क्राईम

चर्चा तर होणारच! विश्वास घात कुणी कुणाचा केला? माघारीचा खेळ, मतदारांच्या भावनांचा खंडोबा!


चर्चा तर होणारच!

विश्वास घात कुणी कुणाचा केला?

 

माघारीचा खेळ, मतदारांच्या भावनांचा खंडोबा!

 

 

नाशिक प्रतिनिधी

विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून नाशिक शहरातील तीनही मतदार संघात मान्यता प्राप्त राजकीय पक्षांसह हौशे गवशे नवशे उमेदवार आमदार होण्यासाठी गुडघ्याला बांशिंग बांधून तयार होते.अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवसापासून अर्ज भरण्याची लगबग दिसू लागली. नाशिक पश्चिम, नाशिक पूर्व, मध्य नाशिक या शहरातील मतदार संघात महायुती आणि महाविकास आघाडी या प्रमुख आघाडी सोबत वंचित, मनसे, यासारख्या पक्षांनी आणि काही अपक्षांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. भाजप,काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षातील अन्य काही इच्छुकांनी अधिकृत उमेदवार असतानाही आपले अर्ज दाखल करून पक्ष नेतृत्वाला आव्हान दिले होते. प्रत्येक मतदार संघात या बंडखोरीची कारणे वेगवेगळी दिली जात होती. उदाहरण द्यायचे झाले तर नाशिक पश्चिम मतदार संघात विद्यमान आमदार सीमा हिरे यांनाच भाजपने पुन्हा संधी दिल्याने पक्षातील एका गटाने ठरवून बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला. हिरे यांना उमेदवारी देऊ नये म्हणून आचार संहिता जाहीर होण्यापासून लॉबिंग सुरु होती. तो असंतोष, शशिकांत जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून तर लोकसभेसाठी पक्षाने इच्छा पूर्ण केली नाही म्हणून विधानसभेसाठीही नाकारले गेलेले दिनकर पाटील यांनी मनसेची उमेदवारी करीत व्यक्त केला.कामगार नेते डि. एल. कराड यांनीही महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार असतानाही उमेदवारी दाखल केली होती. तथापी जाधव आणि कराड यांनी अर्ज मागे घेऊन राजकारणाचा धर्म पाळण्याचा आदेश शिरसावंद्य मानला. पूर्व मतदार संघात मात्र अधिकृत उमेदवारीला बंडखोरांचा तसा त्रास नाही. खरे नाट्य घडले ते मध्य नाशिक मध्ये.

 

काय घडले मध्य नाशिक मध्ये?

Advertisement

मध्य नाशिक मध्ये अर्ज माघारी नंतर महायुती तर्फे भाजपच्या विद्यमान आमदार देवयानी फरांदे तर महाविकास आघाडीतर्फे शिवसेना उबाठाचे माजी आमदार वसंत गीते या दोघांमध्येच लढत असल्याचे चित्र आहे. हे चित्र निर्माण होण्यामागे ठाम ठाम असलेल्या दोन बंडखोर उमेदवारांचा त्याग कारणीभूत असून त्या त्यागावर आता वेगवेगळ्या चर्चा झडत आहेत. हा केवळ उमेदवारी मागे घेण्याचा आणि त्या उमेदवारांचा हा प्रश्न राहिला नाही,तर त्यांची माघार वेगवेगळ्या समाजाच्या भावनांशी केलेला खेळ आहे, अशा चर्चा मध्य नाशिकमध्ये विशेषतः जुने नाशिक म्हणून ओळख असलेल्या परिसरात ऐकायला येत आहेत. जरांगे पाटील नावाचा फॅक्टर विचारत घेऊन या दोन्ही बंडखोरांनी आपले उमेदवारी अर्ज पक्षाचा आदेश डावलून दाखल केले होते.महाविकास आघाडीत शहरात काँग्रेस पक्षाला एकही जागा दिली नाही. या अन्यायामुळे पक्षाचे पंजा हे चिन्ह मतदारांच्या विस्मरणात जाईल, त्याचा त्रास आगामी महापालिका निवडणुकीत होईल. या निमित्ताने पंजा घराघरात नेण्यासाठी पक्षाने ए बी फॉर्म द्यावा,यासाठी हेमलता पाटील यांनी अखेरपर्यंत प्रयत्न केले. त्यात त्यांना यश आले नाही.तरीही त्यांनी उमेदवारी कायम ठेवून अपक्ष उमेदवारी करीत निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. इकडे महायुतीचा मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष रंजन ठाकरे यांनीही शेवटपर्यंत लढायचे असा निर्धार करून अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला. युती आणि आघाडी धर्म फाट्यावर मारून पक्षादेश डावलणारे हे दोन्ही उमेदवार एकाच समाजातून म्हणजे मराठा समाजातून आहेत. त्यांच्यात मत विभागणी होईल. त्याचा फटका दोघानाही बसेल ही गोष्ट लक्षात आल्यानंतर दोघापैकी एक असा प्रस्ताव पुढे आला. त्याला दोघांनीही संमती देऊन बैठकांचे सत्र सुरु झाले. यात मराठा महासंघाने महत्वाची भूमिका बजावली. या मोहिमेचे सारथ्य स्वीकारून मराठा महासंघाच्या धुरीणांनी मराठा समाजासोबत मतदार संघातील दलित मुस्लिम समाजासोबत चर्चा करून तीन्ही समाजाची मोट बांधली आणि विजयाचे समीकरण जुळविणारे एक गठ्ठा मतदानाची आकडेवारी दृष्टिक्षेपात आल्या नंतर माघार कुणी घ्यायची? उमेदवारी कुणी करायची यावर खलंबत सुरु झाली. हेमलता पाटील या आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याने रंजन ठाकरे यांनी अर्ज मागे घेण्याचा निर्णय बैठकीत झाला. त्याप्रमाणे माघारीला अर्धा तास बाकी असताना रंजन ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊन हेमलता पाटील यांच्या अपक्ष उमेदवारीला समर्थन दिले. त्यानंतर काही मिनिट बाकी असताना हेमलता पाटील यांनीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याच्या बातम्या पसरू लागल्या. आणि मध्य नाशिकचे हे माघार नाट्य चर्चेचा विषय बनले.माघार घ्यायचीच होती तर रंजन ठाकरे यांना आधीच का माघार घ्यायला लावली असा जाब ही चर्चा विचारीत आहे. विश्वास घात झाला, पण कुणी कुणाचा केला? उमेदवाराने उमेदवाराचा केला की या मतदारांचा केला, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. माघारीच्या या नाट्यात मतदारांच्या भावनांचा मात्र खेळ खंडोबा झाला, हा ठपका पुढील पाच वर्ष निवडणुकीच्या मैदानातून पळ काढणाऱ्या या उमेदवारांना सहन करावा लागणार, हेच सत्य.

 

” दोघांपैकी एकाने उमेदवारी करून विजय मिळवायचा हे बैठकीत निश्चित झाले होते. रंजन ठाकरे यांच्या विजयाचे समीकरण जुळत नव्हते म्हणून त्यांनी माघार घ्यावी हा निर्णय झाला.. त्यानंतर पक्षाने आदेश दिल्याने नाईलाज म्हणून मला माघार घ्यावी लागली.”

– हेमलता पाटील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *