पत्रकारितेची दशा आणि दिशा : अनुभवांची मिसळ ……….. भाग ३७/कुमार कडलग संजय उवाच… कार्पोरेट पत्रकारितेच्या नावावर दुकानदारी; दबावतंत्र, ‘विनोद’ झालेल्या बातम्या आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात उभे राहिलेले संशयाचे धुरळे !
पत्रकारितेची दशा आणि दिशा : अनुभवांची मिसळ
……….. भाग ३७/कुमार कडलग
संजय उवाच…!
कार्पोरेट पत्रकारितेच्या नावावर दुकानदारी; दबावतंत्र, ‘विनोद’ झालेल्या बातम्या आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात उभे राहिलेले संशयाचे धुरळे !
…………
पत्रकारिता एकेकाळी मिशन होती.
आज ती काहींच्या हातात कमिशन झाली आहे.
पूर्वी संपादकीय लिहिले जायचे; आता “सेटिंग” लिहिली जाते.
पूर्वी प्रश्न विचारले जायचे; आता व्यवहार विचारले जातात.
आणि पूर्वी जनतेसाठी लढणारे काही चेहरे आज स्वतःच्या फायद्यासाठी “जनहित”चा मुखवटा वापरताना दिसतात.
“संजय उवाच…” अनुभव बोलतोय.
प्रशासनाच्या गलियार्यांत काम करताना अनेक चेहरे जवळून पाहिले जातात.
काही पत्रकार खरोखर समाजासाठी जळणाऱ्या मशाली असतात;
तर काही फक्त प्रकाशाच्या नावाखाली धूर सोडणारे कारखाने.
आज पत्रकारितेच्या क्षेत्रात काही भलतेच संशयाचे धुरळे उठताना दिसतात.
एखाद्या अधिकाऱ्याविरोधात बातमीची तलवार उपसली जाते, पण तलवारीमागे सत्य असतंच असं नाही.
कधी अहंकार असतो…
कधी व्यवहार असतो…
कधी जाहिरातीचा राग असतो…
तर कधी “आम्हाला विचारलं नाही?” याची चीड असते.
आणि मग सुरू होतं “कार्पोरेट पत्रकारिते”चं नवं तंत्र.
मोठे ऑफिस…
मोठ्या गाड्या…
मोठे बॅनर…
मोठमोठ्या घोषणा…
पण आतमध्ये बातमीपेक्षा व्यवहाराचा हिशेब जास्त.
कोणती बातमी चालवायची?
कोणती दाबायची?
कोणाला उचलून धरायचं?
कोणाला संपवायचं?
हे ठरवताना पत्रकारिता नाही, तर बाजारशास्त्र चालतं.
काहींचं धाडस इतकं वाढलं आहे की थेट दबावतंत्रालाच निर्भीड पत्रकारिता समजलं जातं.
फोनवर आवाज चढवणे…
कार्यालयात जाऊन वातावरण तापवणे…
“उद्या पहिल्या पानावर येईल…” अशी भाषा वापरणे…
Advertisementआणि नंतर समेटाच्या नावाखाली व्यवहाराची खिडकी उघडणे…
हा पत्रकारितेचा आत्मा नाही;
ही लोकशाहीच्या नावावर चालणारी सावलीतील वसुली आहे.
भ्रष्टाचार उघड करणं हे पत्रकाराचं कामच आहे.
पण भ्रष्टाचाराच्या बाजारातच बातमीचा “विनोद” बनू लागला, तर समाजाने सावध व्हायलाच हवं.
कारण काहींना आता सत्य नको असतं;
त्यांना “सत्याची भीती” विकायची असते.
पत्रकारितेची नवी शैली आता अशी झाली आहे.
आधी संशय निर्माण करा…
मग वातावरण तापवा…
नंतर प्रतिमा मलीन करा…
आणि शेवटी “तडजोड” शोधा.
ही शैली धोकादायक आहे.
कारण यातून पत्रकारिता मरते आणि फक्त राजकारण उरतं.
राजकारणाची धूळ पत्रकारितेच्या “तन”वर इतकी बसली आहे की काहींना स्वतःचं प्रतिबिंबही दिसेनासं झालं आहे.
काही जण आता पत्रकार नसून “इमेज मॅनेजर” बनले आहेत.
काही “बातमीवीर” नसून “दबाववीर” झालेत.
पण या सगळ्यात सर्वात मोठं नुकसान कुणाचं होतं?
जनतेचं.
कारण सामान्य माणूस अजूनही पत्रकाराकडे आशेने पाहतो.
त्याला वाटतं, “हा माझ्यासाठी बोलेल.”
पण जेव्हा त्यालाच कळतं की काही जण आवाज नाही तर सौदे विकतात, तेव्हा त्याचा विश्वास कोसळतो.
पत्रकारितेची दशा आज चिंताजनक आहे;
पण दिशा अजूनही बदलू शकते.
कारण आजही अनेक पत्रकार आहेत जे जाहिरातीच्या दबावाला झुकत नाहीत.
जे रात्रीच्या अंधारात घटनास्थळी पोहोचतात.
जे सत्तेच्या डोळ्यात डोळे घालून प्रश्न विचारतात.
जे स्वतः उपाशी राहतील पण बातमी विकणार नाहीत.
हीच खरी पत्रकारिता आहे.
बाकी जे उरलंय, तो फक्त बाजार आहे.
आणि बाजारात सत्याचा आवाज नेहमीच सर्वात स्वस्त विकला जातो.
दुनियादारी won’t lie
पुढील भागात : अशोक खरात आणि कथित हनी ट्रॅप मध्ये कुणाचे उखळ पांढरे?
कोण नायक किंवा खलनायक?
पत्रकारितेत मैलाचा दगड ठरलेल्या दैनिकाची वाट कुणी लावली..?



