फर्नांडिसवाडी फायरिंग प्रकरणातील फरार गुन्हेगार ‘उज्जैनवाल टोळी’चा म्होरक्या गजाआड; पिस्तूल जप्त
फर्नांडिसवाडी फायरिंग प्रकरणातील फरार गुन्हेगार ‘उज्जैनवाल टोळी’चा म्होरक्या गजाआड; पिस्तूल जप्त
नाशिक (प्रतिनिधी) –
फर्नांडिसवाडी फायरिंग प्रकरणातील चार महिन्यांपासून फरार असलेला उज्जैनवाल टोळीचा म्होरक्या राहुल अजय उज्जैनवाल उर्फ मोरक्या याला उपनगर पोलिसांनी मध्यरात्री गोसावीवाडी परिसरातून dramatic कारवाईत अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले गावठी पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त केली असून, एकूण ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
१० जुलै २०२५ रोजी रात्री जय भवानी रोड परिसरात दोन टोळ्यांमध्ये हप्त्याच्या वादातून फायरिंग झाली होती. या घटनेत दोन्ही गटांनी एकमेकांवर जीव घेण्याच्या उद्देशाने गोळीबार केला होता. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम १०९, १९४(२), १८९(२), १९१(२)(३), १२५, शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३, २५, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १३५ तसेच फौजदारी कायदा सुधारणा कायदा कलम ३, ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर प्रकरणातील प्रमुख आरोपी राहुल उज्जैनवाल हा घटनेनंतर फरार झाला होता. त्याचा शोध गुन्हे शोध पथकाचे पोउनि प्रभाकर सोनवणे, पो.अं. गौरव गवळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू ठेवला होता. अखेर गुप्त माहितीच्या आधारे ३० ऑक्टोबरच्या मध्यरात्री गोसावीवाडी परिसरात सापळा रचण्यात आला. पोलिसांना पाहून आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलीस जवान गौरव गवळी आणि जयंत हिंदी यांनी धाडसीपणे पाठलाग करून त्याला पकडले.
तपासादरम्यान आरोपीकडे १० हजार रुपये किंमतीचा गावठी बनावटीचा लोखंडी पिस्तूल आणि ५ हजार रुपये किंमतीच्या पाच जिवंत काडतुशांचा साठा मिळून आला. आरोपीने हाच पिस्तूल फर्नांडिसवाडी फायरिंगच्या घटनेत वापरल्याचे कबूल केले आहे.
राहुल उज्जैनवाल हा उज्जैनवाल टोळीचा म्होरक्या असून त्याच्या विरोधात खून, दरोडा, खंडणी, मारहाण, शस्त्रास्त्र कायदेभंग अशा गंभीर स्वरूपाच्या अनेक गुन्ह्यांची नोंद आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उप आयुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सौ. संगिता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि जयंत शिरसाठ, पोनि संजय फुलपगारे, पोउनि प्रभाकर सोनवणे, तसेच पोलीस अंमलदार संदीप पवार, गौरव गवळी, अनिल शिंदे, प्रशांत देवरे, सुनिल गायकवाड, पंकज कर्डक, संदेश रसाळ, युतिन गवळी, प्रविण सांगळे, मुकेश शिरसागर, सतिश मधये, व मपोशि मयुरी विलेकर यांनी संयुक्तरीत्या केली.
उपनगर पोलिसांच्या धाडसी कारवाईमुळे गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे.चार महिन्यांपासून फरार असलेल्या टोळीप्रमुखाला अटक केल्याने नाशिकमधील गुंड प्रवृत्तींना धडा मिळाला असून पोलिस दलाच्या तत्परतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.



