क्राईम

“वर्दीच्या ओझ्याखाली दडलेला विवेक”


 

“वर्दीच्या ओझ्याखाली दडलेला विवेक”

“बस झालं आता.. आणखी चारपाच वर्ष… स्वयं स्फूर्तीने निवृत्ती घ्यायची”..

“किती वर्ष आहेत सर, अजून सेवा काळाचे?”

“वीस वर्ष…..”

मग किमान तिन प्रमोशन तर नक्कीच.. का सोडता पोलिसची नोकरी?

“बस झालं… सहन होत नाही आता. विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर.. त्यात हुजरेगिरी.. कामाचे समाधान मिळत नाही. लुच्चे भामट्याच्या मागे पुढे करावं लागतं. तुमच्या कौशल्याची किंमत पूर्वी सारखी होत नाही. काम करणारे हात बांधले गेलेत. कायद्याचा मान राखून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी थोडं चौकटी बाहेर जाणारा खात्यातील एक वर्ग आज हातावर हात ठेवून बसला आहे. त्याला झापडं लावल्यागत काम करायला भाग पाडले जाते. अशाच या बदलामुळे गुन्हेगार समाजाला पोलिसांचा धाक उरला नाही. त्यातून कायदा सुव्यवस्था मोडकळीस आली.”

सहाय्यक पोलिस निरीक्षक असलेल्या एका अधिकाऱ्याच्या या भावना आहेत. बंधुतुल्य मित्रत्वाचे संबंध असल्याने त्या अधिकाऱ्याने मन अगदी मोकळं करून तब्बल 15 मिनिट गप्पा मारल्या. समोर ज्योतिष शास्राचे अनिल फडके यांचं पुस्तक पडलेलं. ते पुस्तक चाळता चाळता मीच विषयाला हात घातला. ज्योतिष शास्रातील त्यांना असलेलं स्वारस्य माझं कुतूहल वाढवून गेलं. आणि मग अध्यात्मिक गप्पा सुरु झाल्या. अध्यात्मात असलेली त्यांची रुची आणि अभ्यास पाहून या व्यक्तिमत्वाचा आणखी एक पैलू उलगडला. गेल्या 35 वर्षाच्या पत्रकारितेत खाकी वर्दी घालून अध्यात्मात एव्हढी खोली असणारे हाताच्या बोटावर मोजता येतील एव्हढेच अधिकारी भेटले. त्यात हे सर्वात तरुण.

पाच वर्षांपूर्वी झालेल्या पहिल्याच भेटीला या तरुण अधिकाऱ्याच्या लाघवी स्वभावाने मन जिंकून घेत बंधुतुल्य मित्रत्वाचं नातं मिळालं . त्याचं वेळी खात्यात तुमचं भविष्य उज्वल आहे, असे भाकीत, मी ज्योतिषाचा अधिकार नसतानाही करून टाकले. माझे ते भाकीत खोडून काढीत, “सर मी फार दिवस पोलिस खात्यात नोकरी करणार नाही” असे भाष्य केलं होतं.ते शब्द आजच्या या भेटीने पुन्हा कानात घुमले.

……..

खरं तर पोलिस ठाण्यात प्रभारी म्हणून काम करतांना मोठी जबाबदारी सांभाळावी लागते. हद्दीतील गुन्हेगारी, सामाजिक सलोखा, विविध प्रकारचे व्हेरिफिकेशन्स, विविध गुन्ह्यांचा तपास, अभ्यागतांना वेळ देऊन त्यांच्या समस्यांचे निराकारण, जोडीला पांढऱ्या कपड्यातील कावळ्यांचा ‘मी’ जपणे आणि व्हीआयपी, व्हिव्हीआयपी बंदोबस्त अशा विविध जोखीम पार पाडताना प्रभारीची कसोटी लागते. त्यात कुठे काही अधिक उणे झाले की तो प्रभारी वरिष्ठ, समाजातील कुरापत खोर नेते आणि पत्रकार यांचे लक्ष्य ठरतो. गेल्या पस्तीस वर्षात ही परिस्थिती अगदी जवळून अनुभवली आहे. या परिस्थितीवर मात करून हद्दीत लोकप्रिय ठरणं ही खरी कसोटी. अर्थात प्रत्येक जण मग तो कुठल्याही क्षेत्रात काम करीत असेल, प्रत्येकाचे समाधान करू शकत नाही. ज्यांचे समाधान होत नाही, ते आपल्याकडची बाजू झाकून फक्त समोरची बाजू न्याहाळून निष्कर्ष काढतात. आणि त्यावर मूल्यांकन करून व्यक्तिमत्व ठरवतात. अशी अनेक उदाहरणे खात्यात पाहिली.

……..ही परिस्थिती या तरुण अधिकाऱ्याने अनुभवली. एका पोलिस ठाण्याचा प्रभारी म्हणून काम करतांना या अधिकाऱ्याला फार जवळून अजमावण्याचा योग आला. धार्मिक तीर्थक्षेत्र असलेल्या या पोलिस ठाण्याच्या हद्दीत सतत व्हीआयपी वर्दळ. दैनंदिन व्याप सांभाळून व्हीआयपी बंदोबस्त देणारा अधिकारी म्हणून या व्यक्तिमत्वाने व्हीआयपीमध्येही आपले वेगळे स्थान निर्माण केले. त्याही पेक्षा हद्दीतील सामान्य जनतेत हे व्यक्तिमत्व देवदूतापेक्षा कमी नव्हते.साध्या साध्या चौकशीसाठी विशेषतः व्हेरीफिकेशन सारख्या गोष्टीसाठी पोलिस ठाण्यात महिलांना बोलावून त्रास देणे या व्यक्तिमत्वाला कधीच जमले नाही. घरी कर्मचारी पाठवून व्हवरिफिकेशन करून वेगळं समाधान पोलिस ठाण्याच्या पदरात टाकलं. अभ्यागत समाधानी झाले तर त्याचे सकारात्मक पडसाद, (ज्याला अध्यात्मिक भाषेत ओरा म्हटलं जातं,) एकूण पोलिस ठाण्याच्या कामकाजावर उमटतात.काही सन्माननीय अपवाद सोडले एरवी पोलिस ठाण्यात, प्रभारी पेहराव पाहून अभ्यागतांशी वागतात. सामान्य माणूस ताटकळत ठेवला जातो. इथेही तोच अपवाद.म्हणूनच असे व्यक्तिमत्व जेंव्हा बदलीवर निघते तेव्हा अवघी हद्द हळ हळ व्यक्त करतांना दिसली नाही तरच नवल.

…..

Advertisement

एव्हढी सारी परिस्थिती अनुकूल असतांना या उमद्या अधिकाऱ्याने चार पाच वर्षात नोकरी सोडण्याचा विचार का करावा, हा प्रश्न मन खाऊ लागला. आमची चर्चा जसजशी पुढे जात होती, तसे कारण स्पष्ट होऊन आजची खात्याची अवस्था नजरेसमोरून पुढे सरकत होती.

ते व्यक्त होत होते. कायदा सुव्यवस्था पोलिस यंत्रणेच्या हातातून का निसटली, याचे नेमकी मिमांसा त्यांनी केली. आज काम करणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला स्वातंत्र्य नाही. पोलिस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक प्रकरणाला दोन बाजू असतात.खरी कोणती खोटी कोणती हे तपासानंतर समजते. मात्र पोलिस कुठली तरी एक बाजू घेतो, दुसरी बाजू विरोधात जाते. कधी कधी काही साध्या प्रकरणात गुन्हा कागदावर न घेता मार्ग निघू शकतो. अशा प्रकरणात देखील अधिकारी कर्मचारी लक्ष्य ठरतात. परिणामी प्रत्येक गोष्ट कागदावर असलेल्या कायद्यानुसार निकाली काढण्याकडे कल वाढला. कागदावर असलेल्या कायद्याची काय अवस्था आहे? न्याय मिळतो का? मिळाला तरी तो नैसर्गिक असतो का? कालापव्यय किती होतो?

नंबर एकवर स्थानापन्न असलेले अधिकारी प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करू लागले. विविध थेट संबंध प्रस्थापित झाल्याने उतरंड शिष्टाचार नामशेष झाला. प्रत्येकाचेच वरपर्यंत संबंध घनिष्ठ झाल्याने हद्दीतील प्रभारींचा प्रभाव आपोआप नगण्य ठरला. दुसऱ्या बाजूला सत्तेची हुजरेगिरी केल्याशिवाय तग लागणार नाही हा समज दृढ झाल्याने सत्ताधारी पक्षाच्या गल्लीतील कार्यकर्त्यालाही मुजरा करण्याची रुजवात झाली.दुसऱ्या बाजूला सत्ताधारी पक्षातील कार्यकर्त्याचा गुन्हा रेकॉर्डवर घेण्याची सोय उरली नाही.सर्वदूर हुजरेगिरी. परिणामी या प्रवाहात सामान्य अभ्यागत दुर्लक्षित राहतो. एका बाजूला हा सारा ताण आणि दुसऱ्या बाजूला नितिमूल्य सोडून वागणारा समाज,मन अस्वस्थ करतो.

एकूणच या व्यक्तिमत्वाची घुसमट कार्यरत अनेक पोलिस अधिकाऱ्यांमध्ये जाणवते. हा संवाद आणि त्याच दरम्यान एका चित्रपटात चित्रित झालेली कहाणी यात बरंच साम्य जाणवलं. हेच अधिकारी खाकी वर्दी परिधान करून देखील त्या भूमिकेत कधीच वावरत नाहीत तर एखादा खरा समाज सुधारक ज्या भूमिकेत जगत असतो त्याचं भूमिकेत त्यांचं जगणं समाजासाठी खरा आधार ठरतो. आज नाशिक शहरात जे चित्र निर्माण झालं आहे, ते चित्र कर्णिक पॅटर्न म्हणून अवघ्या राज्यात चर्चेत असलं तरी त्यामागे या बंधूतुल्य मित्र अधिकाऱ्यांसारख्या अनेकांची सकारात्मक विचारसरणी समाजाप्रती जिव्हाळा आणि वर्दीशी राखलेले इमान उभे आहे. खात्यात अशा अधिकाऱ्यांची गरज आहे. वाण नाही तरी गूण लागला तर खाते आणखी बिघडणार नाही यासाठी तरी अशा अधिकाऱ्यांनी निवृत्ती पूर्व खाते सोडण्याचा विचार करू नये. अशी आमची भाबडी आशा असली तरी या व्यक्तिमत्वाचे स्वप्न काही वेगळेच आहे. समाजाची सेवा करायची किंवा सुधारणा करायची तर अन्य मार्ग आहेत.ही त्यांची ठाम भावना मन पुन्हा अस्वस्थ करून जाते.

 

संवाद सार:खाकी समाजाचा आधार:

 काही अधिकारी वर्दीमध्ये असूनही समाजाशी जुळलेले, नीतिमूल्य जपणारे आणि लोकांमध्ये विश्वास निर्माण करणारे असतात. 

 समाजातील गुंतागुंत आणि प्रशासनातील दबाव यांचा खोलवर अभ्यास, “विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर, हुजरेगिरी, कामाचे समाधान मिळत नाही… कायद्याचा मान राखणे अवघड झाले आहे,” हाच निष्कर्ष काढतो.

नेहमी नैतिकता आणि मानवी दृष्टिकोन राखला. महिलांना फक्त तपासासाठी त्रास देणे टाळले, साध्या चौकशीतही कायद्याचे पालन केले आणि सामान्य नागरिकांचा विश्वास जपला. यामुळे पोलिस ठाण्यातील कामकाजात सकारात्मक उर्जा (‘ओरा’) निर्माण होते..

 आज काम करणाऱ्याला स्वातंत्र्य नाही… प्रत्येक प्रकरणाला दोन बाजू असतात… अधिकारी एक बाजू घेतो, दुसरी बाजू विरोधात जाते.

 वर्दी फक्त अधिकार देत नाही, तर जबाबदारी आणि नैतिकता यांची कसोटीही पाहते. आत्मविश्वास, अध्यात्मिक रुची आणि लोकसेवा एकत्र जपून आपल्या हद्दीत सकारात्मक बदल घडवता येतो.

 खाकीतील खरे मोलाचे अधिकारी म्हणजे समाजाचे खरे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या प्रामाणिकपणा, निष्ठा आणि लोकाभिमुख दृष्टिकोनामुळे पोलिस यंत्रणा केवळ कायद्याची अंमलबजावणी करणारी संस्था न राहता समाजाशी ऋणानुबंध निर्माण करते.

 सकारात्मक विचार आणि वर्तनाचा प्रभाव, समाजातील विश्वास आणि पोलिस संस्थेतील नैतिक उन्नती अनमोल आहे. या उदाहरणातून वर्दीमागे केवळ अधिकार नाही, तर समाजाच्या हितासाठी काम करणारे मोलाचे अधिकारी आहेत.

-बी. के. तथा कुमार कडलग

नाशिक

दुनियादारी Won’t lie 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *