जिंकता जिंकता तहही सोडला! मनोज जरांगे यांचा गनिमी कावा की शरणागती?
जिंकता जिंकता तहही सोडला!
मनोज जरांगे यांचा गनिमी कावा की शरणागती?
कुमार कडलग, नाशिक
तब्बल दीड वर्ष अवघ्या महाराष्ट्रात आरक्षणाचे रान पेटवून राजकीय रण जिंकण्याची जय्यत तयारी केलेल्या मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण चळवळीचे भवितव्य काय? या प्रश्नावर सोमवारच्या सकाळ पासून महाराष्ट्रातील समाज अभ्यासक चिंतन मनन आणि मंथन करीत आहेत. अगदी निर्णायक वळणावर आलेली मराठ्यांची लढाई मनोज जरांगे पाटील यांच्या एका घुमजाव निर्णयाने हरावी लागली असे मत बहुतांश मंडळी व्यक्त करीत आहेत. तर दुसरीकडे मराठा समाजाच्या मतांची विभागणी झाली किंवा मनोज जरांगे यांच्या आदेशानुसार मराठा समाजाची मते दूर गेली तर पराभव अटळ आहे याची जाणीव असलेले राजकीय नेते मात्र जीव भांड्यात पडावा या अविर्भावात या निर्णयाचे स्वागत करीत आहेत. तिसऱ्या बाजूला जरांगे हे प्रसिद्धीच्या झोतात आल्यानंतर त्यांची चळवळ मोडून काढण्यासाठी छाती बडवून जीवाचा आकांड तांडव करीत होते ते अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले नेते मात्र जरांगे यांना पळपुटे म्हणून हिणवू लागले आहेत.
एकूणच परवलीचा ठरलेला जरांगे यांच्या प्रत्येक शब्दाने, वाक्याने महाराष्ट्रात त्सुनामी यावी असे वातावरण दीड वर्षात तयार झाले असताना अर्ज माघारीच्या दिवशी जरांगे समर्थक असलेल्या मराठा समाजातील उमेदवारी दाखल केलेल्या सर्वच अपक्षांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत असा निरोप भल्या सकाळी महाराष्ट्रभर धाडला गेला आणि मराठा समाजाच्या चेतलेल्या भावना, ढगफुटीच्या महापुराने अचानक विझाव्यात अशी अवस्था निर्माण झाली. हा निरोप मिळाल्यानंतर आरक्षण चळवळीत तनमन आणि धनानेही झोकून दिलेल्या लाखो मराठ्यांच्या पायाखालची जमीन भूकंप व्हावा तशी खोल खोल गेली. चळवळीशी एकरूप झालेल्या भावना भुस्सखलनासारख्या घसरल्या. अनेकांना होत्याचे नव्हते झाल्याचा भास होऊ लागला. जरांगे यांनी अचानक असा निर्णय का घेतला असेल यावर अनेक प्रकारच्या अटकळी बांधल्या जात आहेत.
या निर्णयामुळे कुणाला फायदा, कुणाचे नुकसान यावर देखील तर्क वितर्क लढविले जात आहेत. या निर्णयानंतर मराठा आरक्षण चळवळ संपली, चळवळ मोडीत काढण्याची सुपारी घेतली, मनोज जरांगे जेव्हढ्या वेगाने महाराष्ट्राच्या समाजकारणात चमकले तेवढ्याच वेगाने कोसळले, अशा कंड्या पिकवण्याचेही सत्र सुरु आहे. मात्र अशा कंड्या,किंबहुना नरेटिव्ह पसरविणारे एका भ्रमात आहेत.
मनोज जरांगे यांच्या या निर्णयापाठी एक प्रचंड मोठी खेळी आहे, हे आता कुणाच्याच लक्षात येत नाही. या खेळीचा कर्ता कोण हे देखील कुणाच्याच लवकर लक्षात येत नाही. आगामी भविष्यात जरांगे नावाचे हे वादळ मराठवाडा किंवा महाराष्ट्रापुरते सीमित राहणार नाही तर उत्तर भारतात या नेतृत्वाचा बोलबाला होईल आणि त्याचीच बीजे या खेळीतून पेरली गेली आहेत.
या निर्णयामुळे फायदा कुणाचा होणार? महायुती की महाविकास आघाडी? यावर देखील चर्वण सुरु आहे. त्यांना रवंथ करू द्या. भ्रमात राहू द्या. कारण एका लाठीचार्ज मुळे प्रकाशझोतात आलेले हे नेतृत्व आता कुठे भ्रमातून बाहेर आले आहे. मावळता रविवार आणि उगवता सोमवारच्या दरम्यान मध्यरात्रीचे ते साडे तीन तास मोठी खेळी करून गेले आहे. या आंदोलनामागे शरद पवार की एकनाथ शिंदे या दोन्ही प्रश्नांना बगल देणारा हा चेहरा कोण? त्या साडेतीन तासात या चेहऱ्याने कुठली “असीम” खेळी केली?जरांगे कुठल्या भ्रमात होते?राजकारणाचा रस्ता समाजकारणाच्या पोटातून जातो हेच ब्रम्ह वाक्य समजणारे जरांगे यांचे आत्मभान या खेळीने कसे जागे केले? या चळवळीची दिशा काय असेल? हे निश्चित करणारे ते पहाटेचे साडे तीन तासाच्या गर्भात मराठा आरक्षण चळवळीसाठी नवी किरणे दडली आहेत तो उष:काल कसा असेल, त्याविषयी पुढील भागात…. त्यानंतरच ठरवा हा गनिमी कावा की शरणागती? तोपर्यंत आपापल्या मतदार संघात कुणाला पडायचे याचे प्लॅनिंग करण्याचा आनंद लुटा. जय शिवराय!!