविनाश पाठक यांची यापूर्वी दिवसभर चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर काल सकाळपासूनच तपास पथक त्यांच्या लातूर येथील निवासस्थानी दाखल झाले आणि अखेर त्यांना ताब्यात घेण्यात आले.
विशेष म्हणजे, या प्रकरणात केवळ कनिष्ठ अधिकारी किंवा दलालांवर कारवाई न करता थेट तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यालाच अटक करण्यात आल्याने महसूल विभागात मोठी धास्ती निर्माण झाली आहे. अनेक अधिकारी आता ‘फाईलवरील सही’ आणि ‘वरिष्ठांचे आदेश’ या दोन्ही गोष्टींचा पुनर्विचार करू लागले आहेत.
मात्र, या संपूर्ण कारवाईमागे केवळ कायदेशीर तपास नसून मोठे प्रशासकीय आणि राजकीय समीकरण असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. संभाजीनगर आणि मुंबई येथील काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा या निर्णय प्रक्रियेत दबाव असल्याचे बोलले जात आहे. आतापर्यंत शांत असलेल्या काही अधिकाऱ्यांनीही आता ‘मोठ्या लोकांना वाचवण्यासाठी एकट्या पाठकांना पुढे केले जात आहे का?’ असा सवाल उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे.
राजकीय स्तरावरही या अटकेचे पडसाद उमटू लागले आहेत. अविनाश पाठक हे राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. बीडचे पालकमंत्री असताना धनंजय मुंडे यांनीच पाठक यांना जिल्हाधिकारीपदी आणल्याची चर्चा त्या काळात रंगली होती. त्यामुळे आता या कारवाईतून अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे यांनाही राजकीयदृष्ट्या घेरण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे.
सर्वात महत्त्वाचा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरित आहे,जर भूसंपादन घोटाळा एवढ्या मोठ्या प्रमाणात झाला असेल, तर केवळ एक जिल्हाधिकारी जबाबदार कसे?
मंजुरी प्रक्रिया, महसूल यंत्रणा, मंत्रालयीन स्तरावरील हालचाली आणि राजकीय हस्तक्षेप यांची चौकशी होणार का?
की पुन्हा एकदा संपूर्ण व्यवस्थेतील मोठे चेहरे पडद्यामागे राहतील आणि एकाच अधिकाऱ्यावर सर्व जबाबदारी टाकून प्रकरण थंड केले जाईल?
अविनाश पाठक यांच्या अटकेने आता फक्त एका अधिकाऱ्याचे भविष्य धोक्यात आलेले नाही, तर प्रशासनातील सत्ताकेंद्रे, राजकीय हस्तक्षेप आणि महसूल व्यवस्थेतील ‘अदृश्य नेटवर्क’ देखील उघडे पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.



