संख्या सम्राट,आकड्यांचा ऋषी… उपेक्षेचा प्रवासी! जिलेबीच्या दुकानातून थेट दिल्लीपर्यंत… कापरेकरांची अद्भुत कहाणी खंत…
संख्या सम्राट,आकड्यांचा ऋषी… उपेक्षेचा प्रवासी!
जिलेबीच्या दुकानातून थेट दिल्लीपर्यंत… कापरेकरांची अद्भुत कहाणी
खंत…
नाशिक
दुपारचे बारा वाजत आले होते. चांदवडकर लेन तशी शांतच होती. तोच वरतुन.. म्हणजे हत्तीखाना रोडकडुन एकामागोमाग एक गाड्या आल्या. त्या पांढरऱ्या शुभ्र ॲम्बेसेडर.. त्यावर लाल दिवे… सायरनचा आवाज… सगळ्यांचच लक्ष गेलं.
त्या गाड्या येऊन थांबल्या बगोबा जिलेबी वाल्यांच्या दुकानापुढे. बाहेर बगोबा नेहमीप्रमाणे भांगेच्या नशेत, बंदिश गुणगुणत जिलबी तळत बसले होते. त्यांना कळेचना.. हे आपल्या दुकानापुढे का थांबले. एका गाडीतुन आमदार शांताराम बापु वावरे उतरले. थेट आत दुकानात गेले.
“हे पहा.. इथे बसले आहेत…” म्हणत त्यांनी एका व्यक्तीकडे बोट दाखवलं.
धोतर.. जुनापुराणा कोट घातलेली ती व्यक्ती खाली मान घालून शांतपणे जिलेबीचा आस्वाद घेत होती. सगळ्यांनी त्या व्यक्तीला घेरलं.. विनंती करुन उठवलं.. आणि गाडीत घातलं.
वरील प्रसंग ऐकीव आहे, पण काल्पनिक नक्कीच नाही..
कोण होती ती व्यक्ती? तर ते होते कापरेकर सर..
द.रा.कापरेकर. एक थोर गणितज्ञ. झालं होतं काय.. दिल्लीत अणु उर्जा संशोधन केंद्रात कसलं तरी संशोधन चालु होतं. तिथल्या कामकाजाचा तो नेहमीचाच भाग. तर कुठलं तरी प्रमेय म्हणा.. किंवा कुठलं तरी समीकरण.. ते सोडवताना ते कुठल्या तरी गोष्टीवर अडले होते.
यावर उपाय काय? तर कुणीतरी सुचवलं.. कापरेकरांचा सल्ला घ्या… मग कोण हे कापरेकर.. कुठे असतात ते.. याचा शोध सुरु झाला. अशी अशी व्यक्ती नासिकमध्ये आहे हे समजलं.
नासिकच्या कलेक्टरशी संपर्क साधला गेला. त्यांना सांगितलं.. अशी अशी व्यक्ती नाशकात आहे.. तिला ताबडतोब दिल्लीत पोहोचवा कलेक्टरनी संपर्क साधला तो आमदार शांताराम बापू वावरेंशी. बापुंना नाशकातले गल्लीबोळ.. माणसं सगळंच माहीत आणि मग अश्या रितीने कापरेकर सरांना दिल्लीत हजर केलं गेलं.
त्यांनी ते कुठलं अडलेलं समीकरण चुटकीसरशी सोडवलं असणार यात शंका नाही. प्रचंड विद्वत्ता असलेला हा माणुस.. एक पक्का नासिककर. ते थोर गणितज्ज्ञ होते एवढेच आपल्याला ऐकुन माहीत. कापरेकर स्थिरांक.. दत्तात्रय संख्या.. हर्षद संख्या अश्या वेगवेगळ्या संख्या त्यांनी शोधल्या होत्या. काहीकाळ ते मुंबईत होते.
रोज डोंबिवली लोकलने प्रवास करायचे. त्यांना छंद लागला तो रेल्वेच्या डब्यांवर असलेले नंबर न्याहाळायचा त्यातुन त्यांनी अश्या काही वेगळ्या संख्या शोधल्या. त्यांना डेम्लो संख्या असं नाव दिलं.
सरांच्या गणिताच्या ज्ञानाबद्दल ओळख करुन देण्याची माझी पात्रता नाही.. कारण मलाच त्यातलं फारसं समजत नाही.
कापरेकर सरांना फारशी प्रसिद्धी त्या काळात मिळाली पण नव्हती. देवळालीमध्ये शिक्षक म्हणुन काम करणारी एक व्यक्ती.. पण १९७५ साली अमेरिकेतील मार्टिन गार्डनर यांनी सरांवर एक लेख लिहिला. तो ‘सायंटिफिक अमेरिका’ या मासिकात छापून आला.. आणि मग सरांचे नाव जगभर झाले. स्वीडनच्या World dictionary of mathematics मध्ये सरांच्या नावाचा आदराने समावेश केला गेला.
जगभर नाव झाले… पण धोतरकोट.. टोपी घालणारे सर शेवटपर्यंत साधेच राहीले. काही थोडे माहितगार लोकं सोडले, तर सरांना नाशकातही फारसं कोणी ओळखत नव्हतं. त्यांची आर्थिक स्थिती पण फारशी समाधानकारक नव्हती. कारण ते सरस्वतीचे, हनुमंताचे उपासक होते, लक्ष्मीचे नव्हे.त्यामुळे ज्ञान आणि वैराग्याची श्रीमंती होती.
मला आठवतं.. ऐंशीच्या आसपासचा तो काळ. तिळभांडेश्वर लेन मध्ये स्वा. सावरकर आणि प्रभावळीने स्थापन केलेलीअभिनव भारत संस्था आहे. तेथे आम्ही भारावून ऐतिहासिक पराक्रमी वारसा व भारतमातेची मोठी तसबीर यांचे दर्शन म्हणुन जात असु. कार्यालयात रीतसर स्वच्छता नव्हती कारण देखभाल करणारे क्वचित येत. जाड सतरंजीवर पण धुळ असायची. पण आम्ही त्यावर पाय ठेवत नसू, कारण कधी काळी स्वा. सावरकर बंधु, मित्र मेळाचे सभासद, कवी गोविंद -महाबळ-भट-कर्वे-देशपांडे-काथे-दातार-चंद्रात्रे अशी ३० एक जणांची प्रभावळ या सतरंजीवर बसुन क्रांतिकारक बेतांची आखणी केली असेल, अशी आमची श्रद्धा…
तळमजल्यावर एक खोली होती.. अंधारलेली.. तिथेही खोलीभर धुळ.. आणि पुस्तकांचा पसारा.. मिणमिणत्या ३०-४० वॅट बल्बच्या उजेडात कोपऱ्यात असलेल्या खुर्चीवर बसलेले सर… होय… ते कापरेकर सरच होते. तसाच वेष.. मळकट धोतर.. सदरा.. आणि कित्येक वर्षात पाणी न लागलेला कोट.. संभ्रमित अवस्था. हे गुरुजी ७० ओलांडली तरी व्यस्त असतात याचा शोध घेता कळलं की गणित शिकवतात, झालं..गणिताचं आमच्यावर फार प्रेम..त्यांनी आम्हाला त्यांच्या दरबारात दाखल करून घेतलं. फी म्हणुन फार तर आठवड्यातुन एक दिवस जेवणाचा डबा. नंतर कळलं अशी फी ते १५ वर्षापासुन घेतात.
गणितानंद कापरेकर
कापरेकर हे श्रीनिवास रामानुजन् यांच्यानंतरचे जागतिक कीर्तीचे गणितज्ज्ञ. ते मराठी आहेत याचा महाराष्ट्राला अभिमान वाटतो. नाशिकजवळच्या देवळाली येथे शिक्षक होते आणि १९६०-६५ दरम्यान निवृत्त झाले. त्यांना त्यांच्या महाविद्यालयीन काळात गणितातील रँग्लर परांजपे पारितोषिक मिळाले होते. त्यांची राहणी साधी होती. त्यांचा धोतर, कोट, टोपी हा नित्याचा वेश. कापरेकर यांचा गणितातील आकड्यांशी खेळ नोकरीच्या काळात आणि निवृत्तीनंतरही चालूच होता. त्यांना गणिताचा छंद होता असेच म्हणावे लागेल. त्यांची त्यासाठी नोकरीच्या काळात हेटाळणी होत असे, पण त्यांचे नाव त्याच छंदामुळे जगभर गाजले.
दत्तात्रेय रामचंद्र कापरेकर यांनी केलेल्या कामावर विद्यापीठांमध्ये संशोधन चालू असते. शून्याची देणगी भारतीयांनी जगाला दिली; त्याच तोडीची कामगिरी कापरेकर स्थिरांकाची आणि कापरेकर नंबरची आणि त्यांच्या अन्य कामांची आहे. कापरेकर सर देशात काय, नाशकातही फारसे कोणाला माहीत नसतील. ते भाड्याचे दोन रुपये त्यांच्याकडे नसताना टांग्यात बसले म्हणून टांगेवालाही म्हणे सरांशी हुज्जत घालायचा, तेही त्यांच्या उतारवयात!
त्यांनी दोन्ही बाजूंनी वाचले तरी तोच मजकूर येतो अशा इंग्रजी, मराठी, हिंदी इत्यादी शब्दांचे प्रदर्शन भरवले गेले होते. उदा. डालडा, काजू भाजु का?
त्यांना त्याच कल्पनेवरून कदाचित पलिण्ड्रोमिक संख्यांची कल्पना सुचली असावी. त्यांना आगगाडी स्टेशनवर किती वेळ थांबते हे एकदा कोणी विचारले असता त्यांनी अगदी गमतीदार उत्तर दिले होते….
“टू टु टू टु – टू – टू”
समोरचा माणूस गोंधळून गेला होता. तेव्हा त्यांनी त्याला समजावले… “Two to Two to Two two” म्हणजेच दोनला दोन मिनिटांपासून दोन वाजून दोन मिनिटांपर्यंत अशी चार मिनिटे गाडी थांबते.
कापरेकर स्थिरांक अर्थात Kaparekar constant
६१७४ या चार अंकी संख्येतील आकड्यांची उलटापालट केल्यास, चोवीस चार अंकी संख्या मिळतात. त्यातील कोणत्याही एका संख्येतील अंक चढत्या व उतरत्या क्रमाने मांडले आणि मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली तर उत्तर ६१७४ असेच येते हे कापरेकर यांनी दाखवून दिले. उदाहरणार्थ, ७६४१ ही संख्या उलट्या क्रमाने लिहिल्यास १४६७ अशी येईल आणि ७६४१ व १४६७ यांची वजाबाकी ६१७४ अशी येते. मार्टिन गार्ट्न नावाच्या लेखकाने ‘अमेरिकन मॅथेमॅटिकल मंथली’मध्ये त्याची नोंद घेतली आणि कापरेकरांनी शोधलेली ६१७४ ही संख्या ‘कापरेकर स्थिरांक’ म्हणून मान्य पावली.
त्यांनी त्यांच्या स्वतःच्या ‘दत्तात्रय’ नावाच्या संख्येचा शोधही लावला. दत्तात्रयात ब्रम्हा, विष्णू, महेश अशा तीन देवता आहेत; तसेच, तीन वर्गदर्शन देणार्या संख्याही गणितात आहेत हे कापरेकर यांनी शोधून काढले. उदाहरणार्थ, ४९ या संख्येत २ चा वर्ग ४ आणि ३ चा वर्ग आहे ९; तसेच, ७ चा वर्ग ४९ हाही अंतर्भूत आहे.कापरेकर यांनी शोधलेल्या ‘दत्तात्रय’ संख्या म्हणजे नक्की काय?
दत्तात्रय संख्या
१३, ५७, १६०२, ४०२०४ या संख्यांना दत्तात्रय संख्या म्हणतात. कारण, त्या संख्यांच्या वर्गाचे दोन किंवा अधिक हिस्से केले तर त्यांतील प्रत्येक हिस्सा हा पूर्ण वर्ग असतो.
उदाहरणार्थ, १३²=१६९.(१६ आणि ९ हे पूर्ण वर्ग आहेत.)
५७²=३२४I९;
१६०२²=२५६।६४।०४;
४०२०४²=१६।१६।३६।१६।१६
कापरेकर आणि कोपर्निकस
कापरेकर यांच्या काळात प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ कोपर्निकस यांची ५००वी जयंती १९ फेब्रुवारी १९७३ रोजी झाली. खगोलशास्त्र हाही कापरेकर यांचा आवडता विषय होता आणि कोपर्निकस हा त्यांचा आवडता खगोलशास्त्रज्ञ… मग काय विचारता? त्यांनी त्यांच्या आवडत्या खगोलशास्त्रज्ञाला गणिताच्या माध्यमातून वेगळ्याच पद्धतीने आदरांजली वाहिली. त्याच्या जन्मतारखेवरून जादूचा असा एक चौरस बनवला, की त्यातील उभी, आडवी, तिरपी किंवा कोणत्याही सिमेट्रीने बेरीज एकसारखीच म्हणजे ५९४ येईल…
१९ २ ७३ ५००
५०१ ७२ ५ १६
३ १८ ४९९ ७४
७१ ५०२ १७ ४
या जादुच्या चौरसात ५९४ ही बेरीज तब्बल २२ वेगवेगळ्या पद्धतींनी मिळवता येते. त्या चौरसातील पहिली ओळ आहे १९ २ ७३ ५०० म्हणजे कोपरनिकसची जन्मतारीख आणि त्यांनी साजरी केलेली ५०० वी जयंती!
कापरेकर आणि त्यांची गुरुदक्षिणा
रँग्लर परांजपे हे कापरेकर यांचे फर्ग्युसन कॉलेजातील प्राध्यापक होते. त्यांच्या शहाऐंशीव्या जन्मदिवसानिमित्त (१६-२-६२) कापरेकर यांनी त्यांच्या गुरुंसाठी तब्बल पाच संख्यांचा चौरस बनवला.
१६ ०२ १९ ६२ ८६
०१ ६७ ९१ २१ ०७
९६ २६ १२ ०४ ४७
१७ ०९ ५२ ७६ ३१
५७ ८१ ११ २२ १४
योगायोग म्हणजे त्या घटनेनंतर त्यांना विद्यापीठ अनुदान मंडळाची शिष्यवृत्ती मिळाली. कापरेकर यांची अजब आकडेमोड – एक नमुना
4 2 0 4 2 3 4 1 2 5 आणि 5 2 1 4 3 2 4 0 2 4 या पालीण्ड्रोम संख्या आहेत; म्हणजे त्या उलटसुलट कशाही लिहिल्या तरी एकच संख्या मिळते. त्या पुढीलप्रमाणे मांडल्या……
त्यांची पुनर्मांडणी करूया.
4, 20, 42, 3, 41, 25 आणि 5, 21, 43, 2, 40, 24
आता,
4 + 20 + 42 + 3 + 41+ 25 = 5 + 21+ 43 + 40 + 24
आणखी गंमत पाहा. या सर्व संख्यांचे वर्ग केले आणि मिळवले तरीही……..
4²+ 20²+ 42² + 3² + 41²+ 25²= 5² + 21² + 43² + 40²+ 24²
आणखी गंमत पुढेच आहे
यांचा घन केला असताही दोन्ही बाजू सारख्या राहतात हे कापरेकर यांनी गणित करून काढले होते.
4³+ 20³+ 42³+ 3³ + 41³+ 25³ = 5³ + 21³ + 43³+ 40³ + 24³
ही आकडेमोड कॅलक्यूलेटरवर सुद्धा करणे वेळ खाणारे काम आहे आणि त्यावेळी कॅलक्युलेटर वगैरे नसतानाही छाती दड़पून टाकणारी ती आकडेमोड कापरेकर यांनी फक्त कागद-पेन्सील घेऊन केली होती!
बहुतेक कॅलक्युलेटर हे दहा किंवा बारा डिजिटचे असतात; तर कापरेकर यांनी इतके गुणाकार-भागाकार करण्यासाठी किती वेळ खर्च केला असेल आणि तेही अत्यंत अचूकपणे व कंटाळा न करता….. म्हणूनच त्यांचे नाव प्रख्यात गणितज्ञ म्हणून ‘द वर्ल्ड डिरेक्टरी ऑफ मैथेमेटिशियन’ या स्वीडनहून प्रकाशित झालेल्या ग्रंथात समाविष्ट झालेले आहे.
१९८६ या वर्षी कापरेकर सरही गेले.
एक थोर गणितज्ज्ञ म्हणून जगभर नाव मिळवलेल्या कापरेकर सरांना आयुष्याचं गणित का सुटलं नाही याची तर खंत वाटत नसेल? म्हणुन तर त्यांची अशी अवस्था झाली नसेल?
त्यांचं जाऊ द्या.. जागतिक कीर्तीच्या शास्त्रज्ञाला आपण इतक्या जवळुन पाहिलं.. पण ओळखु शकलो नाही.. ही खंत तर आम्हाला जाणवत राहिलीच ना!
काही उसन्या गोष्टी , काही आठवणी..
Fwded from social Media
योगेश खरे यांच्या वॉलवरून साभार फॉरवर्डेड पोस्ट…



