✍️ संपादकीय “राधासुता! कुठे गेला तुझा धर्म?” सत्याच्या गळ्याला फास:कृष्णा… तूच सांग… सत्यावरचा विश्वास कोणत्या कुरुक्षेत्रात मारला गेलाय ?”
✍️ संपादकीय
“राधासुता! कुठे गेला तुझा धर्म?”
सत्याच्या गळ्याला फास:कृष्णा… तूच सांग… सत्यावरचा विश्वास कोणत्या कुरुक्षेत्रात मारला गेलाय ?”
‘धर्म’ हा शब्द उच्चारला की, आपल्याला मंदिरे, गीता, प्रवचनं आठवतात. पण खरे पाहता ‘धर्म’ म्हणजे सत्याची बाजू घेण्याची मानसिकता, अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची नैतिकता.
आजच्या राजकीय-सामाजिक परिस्थितीत ‘धर्म’ हा शब्द सोयीस्कर अर्थांनी पिळवटला जातोय. गुन्हे दाखल करताना आप पर भाव, राजकीय दबाव, सत्ता-स्वार्थाचा झगा पोलिस प्रशासन परिधान करते . अपराधी व्यक्तींचे चेहरे आणि त्यांच्या राजकीय नाळा बघून ‘गुन्हे’ दाखल करण्याचा निर्णय होतो. प्रक्रियेचा वेग कमी-जास्त होतो, कधी थांबतो तर कधी दडपला जातो.तेंव्हा विचारावे लागते, राधासुता!आता कुठे गेला तुझा धर्म?
खरे तर हा प्रश्न श्री कृष्णाने अंगराज महादानी शूर कर्णाला विचारला होता. निशस्र व्यक्तीवर हल्ला करणे, हे धर्म युद्ध कसे या प्रश्नाला प्रतिप्रश्न करतांना श्रीकृष्णाने द्रौपदी वस्र हरणाचा दाखला देऊन कर्णाला विचारणा केली होती. अगदी तीच विचारणा पोलिसिंगला आहे.
पोलीस हे न्याय-व्यवस्थेच्या पहिल्या टप्प्यावरचं धर्मपीठ आहे. परंतु जेव्हा गुन्हे दाखल करताना ‘सत्ताधाऱ्यांच्या हुकुमाचा शिक्का’ अधिक महत्त्वाचा ठरतो, तेव्हा ‘धर्म’ हा फक्त पोथ्यांत उरतो, आणि त्याचा उपयोग ‘गुन्हे लपविण्यासाठी’ केला जातो.
‘राधासुता! कुठे गेला तुझा धर्म?’ हा सवाल केवळ कृष्ण संदर्भाला उद्देशून नाही, तर आजच्या प्रत्येक सत्ताधाऱ्याला, प्रत्येक जबाबदार अधिकाऱ्याला आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लोकशाही रक्षकांना आहे. कारण, आजचा समाज प्रत्येकाच्या मनात महाभारत अनुभवतोय. सत्य आणि असत्य, नीती आणि स्वार्थ यामध्ये धूसर होत चाललेली रेषा पुन्हा स्पष्ट करणं, ही काळाची गरज आहे.
जेव्हा अधिकारी वर्दीवर हात ठेवून ‘आप पर भावाला बळी पडणार नाही’ असं सांगतात, तेव्हा समाजाला विश्वास वाटतो. पण जेव्हा ते शब्द सत्तेच्या दबावासमोर थरथर कापतात तेव्हा लोकशाहीचा श्वास गुदमरतो.तीच परिस्थिती आज दिसत आहे.
आज जिथे अधर्म राजकारणात आसुरी नृत्य करत आहे, तिथे गीता सांगणाऱ्या ‘कृष्णांची’ जेव्हढी गरज आहे.तेव्हढीच निकड ती कृष्णबुद्धी सामान्य माणसातही जागी होण्याची आहे.
आज श्रीकृष्णालाही प्रश्न पडला असेल, महाभारताच्या कुरुक्षेत्रावर आपण उभी केलेली सारी पात्र नगरीत दिसतात. कुठे अर्जुन, कुठे भीम, कुठे दुर्योधन, धृतराष्ट्र तर सर्वाधिक ठिकाणी गांधारी. ही नगरी कुरुक्षेत्र आणि इथे घडते महाभारत.
कधी आपण अर्जुन असतो, स्वतःच्या कर्तव्यासमोर संभ्रमात उभे राहतो.
कधी आपण भीष्म असतो, चुकीचे माहित असूनही वचनबद्धतेत अडकलेले.
कधी आपण द्रौपदी होतो,अपमानाच्या काठावरून संघर्षासाठी सज्ज.
कधी आपण कर्ण असतो,कर्तृत्व असूनही जन्मकुलाच्या कलंकात झुंजणारे.
कधी आपण दुर्योधन होतो — स्वार्थ, अहंकार यात अंध झालेले.
कधी आपण गांधारी होतो, अन्याय दिसत असूनही डोळ्यावर पट्टी बांधणारे.
आणि कधी आपण धृतराष्ट्र होतो — सत्य समजूनही डोळे झाकणारे.
‘धर्म’ केवळ देवळांमध्ये नको, तो पोलिस स्टेशनच्या एफआयआर रजिस्टरमध्ये दिसला पाहिजे.
न्याय फक्त पांडवांचा अधिकार नाही, तो दुर्योधनालाही न्यायानुसारच मिळायला हवा. पण सत्याचा गळा दाबणारी व्यवस्था गांधारी ‘धृतराष्ट्रत्व’ घेऊन चालणार असेल, तर प्रश्न विचारला जाईलच—
“राधासुता! कुठे गेला तुझा धर्म?”
काही उदाहरणं बोलकी आहेत. कायदेशीर मर्यादेत राहण्याचे बंधन असल्याने स्पष्ट उल्लेख करण्यास अडचण आहे. मात्र एका बाजूला फिर्यादीने दिलेल्या शब्दात फिर्याद लिहून घ्यायची, ही वास्तव भूमिका पोलिस स्वीकारतात, त्याच वेळी आणखी एखाद्या प्रकरणात फिर्यादीचे शब्द गैर सोईचे असतील तर ती फिर्यादच दाखल केली जात नाही. अन्याय झाला, किंवा होतोय, असा अर्ज आला तर त्यावर चौकशी होत नाही. उलट अर्जदारावरच खोटे गुन्हे दाखल करून खंडणी सारख्या गुन्ह्यात अडकवले जाते. कुठे गुन्हेगार व्यक्तीला बळ देऊन सत्य मांडणाऱ्या आवाजावर गुन्हे दाखल केले जातात. नाना प्रकरण आहेत. किती सांगणार, कुणाला सांगणार?
द्रौपदीच्या पदराला भर दिवसा हात घातला जातो ,त्या पदराला संरक्षण देण्याऐवजी त्या पदरावर खंडनीचे दाग चिकटवले जातात त्यावेळी कुठे जातो हा कर्त्यव्याचा धर्म? . एकट्या किंवा सत्तेशिवाय उपेक्षित झालेल्याला कौरव एकत्र येऊन मारत होतात,तेव्हा कुठे जातो हा धर्म? भोळ्या भाबड्या तरुणांना online जुगारात फसवून त्यांचे आयुष्य उध्वस्त होते, तेंव्हा हा धर्म कुठे असतो?शासनाच्या डोळ्यात धूळ फेक करणाऱ्या नतद्रष्ट प्रवृत्तीच्या आवाज उठवणाऱ्याला गजाआड केले जाते, निर्भय आवाज कारवाईच्या बोळ्याने बंद केले जातात.गुन्हेगाराला त्याची दक्षिणा देण्यासाठी दबाव वाढवला जातो,पांढरपेशी खंडणीखोर जन्माला घातले जातात.अशी अनेक प्रकरणं आहेत जिथे सद्रक्षणाय खुंटीवर अडकवून ठेवले आहे.
कृष्णधर्मालाच आता जनता प्रश्न विचारतेय.
आज तुझे नाव घेऊन लोक द्वेष पेरतात…
तुझ्या बासरीचा स्वर आता तलवारीच्या नादात हरवलाय..
धर्माच्या नावाने अधर्माचा हैदोस सुरु आहे..
कृष्णा… तूच सांग… सत्यावरचा विश्वास कोणत्या कुरुक्षेत्रात मारला गेलाय ?”
-कुमार कडलग
नाशिक
दुनियादारी won’t lie
*अफलातून म्युझिक लव्हर्स प्रस्तूत*
गीत गाता चल भाग: 1
*फक्त आपल्यासाठी : बघत रहा आपली दुनियादारी*
👇👇👇👇👇👇👇👇👇👇 https://youtu.be/DW0ET_Uw31w?si=f7FZzB1LupMEGFCF

