जिल्ह्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या खांदेपालटाचे संकेत; अन्य ठाण्यांच्या प्रभारींमध्येही धाकधूक!
जिल्ह्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या खांदेपालटाचे संकेत; अन्य ठाण्यांच्या प्रभारींमध्येही धाकधूक!
नाशिक :प्रतिनिधी
जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांमध्ये लवकरच खांदेपालट होण्याची जोरदार चर्चा सुरू झाली असून, काही पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांबाबत पोलीस दलात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. या संभाव्य फेरबदलामुळे अन्य पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांचीही धाकधूक वाढली असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात रंगली आहे.
चर्चेत असलेल्या संभाव्य बदलांमध्ये पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांची निफाड, तर पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांची देवळा येथे नियुक्ती झाल्याची चर्चा आहे. त्याचप्रमाणे प्रदीप देशमुख कळवण आणि सार्थक नेहते यांना मुख्यालयाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मात्र, हा फेरबदल केवळ चार अधिकाऱ्यांपुरता मर्यादित राहणार की जिल्ह्यातील आणखी काही पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांनाही त्याचा फटका बसणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
*कामगिरीचा लेखाजोखा की राजकीय गणित?*
पोलीस दलातील बदल्या हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. मात्र यावेळी होणाऱ्या संभाव्य खांदेपालटामागे कामगिरीचा आढावा, कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती, गुन्हेगारीवरील नियंत्रण आणि प्रशासकीय गरज हे निकष आहेत की अन्य काही गणिते, याबाबत पोलीस वर्तुळात कुजबुज सुरू आहे.
काही पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण, प्रलंबित गुन्ह्यांचा प्रश्न, अवैध धंद्यांवरील कारवाई आणि नागरिकांशी असलेला संवाद याचा आढावा घेऊन वरिष्ठ स्तरावर निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.
*‘खुर्ची’ सुरक्षित कुणाची?*
या संभाव्य फेरबदलाच्या चर्चेने जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांचे लक्ष आता वरिष्ठांच्या निर्णयाकडे लागले आहे. “पुढचा नंबर कुणाचा?” हा प्रश्न पोलीस वर्तुळात दबक्या आवाजात विचारला जात आहे.
काही ठाण्यांतील प्रभारी अधिकारी आपल्या कामगिरीचा बचाव करण्यात व्यस्त असल्याची चर्चा आहे, तर काहींनी संभाव्य बदल्यांच्या पार्श्वभूमीवर कारवाईचा वेग वाढविल्याचेही बोलले जात आहे.
सध्या या बदल्यांबाबत अधिकृत आदेश जाहीर झालेले नसल्याने अंतिम चित्र स्पष्ट झालेले नाही. मात्र पोलीस दलात सुरू असलेली चर्चा आणि संभाव्य फेरबदलाची चाहूल पाहता, जिल्ह्यातील पोलीस प्रशासनात लवकरच मोठी हालचाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आदेशाची प्रत बाहेर येताच कुणाची वर्णी लागली आणि कुणाची खुर्ची गेली, याचे चित्र स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत मात्र जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यांच्या प्रभारींची धाकधूक कायम आहे!



