15 ऑक्टोबर 1959ःडाॕ. संतोष खेडलेकरांनी जागवल्या आठवणी; लेडी आयर्नच्या साक्षीने संगमनेरच्या स्त्रियांच्या डोक्यावरचा हंडा उतरला..! अनंत अडचणींतून पार पडलेली संगमनेरची नळ योजना (मा.नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या फेसबुक वाॕलवरून साभार
15 ऑक्टोबर 1959ःडाॕ. संतोष खेडलेकरांनी जागवल्या आठवणी;
लेडी आयर्नच्या साक्षीने संगमनेरच्या स्त्रियांच्या डोक्यावरचा हंडा उतरला..!
अनंत अडचणींतून पार पडलेली संगमनेरची नळ योजना
(मा.नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या फेसबुक वाॕलवरून साभार)
1938 च्या अखेरीस संगमनेर नगरपालिकेत काही कारणांनी वाद सुरू झाले. हे वाद इतके विकोपाला गेले की 2 फेब्रुवारी 1939 रोजी पालिकेचा कारभार सरकारने आपल्या हाती घेतला. नगराध्यक्ष, नगरसेवक यांचे अधिकार काढून घेतले. सुमारे चार वर्षे पालिकेचा कारभार सरकारनियुक्त अधिकारी बघत होते. या चार वर्षात डी. पी. वाळुंजकर, एस. बी. रिसबुड आणि डी. बी. पत्की यांनी कामकाज बघितले. याच दरम्यान 1940 – 41 मध्ये संगमनेरकरांना नदीच्या दूषित पाण्यामुळे रोगराईला सामोरे जावे लागते .या कारणास्तव गावात नळ योजना करावी असे ठरले. या योजनेचा आराखडा तयार करण्यासाठी पुण्याचे सेवानिवृत्त अभियंता जी. व्ही. आपटे यांना संगमनेरला बोलावण्यात आले. त्यांनी गावात पाहणी करून लेव्हल सर्व्हे केला, याच आधारे त्यांनी नळ योजनेचा प्लॅन आणि खर्चाचे अंदाजपत्रकही तयार केले. एकूण अडीच लाख रुपयात गावात नळ योजना पूर्ण होणार होती.

हा सगळा आराखडा सरकारकडे पाठवण्यात आला. सरकारची एक समिती संगमनेरला आली आणि आपटे साहेबांच्या आराखड्यात किरकोळ दुरुस्त्या करायला सांगितले. यात एक वर्ष गेले. नवा आराखडा तयार झाला. सरकारने नवा आराखडा तपासून बघण्यासाठी पुन्हा पब्लिक हेल्थ इंजिनिअरकडे पाठवला. दरम्यान 15 मार्च 1943 पालिकेचा कारभार पुन्हा लोकनियुक्त नगरसेवकांकडे आला. चंदूलाल मुळचंद झंवर हे नगराध्यक्ष झाले. त्यांनी या कामाचा पाठपुरावा करायला सुरुवात केली. 1946 साली योजना मंजूर झाली. पालिकेने या योजनेपोटी सरकारकडे 3 हजार रुपये भरले…आणि पुन्हा नवे संकट उभे राहिले. गावात प्लेगची साथ सुरू झाली.
1947 साली देश स्वतंत्र झाला. नानासाहेब कृष्णाजी गाडे हे नगराध्यक्ष झाले होते. त्यांनी 1948 मध्ये पुन्हा या योजनेचा आढावा घेतला. तोवर अडीच लाखाची योजना 8 लाख 81 हजार 500 रुपयांवर गेली होती. पालिकेला हा खर्च पेलवणार नव्हता. 1951 साल उजाडले. पालिकेने सरकारला अर्ज केला की निम्मा खर्च सरकारने करावा व उर्वरित रक्कम पालिका उभी करील. हा अर्ज सरकारदरबारी तब्बल चार वर्षे पडून राहिला. 26 मे 1955 रोजी सरकारने ही योजना मंजूर केली आणि 4 लाख 40 हजार 750 रुपये सरकारी निधी देण्याचे मान्य केले.

अमृतराव पाराजी ढोले हे संगमनेरचं नगराध्यक्ष होते. सरकारने योजना तर मंजूर केली. पण पालिकेकडे नळ योजनेसाठी द्यायला निम्मी रक्कमही नव्हती.
कर्नाटक बँक व नगर अर्बन बँक प्रत्येकी एकेक लाख रुपये कर्ज द्यायला तयार होत्या. मुंबईची नेपच्यून इन्शुरन्स कंपनी 50 हजार रुपये द्यायला तयार होती. पण मग उर्वरित रकमेचे काय? ‘ सौ शहरी एक संगमनेरी ‘ म्हणवणाऱ्या संगमनेरकरांनी एक अफलातून योजना आखली. यात नगराध्यक्ष ढोले, भाऊसाहेब जाजू, गणपतराव लक्ष्मण कोकणे, मोहनसिंग गणपतसिंग परदेशी आणि इतर काही लोकांनी गावातील धनिक लोकांकडून कर्ज घ्यायची योजना आखली. या योजनेनुसार शंभर रुपयांच्या पटीत रक्कम घ्यायची त्यावर दरसाल साडेचार टक्के व्याज द्यायचे. लोकांचे व्याज व मुद्दल परतफेड करण्यासाठी दरवर्षी सुमारे 30 हजार रुपयांचा सिंकिंग फंड बाजूला काढून ठेवायचे ठरले. ठरल्यानुसार लोकांना आवाहन करण्यात आले. 1 ऑक्टोबर 1955 रोजी बँकेत पैसे भरायचे होते. आर. आर. नाबर अँड कंपनीला नळ योजनेचे काम देण्यात आले होते. गावातून किमान 20 – 22 हजार रुपये गोळा करायचे होते. मग उर्वरित रक्कम मुंबईची सारस्वत बँक देणार होती. गावातून पैसे गोळा करायला सुरुवात झाली. लोकांनीही गावाचे नाव रहावे म्हणून पैसे द्यायला सुरुवात केली आणि 30 सप्टेंबर 1955 च्या संध्याकाळपर्यंत 22 हजार 400 रुपये जमा झाले. ( संगमनेरच्या नळ योजनेला कर्जरोखे घेऊन मदत करणाऱ्या संगमनेरकरांच्या नावाच्या यादीचा फोटो सोबत जोडला आहे )

सारस्वत बँकेने 1 लाख 63 हजार 300 रुपये कर्ज मंजूर केले. नाबर कंपनीला सब ट्रेझरी मार्फत हे पैसे एकदम द्यायचे नव्हते. जसजसे काम पुढे सरकेल तसे पैसे द्यायचे होते. मग इथेही एक प्रयोग करण्यात आला. बँकांकडून कर्जाऊ घेतलेली रक्कम पालिकेच्या खात्यात तशीच पडून रहाण्यापेक्षा बँकेत ठेवावी म्हणून पालिकेने ही रक्कम बँकेत चार टक्के व्याजाने तात्पुरती ठेवली. आणि यातून संगमनेरकरांकडून कर्जरोख्याद्वारे जमा केलेल्या रकमेपेक्षा जास्त म्हणजे 26 हजार तीनशे बत्तीस रुपये व्याज मिळवले.

अखेरीस हे काम पूर्ण झाले. योजनेच्या उद्घाटनासाठी इंदिरा गांधी यांना निमंत्रित करण्यात आले. 15 ऑक्टोबर 1959 … इंदिराजींची मोटार सकाळी पावणेअकरा वाजता पुण्याच्या दिशेने प्रवरेचा पूल ओलांडून गावात आली. पुणे नाक्यावर नगराध्यक्ष वसंतराव सराफ यांनी त्यांचे स्वागत केले. शहर काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजीराव नागरे यांनीही हार घालून इंदिराजींचे स्वागत केले. पुना नाक्यापासून इंदिरा गांधी यांची उघड्या मोटारीतून मिरवणूक निघाली. सध्याचे ट्रेनिंग कॉलेज, देवी गल्ली, बाजारपेठ मार्गे माळीवाडा मारुती मंदिरापासून त्यांना जलकुंभाकडे नेण्यात आले. जलकुंभाचे उद्घाटन झाल्यावर जाहीर सभा झाली. काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष नंदलाल जोशी यांनी पालिकेच्या उपक्रमाची माहिती दिली. पालिकेतर्फे इंदिराजी गांधी यांना मानपत्र देण्यात आले. शहरातील तत्कालीन युवा चित्रकार डी. बी. राठी यांनी आपल्या हाताने काढलेले इंदिराजींचे चित्र त्यांना भेट म्हणून दिले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भैय्यासाहेब कुलकर्णी यांनी सर्वांचे आभार मानले आणि सभा संपली. तोवर संगमनेरमधील मोजक्या वाड्यांमध्ये पाण्यासाठी आड होते. बहुतांशी स्त्रियांना नदीवर जाऊन पाणी आणावे लागायचे. आज आपल्याला नळ योजना या गोष्टीचे फारसे विशेष वाटणार नाही. मात्र त्या काळाचा विचार केला तर संगमनेरच्या इतिहासातील ही ऐतिहासिक घटना आहे, असेच म्हणावे लागेल .अनंत अडचणींवर मात करून एखादी योजना कशी राबवावी हे संगमनेरच्या तत्कालीन राज्यकर्त्यांनी दाखवून दिले.
-डाॕ.संतोष खेडलेकर
संगमनेर



