ताज्या घडामोडी

*साई संस्थानच्या महाप्रसादात निकृष्ट किराणा?* *“अ” दर्जाचे बिल, “क” दर्जाचा माल; कोट्यवधींच्या गैरव्यवहाराचा आरोप*


*साई संस्थानच्या महाप्रसादात निकृष्ट किराणा?*

 

*“अ” दर्जाचे बिल, “क” दर्जाचा माल; कोट्यवधींच्या गैरव्यवहाराचा आरोप*

 

शिर्डी | प्रतिनिधी

श्री साईबाबा संस्थानच्या प्रसादालयासाठी होणाऱ्या किराणा खरेदीत मोठा गैरव्यवहार होत असल्याचा गंभीर आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते संजय बबुताई भास्करराव काळे यांनी केला आहे. महाप्रसादासाठी प्रत्यक्षात “क” दर्जाचा किराणा वापरला जात असून, निविदेत मात्र “अ” दर्जाच्या मालाचे दर आकारले जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

 

 

साई संस्थानच्या प्रसादालयात दररोज सुमारे ४० हजार भक्त महाप्रसाद घेतात. यासाठी दरवर्षी ७० ते १०० कोटी रुपयांचा किराणा माल खरेदी केला जातो. या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या आरोपांमुळे संस्थान प्रशासनात खळबळ उडाली आहे.

७ मे रोजी माहिती अधिकारांतर्गत प्रसादालय व भांडार विभागाची पाहणी करताना संजय काळे यांनी गहू, तांदूळ, डाळी, हरभरे, छोले, काजू, किसमिस, लवंग आदी १७ प्रकारच्या किराणा मालाचे नमुने घेतले. त्यानंतर खरेदी विभागात जाऊन ठेकेदारांनी दिलेले मूळ नमुने पाहिले असता प्रत्यक्ष वापरातील माल आणि नमुन्यांमध्ये मोठा फरक आढळल्याचा आरोप करण्यात आला.

Advertisement

 

 

“बरण्यांमधील नमुने ‘अ’ दर्जाचे होते, मात्र प्रत्यक्ष वापरातील माल ‘क’ दर्जाचा होता. ठेकेदार निकृष्ट माल पुरवतात आणि उच्च दर्जाचे बिल घेतात. हा कोट्यवधींचा घोटाळा आहे,” असा आरोप काळे यांनी केला.

या प्रकरणाची माहिती प्रशासकीय अधिकारी संदीप भोसले यांना देण्यात आली. त्यांनी तक्रार देण्यास सांगितले असून कारवाईचे आश्वासन दिल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी आयएएस गोरक्ष गाडीलकर यांनाही नमुने दाखवून हा प्रकार निदर्शनास आणून देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाकडून “खाण्यास योग्य” असा दाखला घेतला जात असला, तरी निविदेनुसार ठरलेला दर्जा प्रत्यक्षात पाळला जातो का, याची तपासणी होत नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी व पुरवठादारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *