प्रकाशा गावात 19 लाखाचे मद्य जप्त; एलसीबीची धडक कारवाई; पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांची धडाक्यात एन्ट्री, मद्य माफियांना दाखवला हिसका
प्रकाशा गावात 19 लाखाचे मद्य जप्त; एलसीबीची धडक कारवाई;
पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांची धडाक्यात एन्ट्री, मद्य माफियांना दाखवला हिसका
नंदुरबार – प्रतिनिधी
अवैध दारूच्या वाहतूकीवर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करीत 19 लाख 81 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आज जप्त केला. स्थानिक गुन्हे शाखेचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी पथकाच्या माध्यमातून ही कामगिरी बजावली.नाशिक ग्रामीण मधून नंदुरबार जिल्ह्यात नुकतेच बदलून गेलेले पोलिस निरीक्षक हेमंत यांनी या कारवाईतून जिल्ह्यात बस्तान बसवलेल्या माफियांना पहिला हिसका दाखवला आहे.
शहादा पोलीस ठाणे हद्दीतुन प्रकाशा मार्गे अक्कलकुवाकडे तीन ते चार चारचाकी वाहनात अवैध दारुची चोरटी वाहतुक होणार आहे, अशी खात्रीशिर गुप्त माहिती पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांना प्राप्त झाली होती. त्यावरून त्यांनी पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना कारवाई करणेकामी आदेश दिले. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक प्रकाशा गावातील काथदें फाटयावर येऊन थांबले असता, शहादा गावाकडून प्रकाशा गावाकडे तीन ते चार चारचाकी वाहने एका मागुन एक असे येतांना दिसले. सदर वाहनांना पोलीस पथकाने हात व टॉर्च देऊन थांबविले असता त्यातील पुढील दोन चारचाकी वाहनातील अज्ञात चालकांनी त्याचे ताब्यातील वाहने जोरात चालवून बॅरिगेटला धडक देऊन जोरात अक्कलकुवाकडे पळ काढला. तसेच मागील दोन चारचाकी वाहनातील चालक यांनी देखील मागील दिशेने पळ काढत शहादाकडे जोरात वाहन चालवून निघुन गेले. त्यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग करून एक टोयोटा कंपनीची इनोव्हा कार पकडले व सदर वाहनावरील ललीतकुमार रामुभाई सुमन, वय 38 वर्षे, रा. उदवाडा, ता. पारदी जि. बलसाड, राज्य गुजरात या चालाकाला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्याने सदरचा माल भरत यादव व डब्ल्यु, दोन्ही रा. वापी जि. बलसाड राज्य गुजरात यांचा असल्याचे सांगितले. दारू साठ्यासह वाहन सोडून पळून गेलेल्या चालकाचे नाव कमलेश पटेल, रा.उदवाडा, ता. पारदी जि. बलसाड रा. गुजरात तसेच मोहसिन पठाण रा. वलसाड राज्य गुजरात असे असल्याचेही सांगितले. सदर कारवाईत एकुण 19 लाख 81 हजार 752 रुपये किमतीचा देशी विदेशी दारु तसेच वाहन असा मुद्देमाल मिळून आला असुन आरोपींविरुध्द शहादा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोउपनि मुकेश पवार, पोहेकॉ राकेश वसावे, मुकेश तावडे, सजन वाघ, मनोज नाईक, रमेश साळुंखे, पोना/मोहन ढमढेरे, विकास कापूरे, पोकों/विजय ढिवरे, अभय राजपूत, दिपक न्हावी, यशोदीप ओगले यांनी केली.