Bussiness

सुरगाण्यातील जुगार अड्ड्यावर धाड : पाच पाकळ्यांची कहाणी मात्र पडद्याआड ७३ लाखांचा मुद्देमाल जप्त; आय जींच्या जीवावर उदार झाले पंत


सुरगाण्यातील जुगार अड्ड्यावर धाड : पाच पाकळ्यांची कहाणी मात्र पडद्याआड

७३ लाखांचा मुद्देमाल जप्त; आय जींच्या जीवावर उदार झाले पंत
सुरगाणा | प्रतिनिधी
सुरगाणा तालुक्यातील बर्डीपाडा येथील हॉटेल एन.जी. हिल्सच्या मोकळ्या जागेत सुरू असलेल्या तीन पत्ती जुगाराच्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकून १६ जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत २ लाख ३ हजार ८७० रुपये रोख, सुमारे १ लाख ९८ हजार ५०० रुपये किमतीचे मोबाईल, दहा वाहने आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ७३ लाख २ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अधिकृत फिर्यादीतील ही कहाणी स्पष्ट आहे.
मात्र, या धाडीनंतर खाकीच्या वर्तुळात सुरू झालेली पडद्यामागची चर्चा काही वेगळीच आहे.
या कारवाईसाठी काही कर्मचाऱ्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नाराजी ओढवून घेण्याची जोखीम पत्करली, अशी चर्चा आहे. आणि म्हणूनच या संपूर्ण प्रकरणाचा किस्सा केवळ जुगाराच्या अड्ड्यापुरता मर्यादित राहत नाही. तो पोलीस दलातील अंतर्गत समीकरणे, अधिकारक्षेत्र आणि ‘खाकीतील गावगुंडी’च्या चर्चेपर्यंत पोहोचतो.
या चर्चेत तथ्य किती आणि अफवा किती, याचा अधिकृत खुलासा अद्याप झालेला नाही. त्यामुळे या कथित घडामोडींना आम्ही दुजोरा देत नाही. मात्र, खाकीच्या वर्तुळात कानो कानी  फिरणाऱ्या या चर्चेकडे प्रशासनाने दुर्लक्ष करण्याचेही काही  कारण नाही.
*विश्वासाने दिलेली ‘क्रिम पोस्ट’ आणि त्यानंतरची समीकरणे*
पोलीस अधीक्षक डॉ. स्वामी यांनी विश्वासाने काही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. एका अधिकाऱ्याकडे संपूर्ण जिल्ह्याची सुभेदारी, तर दुसऱ्याकडे एका पोलीस ठाण्याचा स्वतंत्र कारभार सोपविण्यात आला आहे.
तिसरा अधिकारी सध्या कुठल्याही ठरावीक ठिकाणी ‘एंगेज’ नसला, तरी वरिष्ठ पातळीवरील एका अधिकाऱ्याशी असलेल्या सलोख्याच्या संबंधांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करीत असल्याची चर्चा आहे.
विशेष म्हणजे हे तिघेही एकाच बॅचचे असल्याची चर्चा आहे.
मग काय? थेट एसपी साहेबांनाच आव्हान देण्याची मानसिकता तयार झाली.अशीच कुजबुज आता खाकीच्या वर्तुळात ऐकायला मिळत आहे.
—
*‘वरून परवानगी’ आणि ‘पाच पाकळ्या’ची चर्चा
या कथित समीकरणात आणखी एक महत्त्वाची चर्चा पुढे येते.संबंधित अधिकाऱ्याने आयजी पातळीवरून या जुगार अड्डयाला  परवानगी मिळवून दिल्याचे सांगितले जाते. त्यानंतर आपल्या दोन सहकाऱ्यांनाही ‘पाच पाच पाकळ्या’ वाटल्याची चर्चा आहे.
नेमक्या त्या ‘पाकळ्या’  कोणाला मिळाल्या?
किती मिळाल्या,कशासाठी मिळाल्या?
याची कोणतीही अधिकृत पुष्टी उपलब्ध नाही.
म्हणून ही बाब आम्ही तथ्य म्हणून मांडत नाही.
पण अशी चर्चा जर पोलीस दलातच होत असेल तर तिची सत्यता तपासणे ही वरिष्ठ अधिकाऱ्यांची जबाबदारी ठरते.
*एसपींना कल्पना नसताना अड्डा सुरू?*
या चर्चेतील सर्वात गंभीर भाग म्हणजे पोलीस अधीक्षकांना कोणतीही कल्पना न देता हा जुगाराचा अड्डा सुरू असल्याचे सांगितले जाते.जर ही बाब खरी असेल, तर प्रश्न जुगाराचा राहत नाही.प्रश्न होतो तो जिल्ह्याच्या पोलिसिंगच्या नियंत्रणाचा.जिल्ह्यातील एका भागात मोठ्या प्रमाणावर जुगार सुरू आहे, बाहेरील जिल्ह्यांमधून, शेजारच्या राज्यातून  लोक येत आहेत, मोठ्या रकमेची उलाढाल होत आहे, वाहने ये-जा करीत आहेत आणि तरीही जिल्ह्याच्या प्रमुखाला त्याची कल्पना नाही,असे असेल तर माहितीची लिंक कुठे पंक्चर झाली?की ती जाणूनबुजून पंक्चर करण्यात आली?हा तपासाचा विषय आहे.
*सेक्शन आणि उपविभागीय कार्यालयाची भूमिका*
या कथित कटकारस्थानाला बळ द्यायचे नाही, असा निर्णय सेक्शन आणि उपविभागीय कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांनी घेतल्याची चर्चा आहे.त्यांनी या प्रक्रियेत  प्रत्यक्ष सहभाग नोंदविला नाही.
उलट संबंधित वरिष्ठांना आणि जिल्ह्याच्या जबाबदार अधिकाऱ्यांना ‘छापा टाका; अन्यथा आम्ही एसपींकडे जाऊ’, अशा स्वरूपाची विनंती केल्याची चर्चा आहे.
कर्मचारीच ते!वरिष्ठांना थेट आव्हान देणे त्यांच्यासाठी सोपे नसते.त्यामुळे ‘विनंती’ करणे एवढेच त्यांच्या हातात असते.
आणि अखेर परिस्थिती अशी आली की जिल्हास्तरीय जबाबदारी असलेले अधिकारी केवळ एका कर्मचाऱ्याला सोबत घेऊन छापा टाकण्यासाठी निघाले, अशी चर्चा आहे.
*दोन पथके एकाच अड्ड्यावर : योगायोग की पूर्वनियोजन?*
दरम्यान, दुसरीकडे संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारीही योगायोगाने त्याच वेळी त्या अड्ड्यावर पोहोचल्याची चर्चा आहे.
दोन्ही पथके.
एकच अड्डा.
एकच वेळ.
आणि दोन्ही बाजूंनी कारवाई.
हा केवळ योगायोग होता?
की पूर्वनियोजित कार्यक्रम?
याचे उत्तर अधिकृत नोंदीत मिळणे कठीण आहे.
पण प्रश्न विचारला जाणे स्वाभाविक आहे.
दोन वेगवेगळ्या पोलिसी यंत्रणा एकाच वेळी एकाच ठिकाणी कशा पोहोचल्या?
माहिती स्वतंत्रपणे मिळाली होती?
की माहितीचा प्रवाह आधीच सुरू होता?
याची सत्यता संबंधित वरिष्ठ अधिकारीच तपासू शकतात.
*‘पाच पाकळ्या’ देऊनही धाड पडल्याचा संताप?*
या कथित कहाणीचा सर्वाधिक चर्चेचा क्लायमॅक्स पुढे येतो तो येथे.अड्डा चालविणाऱ्याने कथितरीत्या ‘पाच पाकळ्या’ देऊनही धाड पडल्याचा संताप व्यक्त केला आणि संबंधितांना लाखोल्या वाहिल्याची चर्चा प्रत्यक्षदर्शींमध्ये असल्याचे सांगितले जाते.
या चर्चेला आम्ही दुजोरा देत नाही.
मात्र, जर एखाद्याला कारवाई होणार नाही असा विश्वास(?) देण्यात आला असेल आणि अचानक पोलिसांची धाड पडली असेल, तर त्या विश्वासामागे(?) कोण होते, हा प्रश्न नक्कीच उपस्थित होतो.
आणि जर तसा कोणताही प्रकारच नसेल, तर ‘पाच पाकळ्या’ची चर्चा कुठून आली, याचा शोध घेणेही आवश्यक आहे.
ही आहे पडद्यामागची चर्चित कहाणी!
एका बाजूला अधिकृत एफआयआर आहे.
गुप्त माहिती.
पोलिसांचा छापा.
१६ जणांना ताब्यात घेणे.
७३ लाखांचा मुद्देमाल.
कायदेशीर कारवाई.
आणि दुसऱ्या बाजूला
वरिष्ठ अधिकाऱ्यांची कथित नाराजी,
एकाच बॅचचे अधिकारी,
वरिष्ठ पातळीवरील संबंधांचा कथित वापर,
*‘परवानगी’ची चर्चा,*
‘पाच पाकळ्यां’ची कुजबुज,
एसपींना माहिती नसल्याची चर्चा,
सेक्शन आणि उपविभागीय कार्यालयाची कथित भूमिका,
दोन पथकांचे एकाच वेळी घटनास्थळी पोहोचणे,
आणि धाडीनंतर झालेल्या कथित संतापाची चर्चा.
यात तथ्य किती आणि अफवा किती?
हा हिशेब या कथित घटनांतील पात्रांनाच ठाऊक.
म्हणून आम्ही कोणत्याही अधिकाऱ्यावर थेट आरोप करीत नाही.
पण पोलीस अधीक्षक डॉ. स्वामी यांनी आपल्या खबऱ्यांमार्फत या संपूर्ण प्रकरणाची खात्री करून घेतली तर त्यात गैर काहीच नाही.
*कर्मचाऱ्यांना पुरस्कार नको; संरक्षण मात्र द्या!*
या संपूर्ण प्रकरणात एक बाब मात्र गंभीरपणे विचारात घेतली पाहिजे.
जर काही कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांची नाराजी पत्करण्याची जोखीम घेत जुगार अड्ड्यावर कारवाई घडवून आणली असेल, तर त्यांच्या धाडसाचे कौतुक झाले पाहिजे.
रिवार्ड मिळाला नाही तरी चालेल.
प्रशस्तीपत्र मिळाले नाही तरी चालेल.
पण त्यांनी कर्तव्य बजावले म्हणून त्यांना कुणाच्या वैयक्तिक नाराजीचा सामना करावा लागू नये, एवढीच अपेक्षा.
कारण खाकीतील प्रामाणिक कर्मचाऱ्याला संरक्षण मिळणे हे कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठे आहे.
—
*बाकी एसपी कर्तव्यदक्ष आहेतच!*
पोलीस अधीक्षक डॉ. स्वामी कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे या प्रकरणातील अधिकृत कारवाईबरोबरच त्याभोवती सुरू असलेल्या पडद्यामागच्या चर्चेचीही ते खात्री करतील, अशी अपेक्षा आहे.
कारण जुगाराचा अड्डा उध्वस्त करणे ही एक बाजू झाली.
पण जुगाराच्या अड्ड्याला कोणाचे संरक्षण होते का, याचा शोध घेणे ही दुसरी आणि अधिक महत्त्वाची बाजू आहे.
जुगाराचा अड्डा पोलिसांनी उद्ध्वस्त केला; आता त्या अड्ड्याभोवती उभी राहिलेली ‘अफवांची  भिंत’ कोण उद्ध्वस्त करणार?
सुरगाण्यातील या धाडीनंतर आता खाकीतील चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी सत्य बाहेर येणे आवश्यक आहे.
बाकी…
पाच पाकळ्यांचा हिशेब आम्हाला ठाऊक नाही;
पण त्या पाकळ्यांचा सुगंध कुणाच्या अंगावर आहे, हे शोधण्याची जबाबदारी मात्र पोलिस प्रशासनाचीच!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *