*ठाणेतील बलात्कार प्रकरणातील फरारी आरोपी महेश आहेर कोल्हापुरातून जेरबंद* _कोल्हापूर पोलिसांच्या ‘ऑल आऊट ऑपरेशन’मध्ये मोठी कारवाई; पहाटे हॉटेलवर छापा_
*ठाणेतील बलात्कार प्रकरणातील फरारी आरोपी महेश आहेर कोल्हापुरातून जेरबंद*
_कोल्हापूर पोलिसांच्या ‘ऑल आऊट ऑपरेशन’मध्ये मोठी कारवाई; पहाटे हॉटेलवर छापा_
कोल्हापूर प्रतिनिधी
ठाणे जिल्ह्यातील गंभीर बलात्कार प्रकरणातील फरारी आरोपी महेश भाऊराव आहेर याला कोल्हापूर पोलिसांनी थरारक कारवाई करत हातकणंगले तालुक्यातील नरंदे येथून ताब्यात घेतले. जिल्हाभर राबविण्यात आलेल्या ‘ऑल आऊट ऑपरेशन’दरम्यान ही मोठी कारवाई करण्यात आली असून, कोल्हापूर पोलिसांच्या सतर्कतेची राज्यभर चर्चा सुरू झाली आहे.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या आदेशानुसार ६ मे रोजी रात्री १० ते ७ मे पहाटे २ वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांना गुप्त माहिती मिळाली की, ठाण्यातील कासारवडवली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी महेश आहेर हा नरंदे येथील हॉटेल अन्नपूर्णामध्ये लपून बसला आहे.
Advertisement
ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी वरिष्ठांना कळवून तातडीने पथक रवाना केले. पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकून आरोपी महेश आहेर याला ताब्यात घेतले. त्याच्यावर भारतीय न्याय संहितेअंतर्गत बलात्कार, विषारी पदार्थ देणे, विनयभंग आणि धमकी देण्याचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. अटकेनंतर आरोपीला पुढील तपासासाठी ठाणे गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले.
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या ‘ऑल आऊट ऑपरेशन’मध्ये पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या. ३९ नॉन-बेलेबल वॉरंट बजावण्यात आले, दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या ३४ जणांवर कारवाई झाली, तर ५४४ वाहनचालकांकडून तब्बल ३.५३ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दारुबंदी कायद्यांतर्गत ७ लाख रुपयांहून अधिक मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गंभीर गुन्ह्यातील फरारी आरोपीला अटक करण्यात यश मिळाल्याने कोल्हापूर पोलिसांच्या कारवाईचे कौतुक होत आहे.



